संविधानाच्या हक्कांसाठी एमपीजेचे अधिवेशन; प्रशांत भूषण येणार

संविधानाच्या हक्कांसाठी एमपीजेचे अधिवेशन; प्रशांत भूषण येणार

छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) ३० जानेवारी: छत्रपती संभाजीनगरमध्ये “सन्मानाने जगण्याचा अधिकार” या मुद्द्यावर आता थेट संविधानाच्या भाषेत लढाई उभी राहणार आहे. मूव्हमेंट फॉर पीस अँड जस्टिस (एमपीजे) यांनी राज्यव्यापी मोहिमेअंतर्गत 1 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता तापडिया नाट्य मंदिर येथे भव्य अधिवेशनाचे आयोजन केले असून, या अधिवेशनात सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण नागरिकांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती एमपीजेचे प्रदेश सचिव मेहमूद खान, प्रदेश मिडीया सचिव एस. जी. हक़, अब्दुल अजीम पाशा आणि आदील मदनी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

            पत्रकार परिषदेत महाराष्ट्रातील सामान्य माणसाच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर थेट बोट ठेवण्यात आले. मराठवाड्यासारख्या भागात दरवर्षी उद्भवणारी भीषण पाणीटंचाई, टँकरवर चाललेले जगणे, संविधानातील कलम 21 अंतर्गत असलेल्या सन्मानाने जगण्याच्या अधिकारालाच आव्हान देणारे असल्याचे मेहमूद खान यांनी ठामपणे सांगितले. “पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो, हे लोकशाही राज्यासाठी लाजिरवाणे आहे,” असे ते म्हणाले.

           एस. जी. हक़ यांनी आरोग्य व्यवस्थेवर जोरदार हल्लाबोल करत खासगी ‘फाईव्ह स्टार हॉस्पिटल संस्कृती’वर टीका केली. सरकारी रुग्णालये कमकुवत होत असताना गरीब आणि मध्यमवर्गीयांना महागड्या उपचारांसाठी कर्जबाजारी व्हावे लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिक्षण क्षेत्रातही सरकारी शाळांचा दर्जा घसरत असून चांगले शिक्षण केवळ श्रीमंतांपुरते मर्यादित राहिल्याने समाजात विषमता वाढत असल्याची गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली.

          या अधिवेशनात प्रशांत भूषण यांच्यासह जमात-ए-इस्लामी हिंदचे अध्यक्ष सय्यद सआदतुल्लाह हुसेनी, एपीसीआरचे सचिव वासिक नदीम, ‘युवा हल्ला बोल’चे अध्यक्ष अनुपम, एमपीजेच्या सुप्रीम कौन्सिलचे संयोजक जमीर कादरी तसेच स्थानिक सामाजिक कार्यकर्ते व वकील अभय टाकसाळ हे मार्गदर्शन करणार आहेत. एमपीजेने नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून संविधानाधारित सामाजिक न्याय आणि सन्मानाच्या जीवनासाठीच्या चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

            पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष मोहसिन शेख, शहराध्यक्ष मुख्तार शेख, आदिल मदनी, इम्रान देशमुख आणि करीम बेग यांच्यासह एमपीजेची स्थानिक टीम उपस्थित होती. “सन्मानाने जगणे हा हक्क आहे, दया नाही,” असा ठाम संदेश देत हे अधिवेशन राज्यातील सामाजिक प्रश्नांवर नवी दिशा देणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.