नार्वेकरांची मराठी

नार्वेकरांची मराठी

     महाराष्ट्रात राहायचं असेल, तर मराठी भाषा बोलायला जमलंच पाहिजे, असे परप्रांतीयांना ठणकावून सांगून झाले. आणि त्या करता, त्यांना मारहाण देखील करून झाली. दुकानावर लावले जाणारे बोर्ड, हे सुद्धा मराठीतच असले पाहिजे याची सक्ती सुद्धा करून झाली. हे सर्व करण्यात काहीच गैर नव्हते. कारण मराठी, ही महाराष्ट्राची भाषा आहे. आपल्या भाषेचा अभिमान बाळगण्यात काहीच गैर नाही. नाही म्हणायला ,मराठी सोबतच हिंदी भाषेची सक्ती पहिल्या वर्गापासून करण्यास उत्सुक असणारा, हिंदी भाषिक धार्जिणा मुख्यमंत्री, आम्हाला लाभला असला तरी, मुख्यमंत्र्याच्या निर्णयाला विरोध करून, तिसऱ्या भाषेच्या सक्तीचा निर्णय, हाणून पडण्यात आला. आता मात्र, महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांनाच, मराठी भाषा नीट वाचायला येत नाही म्हटल्यानंतर, परप्रांतीयांना कोणत्या तोंडाने म्हणायचे, की तुम्हाला मराठी भाषा आलीच पाहिजे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. एकतर परप्रांतीयांवर मराठी भाषेची सक्ती करू नये अथवा विधान सभेच्या अध्यक्षांचा राजीनामा घेण्यात यावा, या दोन उपायां पैकी, मराठी माणसाला कोणता उपाय सोयीस्कर वाटतो, हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. राज ठाकरे यांच्या भाषेत सांगायचे तर, विधानसभेच्या अध्यक्षांनी, अगदी मराठी भाषेचीच अंतयात्रा काढलेली आहे. या माणसाचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाली का, हा माणूस आपल्या घरात मराठी बोलतो की आणखी कोणत्या भाषेचा वापर करतो, हा मुद्दा गौण आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांना मराठी वाचता येत नाही, हा मुद्दा महत्त्वाचा आहे. मग ज्याला मराठी वाचता येत नाही, अशा माणसाची नियुक्ती, विधानसभेच्या अध्यक्ष म्हणून करावी का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

     एरवी मराठी येत नाही म्हणून, तुम्ही परप्रांतीयांना, मुंबईमध्ये ऑटो रिक्षा चालवायला विरोध करता आणि ज्या माणसाला धड मराठी वाचता येत नाही, अशा माणसाच्या हातात राज्याच्या विधानसभेचे सभागृह चालवायला देता, या विरोधाभासाला काय म्हणायचे, हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. आपल्या एका भाषणात (भाषणात म्हणण्यापेक्षा वाचनात म्हणणे जास्त योग्य ठरेल) त्यांनी 26 चुका केल्या, किती ठिकाणी ते अडखळले, याची सुद्धा नोंद आहे. विधानसभेचा अध्यक्ष म्हणून, पक्षपात करताना, जो माणूस कधीच अडखळत नाही. तो मराठी वाचताना अडखळतो, याला काय म्हणावे हा महत्त्वाचा प्रश्न आहे. 

     महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष, राहुल नार्वेकर हे भारतीय जनता पक्षातून येतात. भारतीय जनता पक्षाचे असल्यामुळे मोदींच्या यांच्या प्रमाणे, त्यांनी देखील मराठीचा द्वेष करावा का हा महत्त्वाचा प्रश्न आहे. या जोडीने, फडणवीसंना हाताशी धरून, महाराष्ट्रावर प्राथमिक शाळेपासून हिंदी लादण्याचा प्रयत्न केला. आपल्या मातृभाषेबद्दल अभिमान बाळगणाऱ्या आणि कणा ताठ असणाऱ्या दक्षिणेकडील राज्यांनी, केंद्र अनुदान केंद्र सरकारने अनुदान रोखण्याची धमकी दिल्यानंतर सुद्धा, हिंदी भाषेची सक्ती लागू करून घेणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले. त्यामानाने महाराष्ट्रातील नेतृत्व कणाहीन असल्यामुळे, आपण सांगू त्याप्रमाणे वागणार असल्याची खात्री, मोदी शहा यांना होती. महाराष्ट्रात मराठी माणसाची संख्या जास्त असली तरी, मराठी भाषिकांच्या मतावर, हिंदी भाषिक माणस निवडून येतात. या हिंदी नेत्यांकडे, आपले मराठी तरुण, सतरंज्या उचलण्याचे काम करतात, ही वस्तुस्थिती आहे. भारतात प्रत्येक बारा कोसावर भाषा बदलते ,असे म्हणतात. फक्त मराठीचा विषय घेतला तर, विदर्भातील, मराठवाड्यातील, जळगाव, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, या सर्वच भागात बोलली जाणारी मराठी, एकसारखी नाही, हे आपल्या लक्षात येईल. परंतु यापैकी एकाही भाषेत, नार्वेकरांनी केलेल्या चुकीच्या उद्गाराप्रमाणे, उद्गार होत नाहीत, हे सुद्धा लक्षात घेतले पाहिजे. ज्यांनी कधीच शाळा बघितली नाही, अशा संत गाडगे महाराज आणि बहिणाबाई चौधरी यांची नावं, विद्यापीठाला देण्यात आलेली आहेत. आपल्या कीर्तनात, गाडगे महाराज कधीच नार्वेकरांप्रमाणे अडखळले नाहीत आणि जात्यावर गीत म्हणत असताना, बहिणाबाईंचे शब्द कधी चुकले नाही. मग धडपण आहे मराठी वाचता न येणारे हे ध्यान, महाराष्ट्राच्या बोकांडी कोणी आणू बसवलं, हा महत्त्वाचा प्रश्न आहे .

     नार्वेकर हे स्वतः मराठी आहेत. आमच्या अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा, या परप्रांता मधून आल्या आहेत. दक्षिणात्य भाषेतील चित्रपटात त्यांनी काम केले आहे. परंतु रवी राणाच्या पत्नी म्हणून, अमरावतीमध्ये पाऊल ठेवल्या क्षणापासून, त्यांनी मराठी शिकण्याचा प्रयत्न केला आहे. मराठी बोलत असताना काही उच्चार, त्यांना जड जातात, हे सत्य असले तरी, ज्या लोकांमध्ये आपल्याला वावरायचे आहे, त्यांची भाषा आपल्याला आली पाहिजे, अशी जिद्द त्यांनी त्यांच्या ठायी असल्याचे दिसून येते. त्यामुळे नार्वेकरांच्या तुलनेत, त्यांनी सुद्धा हे भाषण अचूकपणे वाचून दाखवले असते. भले भाषणाचा कागद जवळ आल्यानंतर, त्यांनी दोन वेळा वाचून, उच्चारात अचूकपणा आणण्याचा प्रयत्न केला असता. परंतु नार्वेकर तर जन्माने मराठी आहेत. "आपल्याच महाराष्ट्रात हाल सोसते मराठी" असे काहीसे, सुरेश भटांच्या एका कवितेतील शब्द आहेत. हिंदी भाषिक माणसाकडून, मराठी माणसांना त्रास दिला जात आहे. मराठी माणसाच्या महाराष्ट्रातच, या सोसायटीत मराठी माणसाला भाड्याने घर देण्यात येणार नसल्याच्या पाट्या बघायला मिळत आहेत. मराठी उमेदवारांनी, या सोसायटीत मत मागण्या करता येऊ नये, असे सुद्धा सांगितले जात आहे. मराठी माणसाने त्याच्या घरात मटन शिजवले, तर त्या मटणाचा देखील, त्याच्या शेजारी राहणाऱ्या हिंदी भाषिकांना त्रास होत आहे .त्याकरता मराठी माणसाला शिवीगाळ सुद्धा करण्यात येते. सुरेश भट यांनी म्हटल्याप्रमाणे, केवळ कागदोपत्रीच महाराष्ट्राची भाषा मराठी राहिली असून, महाराष्ट्रात मराठी माणसाचे हाल सुरू आहेत. मराठी भाषिकांचे असे हाल सुरू असतानाच,आपला शोकसंदेश वाचून दाखवत असतानाच, नार्वेकरांनी, मराठी भाषेचे सुद्धा हाल केले असल्याचे बघायला मिळाले. गेल्या वर्षी मराठी भाषेला, अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या आनंदात आपण होतो. मराठी भाषेचे वाचन अशा प्रकारे करणारा, विधानसभेचा अध्यक्ष, आम्हाला लाभला म्हणून, आम्ही आता फटाके फोडायचे का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

     आपल्यासमोर वाचनाकरता आलेल्या कागदावरील अक्षरांचा फॉन्ड अतिशय बारीक होता, शाइ फिकी असल्यामुळे, अक्षर पुसट होती, असली काहीतरी, थातूरमातूर कारण सांगून, नार्वेकर वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्या वाचनातून, मराठी भाषेची अवहेलना झाली म्हणून, त्यांनी माफी देखील मागितलेली आहे. परंतु विधानसभेत, वाचण्याकरता देण्यात येणारा कागद, नीटपणे, अचूकपणे वाचला जाऊ शकेल अशा अवस्थेत आहे की नाही, हे तपासून बघण्याची जबाबदारी, संबंधित अधिकाऱ्याची असायलाच पाहिजे. एका रुपयात मिळणारी झेरॉक्स कॉपी, अस्पष्ट आली तर, आपण दुकानदार सोबत वाद घालतो. इथे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेपुढे वाचून दाखवण्यात येणारा शोक संदेश, विधानसभा अध्यक्षांच्या स्वाधीन करत असताना, अक्षर बारीक आहेत, का पुसट आहेत का, यासंबंधीची पडताळणी झालीच नसेल, असे कसे म्हणता येईल? एक मराठी माणूस, लता मंगेशकर यांच्या वडिलांचे नाव, दीनदयाळ मंगेशकर असे वाचतो, याला काय म्हणावे, हेच समजत नाही. दवाखान्यापासून तर नाट्यगृहापर्यंत, कितीतरी ठिकाणी दीनानाथ मंगेशकर यांचे नाव देण्यात आले आहे. गेल्याच वर्षी, दिनानाथ हॉस्पिटलमध्ये एक वाद निर्माण झाला होता आणि त्यासंबंधीची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात झाली होती. ही चर्चा नार्वेकरांच्या कानावर आली नसेल, अशातला भाग नाही. तरीसुद्धा, त्यांनी लता मंगेशकर यांच्या वडिलांचे नाव, दीनदयाळ असे घेतले. विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, दिवंगत झालेल्या ख्यातनाम व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण केली जाते. यावर्षी, आशा भोसले आणि सुमन कल्याणपुर, या गायिकांचे निधन झाले. त्यामुळे अधिवेशनाच्या सुरुवातीलाच, या दोन कलावंतांना श्रद्धांजली अर्पण करणे आवश्यक होते.परंतु त्यांना श्रद्धांजली अर्पण करत असताना, नार्वेकरांनी, मराठी भाषेला श्रद्धांजली अर्पण केली का, असा प्रश्न आता विचारला जात आहे. 

- पंकज वैद्य, वरिष्ठ पत्रकार, अमरावती 
9823014040