निवडणूक नाही, तरीही महापालिकेत काम करण्याची सुवर्णसंधी...
महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनो, आपल्या शहराच्या प्रशासनात “स्वीकृत किंवा नामनिर्देशित नगरसेवक” ही एक महत्त्वाची पण अनेकांना पूर्ण माहिती नसलेली व्यवस्था आहे. आपण सर्वजण मतदान करून नगरसेवक निवडतो, हा अधिकार पूर्णपणे जनतेचा असतो. निवडून आलेल्या नगरसेवकांमधून महापौर आणि उपमहापौर कोण होणार हे त्या त्या राजकीय पक्षांवर अवलंबून असते. परंतु महानगरपालिका व्यवस्थेत काही जागा अशा असतात ज्या निवडणुकीतून भरल्या जात नाहीत, तर समाजातील अनुभवी आणि तज्ञ लोकांना काम करण्याची संधी देण्यासाठी राखीव ठेवलेल्या असतात. यांनाच स्वीकृत किंवा नामनिर्देशित नगरसेवक म्हटले जाते.
चांगला समाज घडवण्यासाठी, शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आणि पुढील पिढीला सुरक्षित व सक्षम भविष्य देण्यासाठी केवळ राजकारण पुरेसे नसते. शहर चालवताना आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा, अर्थव्यवस्था, सामाजिक प्रश्न, पर्यावरण, संस्कृती अशा अनेक विषयांचा विचार करावा लागतो. त्यामुळे डॉक्टर, वकील, इंजिनिअर, शिक्षक, प्राध्यापक, चार्टर्ड अकाउंटंट, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांत प्रत्यक्ष कामाचा अनुभव असलेले लोक महानगरपालिका प्रशासनात सहभागी व्हावेत, हा या व्यवस्थेचा उद्देश आहे. अशा लोकांचे ज्ञान, अभ्यास आणि अनुभव शहराच्या निर्णय प्रक्रियेत उपयोगी पडावे म्हणून ही कायदेशीर तरतूद करण्यात आलेली आहे.
स्वीकृत नगरसेवक होण्यासाठी एखाद्या विशिष्ट राजकीय पक्षाशी जोडलेले असणे आवश्यक नाही. निवडून आलेल्या सत्ताधारी पक्षाचेच असावे अशी अट नाही, तसेच विरोधी पक्षाचा नसावा अशीही कोणतीही कायदेशीर अट नाही. संबंधित व्यक्ती भारतीय नागरिक असावी, त्या पालिका क्षेत्रात वास्तव्यास असावी आणि सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक किंवा सार्वजनिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेले असावे, एवढे मूलभूत निकष महत्त्वाचे असतात. मोठी पदवी नसली तरी प्रत्यक्ष समाजकार्य उल्लेखनीय असेल तरी व्यक्ती पात्र ठरू शकते. म्हणजेच ही संधी केवळ राजकीय लोकांसाठी नसून समाजासाठी काम करणाऱ्या सजग आणि सक्षम नागरिकांसाठी आहे.
स्वीकृत नगरसेवक नेमण्याचा अधिकार महानगरपालिका आयुक्तांकडे असतो आणि यासाठी शासनाचा अधिकृत आदेश व नियमावली अस्तित्वात आहे. त्या नियमांनुसार पात्र व्यक्तींची निवड व्हायला हवी. हे पद राजकारण्यांचे नातेवाईक, मित्रमंडळी किंवा कार्यकर्त्यांना बक्षीस म्हणून देण्यासाठी नसून तज्ञ आणि समाजोपयोगी व्यक्तींना शहर विकासात सहभागी करण्यासाठी आहे, हा शासनाचा स्पष्ट हेतू आहे. त्यामुळे या पदाबाबत पारदर्शकता आणि पात्रतेचे निकष पाळणे अत्यंत गरजेचे आहे.
आपण राहत असलेल्या महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती येथे अशा स्वीकृत नगरसेवक पदासाठी इच्छुक आणि पात्र व्यक्ती थेट अर्ज करू शकतात. तुम्ही डॉक्टर, वकील, इंजिनिअर, सीए, शिक्षक, साहित्यिक किंवा खरे सामाजिक कार्य करणारे नागरिक असाल तर ही संधी तुमच्यासाठीच आहे. राजकीय पार्श्वभूमी असण्याची किंवा कोणत्याही पक्षाचे पदाधिकारी असण्याची गरज नाही. शहराचा विकास फक्त राजकारणावर अवलंबून नसतो; तो ज्ञान, अनुभव आणि प्रामाणिक सामाजिक बांधिलकी यांच्या एकत्रित प्रयत्नांनी होतो. त्यामुळे जागरूक नागरिकांनी पुढे येऊन या व्यवस्थेचा उपयोग करावा आणि आपल्या शहराच्या घडणीत थेट सहभाग नोंदवावा.
-डॉ रियाज़ देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त (नि), संभाजीनगर (औरंगाबाद)