मानव जीवन आणि स्वच्छता!

अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवी जीवनाच्या मूलभूत गरजा! याला समांतर गरज आणि कर्तव्य आहे, "स्वच्छता!" किंबहुना प्रत्येक धर्माने मानवी जीवनात स्वच्छतेचे महत्त्व याबाबत मार्गदर्शक तत्त्व सांगितली आहे आणि भौतिक व आत्मिक स्वच्छतेला मानव जीवनाचा अविभाज्य घटक ठरविले आहे. मग ती आचार-विचारांची असो की घर-परिसराची!
आचार-विचारांची स्वच्छता म्हणजे शुद्धता ही उत्तम मानसिक आरोग्यास पूरक असते, तर घर-परिसराची स्वच्छता ही शारीरिक आरोग्य ठणठणीत ठेवण्यास लाभदायक असते!
कचरा उघड्यावर किंवा रस्त्यावर टाकणे, रस्त्यावर/सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, अस्वच्छता पसरविणे हे सर्वांसाठी त्रासदायक व लाजिरवाणे किंबहुना विक्षिप्त असे अमानवी कृत्य आहे.
त्यावर कहर तो असा की सर्व प्राणिमात्रांत श्रेष्ठ आणि बुद्धिजीवी मानवाला स्वच्छतेचे समानता ज्ञान द्यावे लागते ही काळाची विडंबना आणि कथित प्रगतीशील मानवतेची घोर विटंबनाच आहे!
खर्च व्हावा जरूर, पण तो सर्वत्र स्वच्छता राखण्यासाठी - बरेच जनजागरण मोहीमा, शिबिरं, अभियान राबवून सार्वजनिक संपत्तीचा कचरा करण्यासाठी नव्हे! थोडा विचार केल्यास हे ही सहज समजेल की विविध शासकीय व प्रशासकीय यंत्रणांकडून स्वच्छता या महत्त्वपूर्ण विषयाशी संबंधित जनजागरण मोहिमा, अभियान व योजना नियमित अंतराळाणे किंवा एखादे विशेष औचित्य साधून राबविले जातात. हे काही अंशी आवश्यक आणि चांगलेही आहे - पण बहुतांश कथित जनजागरण मोहिमा, अभियान व योजना या अस्वच्छ भ्रष्टाचार, केवळ सत्तापिपासू वृत्ती, गलिच्छ राजकारण, जनसेवेचा पोकळ दिखावा आणि अस्वच्छ आचार-विचारांच्या स्वार्थी व परावलंबी मानवांना पोसणारा अति घटक कचरा ठरतात.
म्हणून आपण सर्वांनी समाजाचा एक महत्त्वपूर्ण घटक आणि महान देशाचा स्वाभिमानी, जबाबदार, सूज्ञ आणि कर्तव्यदक्ष नागरिकरूपाने स्वच्छतेचे कार्य हे स्वतःच्या घरापासून सुरू करावे.
•किमान आपले घर आणि परिसर स्वच्छ ठेवण्याची नैतिक जबाबदारी प्रामाणिकपणे पाळावी.
• सार्वजनिक ठिकाण स्वच्छ ठेवणे/करणे बहुतांशी व्यक्तींना रुचत व पटत नाही, पण सार्वजनिक ठिकाण अस्वच्छ ना करणे हे स्वच्छता ठेवण्याइतकेच महत्त्वाचे आहे. म्हणजे काय तर सार्वजनिक ठिकाण अस्वच्छ करण्याचे टाळले आणि जमेल तसे इतरांनाही समजावले तर स्वच्छता टिकून राहील.
• पाण्याचा अपव्यय रोखणे, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन (झाड लावणे व त्याची निगा राखणे), प्लास्टिकचा अनावश्यक वापर/विभिन्न प्रदूषण (जल, वायू आणि ध्वनी) पसरविणे अश्या निसर्गाचा समतोल बिघडविणाऱ्या बाबी कटाक्षाने टाळणे या सामान्य व सहज बाबींची वेळेत योग्य पद्धतीने अंमलबजावणी ही स्वच्छतेची भक्कम बाजू, मानव जीवनासाठी अमूल्य देणगी/भेट/वरदान आहे.
• काही क्षणांचा वेळ काढून ओला कचरा, सुका करचा, वैद्यकीय कचरा, इलेक्ट्रोनिक कचरा, भंगार व अन्य टाकाऊ घटक असे वर्गीकरण करून कचरा व्यवस्थापन यंत्रणेस प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मदत केली तर हे तुमच्यासाठी एक वरदान ठरेल! कारण स्वच्छतेमुळे रोगराई पसरणार नाही, स्वच्छ परिसराचा अनुभव तन-मन प्रफुल्लित व निरोगी राखण्यास पूरक ठरेल, कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छता अभियान इत्यादींवर होणारा वारेमाप खर्च कमी होईल - ज्याने भ्रष्टाचार नियंत्रणात राहील, जेणेकरून समाजात व देशात मानवी नितीमूल्यांच कचरा होणार नाही.
• झाडू/फडका आदी बाबी वापरून जी स्वच्छता केली जाते ती मनाच्या भौतिक जीवनाचा अभुंन अंग आहे. तसेच तत्त्व, बुध्दी आणि प्रामाणिक प्रयत्न करत समाजातून पक्षपात, जातीवाद, भ्रष्टाचार, दुराचार, गुन्हेगारी, द्वेष, मत्सर, इत्यादी बाबी दूर करणे - एकूण समाजाला अवगुनांपासून स्वच्छ ठेवणे हे आपल्या सर्वांच्या जीवनासाठी आणि राष्ट्र हितासाठी अत्यावश्यक आहे.
हे सारे काही फार मोठे दिव्य किंवा आव्हान आहे असे मुळीच नाही! एकीचे बळ अश्या अशक्यप्राय वाटणाऱ्या बाबीही लिलया पूर्ण करून सहजपणे कायम राखू शकते. तर गर्भितार्थ तो असा की, "स्व" ने सुरू होणाऱ्या - म्हणजेच स्वतःचा अर्थबोध करून देणाऱ्या स्वच्छतेची भौतिक व आत्मिक स्वरूपात कटाक्षाने अंमलबजावणी करून आजघडीला समाजकंटकांनी वितुष्ट माजविकेल्या समाजात स्वच्छ/निष्पक्ष एकोपा जातं रहावा हे ही आपले कर्तव्य आहे. मग स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता ही लोकशाहीस पूरक चतु:सूत्री राष्ट्राला पारदर्शक प्रगतीचे स्वच्छ यश मिळवून देईल.
"सौंदर्य, नीटनेटकेपणा, आकर्षण, आत्मविश्वास, मनःशांती, परिपूर्ण ज्ञान, निर्भेळ यश, अष्टपैलूत्त्व, व्यक्तिमत्त्व विकास, आदर, मान-सन्मान, इत्यादी व अश्या अगणित बाबी मानवी जीवनाशी निगडित असल्या तरी स्वच्छता या क्षुल्लक वाटणाऱ्या घटकाशिवाय अपूर्ण आहेत.
- इकबाल सईद काझी (विश्लेषक/लेखक/कवी)