या IPS अधिकाऱ्याचा विक्रम : ५ तासांत पोहून पार केले गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा लेणी अंतर...
मुंबई : IPS अधिकारी कृष्णा प्रकाश यांनी गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा लेणी असा पोहण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदवलाय. त्यांनी ५ तास २५ मिनिटांत १६.२० किलोमीटरचे समुद्री अंतर पोहून पूर्ण केलं. भारतीय जलतरणपटूंना प्रेरणा मिळावी, यासाठी कृष्णा प्रकाश यांनी ही मोहीम हाती घेतल्याचं सांगितले. विशेष म्हणजे, याआधी बऱ्याच लोकांनी एलिफंटा लेणी ते गेट वे ऑफ इंडिया असे समुद्री अंतर पोहून पूर्ण केले आहे. परंतु, कृष्णा प्रकाश यांनी समुद्र लाटांविरोधात म्हणजेच गेट वे ऑफ इंडिया ते एलिफंटा असे अंतर पोहून पार करत नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
येथे क्लिक करून पहा : IPS कृष्ण प्रकाश (Spl IGP) यांनी ट्विट केलेला व्हिडिओ
आयपीएस अधिकारी कृष्णा प्रकाश यांनी स्वत: त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबत माहिती दिली. "मी आज गेटवे इंडिया ते एलिफंटा लेणीपर्यंत पोहण्याचा काम पूर्ण करणारा जगातील पहिली व्यक्ती ठरलो. अनेकांनी एलिफंटा ते गेट वे ऑफ इंडियाच्या दिशेनं पोहण्याचा विक्रम केला आहे. परंतु, मी त्याविरुद्ध म्हणजेच गेट ऑफ इंडिया ते एलिफंटा या दिशेनं पोहण्याचे ठरवले. मी ५ तास आणि २६ मिनिटांत १६.२० किलोमीटर पोहून पूर्ण केलं. यामुळे भारतीय जलतरणपटूंना स्विमिंगमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकण्यासाठी प्रेरणा मिळेल", असा विश्वास कृष्णा प्रकाश यांनी व्यक्त केला आहे.
कृष्ण प्रकाश हे सध्या मुंबई येथे व्हीआयपी सेक्युरिटी आणि कोस्टल सेक्युरिटी, महाराष्ट्र चे विशेष पोलीस महानिरीक्षक या पदावर कार्यरत आहेत. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त म्हणून, बुलढाणा जिल्हा अमरावती जिल्हा अहमदनगर जिल्हा येथे पोलीस अधीक्षक म्हणूनही त्यांनी सेवा दिलेली आहे. त्यांनी आपले नावावर विश्व पातळीवर अनेक विक्रम नोंदविले आहेत.