भेंडाळा फाट्यावर ‘कट्टेबाज’ जेरबंद! ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; महामार्गावर शस्त्रांचा सुळसुळाट?
छत्रपती संभाजीनगर : शहरासह ग्रामीण भागात गुन्हेगारीच्या वाढत्या सावटात अखेर ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई करत भेंडाळा फाटा परिसरातून एका ‘कट्टेबाज’ युवकाला जेरबंद केले आहे. आरोपीकडून गावठी कट्टा, मॅगझीन आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आले असून, या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भेंडाळा गावाजवळील राधाकृष्ण हॉटेलसमोर एक युवक गावठी कट्टा घेऊन उभा असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. या माहितीची तात्काळ दखल घेत पोलिसांनी सापळा रचत रात्री साडेदहाच्या सुमारास संशयिताला ताब्यात घेतले.
चौकशीत आरोपीने आपले नाव किशोर शिवनाथ जाधव (वय २८, रा. अब्दुलपूर, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) असे सांगितले. पंचांसमक्ष घेतलेल्या झडतीत त्याच्या कमरेला स्टीलचा गावठी कट्टा, मॅगझीन आणि एक जिवंत काडतूस आढळून आले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे ४१ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
विशेष म्हणजे, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्याच परिसरात घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना ही माहिती मिळाली आणि तत्काळ कारवाई करण्यात आली. त्यामुळे महामार्ग परिसरात अवैध शस्त्रांची ने-आण करणाऱ्या टोळ्यांचे जाळे कार्यरत आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.
आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायद्याच्या कलम ३/२५ अन्वये गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याच्याकडे गावठी कट्टा कुठून आला, यामागे आणखी कोणाचे जाळे आहे का, याचा तपास आता पोलिसांसमोरचे मोठे आव्हान ठरणार आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, पोलीस उपनिरीक्षक महेश घुगे आणि त्यांच्या पथकाने केली.
गावठी कट्टे, जिवंत काडतुसे आणि महामार्ग परिसरातील संशयास्पद हालचाली यामुळे ग्रामीण भागात गुन्हेगारीचे हातपाय पसरत असल्याचे चित्र समोर येत आहे. पोलिसांनी वेळेत कारवाई केली असली तरी अशा शस्त्रांचा पुरवठा नेमका कोण करत आहे, याचा छडा लावणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.