सिडको पोलिसांची मोठी कारवाई: १९ सायकलींसह चोरट्याला अटक

छत्रपती संभाजीनगर:: सिडको पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून सराईत सायकल चोरट्याला अटक केली आहे. त्याच्याकडून १ लाख १६ हजार रुपये किंमतीच्या १९ सायकली जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई सिडको परिसरातील सायकल चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी महत्त्वाची ठरली आहे.
दिनांक २९ जुलै २०२५ रोजी सिडको एन-७, अयोध्यानगर येथील रहिवासी पूजा धम्मपाल प्रधान (वय २९) यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांचा मुलगा सम्राट (वय १३) याची सायकल घराबाहेरून चोरीला गेली होती. यावरून सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (गु.र.नं. ४३०/२०२५, कलम ३०३(२) बीएनएस) झाला. या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला.
पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी आणि सहायक पोलीस आयुक्त सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांच्या नेतृत्वात विशेष पथकाने कारवाई केली. पोलीस उपनिरीक्षक अनिल नाणेकर, सुभाष शेवाळे, मंगेश पवार, प्रदीप दंडवते, विशाल सोनवणे, प्रदीप फरकाडे, सहदेव साबळे आणि अमोल अंभोरे यांनी गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचला. यावेळी लक्ष्मण भिमराव गायके (वय ६०, रा. सावित्रीनगर, चिकलठाणा) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने सिडको एन-७ आणि एम-२ परिसरातून सायकली चोरल्याची कबुली दिली.
पोलिसांनी आरोपीकडून विविध कंपनीच्या आणि मॉडेलच्या १९ सायकली जप्त केल्या, ज्यांची एकूण किंमत १ लाख १६ हजार रुपये आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल नाणेकर करत आहेत.
सिडको पोलिसांच्या या यशस्वी कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढली आहे.