डी.बी. पथकाची मोठी कामगिरी : यवतमाळ शहरात पाच घरफोड्या उघडकीस
यवतमाळ, १८ डिसेंबर (वसीम शेख) : यवतमाळ शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रगटीकरण पथकाने (डी.बी.) शहरात घडलेल्या पाच घरफोड्यांचे गुन्हे उघडकीस आणत मोठी यशस्वी कामगिरी केली आहे. या प्रकरणात एका विधिसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेऊन त्याच्याकडून एकूण २ लाख ४१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक ९०६/२०२५ अंतर्गत सोन्याचा मुद्देमाल चोरीस गेल्याची तक्रार नोंद होती. या गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डि.बी. पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान संशयावरून एका विधिसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेण्यात आले. त्याची सखोल चौकशी केली असता त्याने सदर गुन्ह्यासह इतर चार घरफोड्यांची कबुली दिली.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, अप. क्र. ११/२०२५ मध्ये १२ हजार ५०० रुपयांचा चांदीचा मुद्देमाल, अप. क्र. ३३८/२०२५ मध्ये १ लाख ७० हजार रुपयांचा सोन्या-चांदीचा मुद्देमाल, अप. क्र. ५३४/२०२५ मध्ये १४ हजार रुपयांचे वायरचे बंडल, अप. क्र. ३२१/२०२५ मध्ये २२ हजार रुपये रोख रक्कम, तर अप. क्र. ६६७/२०२५ मध्ये दोन टीव्ही व २३ हजार रुपये किमतीचा चांदीचा दिवा अशी चोरी केल्याची कबुली बालकाने दिली. या सर्व गुन्ह्यांतील मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने तसेच पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या यशस्वी कारवाईत गुन्हे प्रगटीकरण पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद सरकटे, पोलीस उपनिरीक्षक गणेश सपकाळ, पो.हवा. रावसाहेब शेंडे, पो.हवा किरण पडघण, पो.शि. गौरव ठाकरे, पो.शि. पवन नांदेकर पो.शि. प्रदिप कुरडकर, पो.शि. प्रतीक नेवरे यांनी सक्रिय सहभाग घेतला.
या कामगिरीमुळे यवतमाळ शहरात झालेल्या घरफोड्यांच्या गुन्ह्यांचा छडा लागला असून नागरिकांमध्ये पोलिसांविषयी विश्वास अधिक दृढ झाला आहे.