छत्रपती संभाजीनगरात बनावट नोटांचा कारखाना उघडकीस, समाजकंटकांचे रॅकेट उद्ध्वस्त

छत्रपती संभाजीनगरात बनावट नोटांचा कारखाना उघडकीस, समाजकंटकांचे रॅकेट उद्ध्वस्त

नगर, २ ऑगस्ट:  नगर तालुका पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथील वाळुंज एमआयडीसी परिसरात बनावट चलनी नोटा छापणारा कारखाना उघडकीस आणत मोठे रॅकेट उद्ध्वस्त केले आहे. या कारवाईत सात समाजकंटक आणि देशद्रोही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, मुख्य सूत्रधार अंबादास ससाणे हा फरार आहे. पोलिसांनी तब्बल ८८ लाख २० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. छत्रपती संभाजीनगर, बीड आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये या टोळीने मोठ्या प्रमाणात बनावट नोटा चलनात आणल्याचा संशय आहे.

           दि. २७ जुलै २०२५ रोजी सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते यांना गुप्त माहिती मिळाली की, दोन समाजकंटक काळ्या रंगाच्या महिंद्रा थार गाडीतून फिरत असून, ५०० रुपयांच्या बनावट नोटा वापरत आंबीलवाडी शिवारातील पान टपऱ्यांवर सिगारेट खरेदी करत आहेत. स्थानिक टपरीचालकाला संशय आल्याने त्याने पोलिसांना माहिती दिली. यावरून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत निखील गांगर्डे (वय २७, रा. कुंभळी, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) आणि सोमनाथ शिंदे (वय २५, रा. तपोवन रोड, जि. अहिल्यानगर) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ८० हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त झाल्या.

        पुढील तपासात पोलिसांना समजले की, या रॅकेटचा मुख्य कारखाना छत्रपती संभाजीनगरमधील वाळुंज एमआयडीसी परिसरातील तिसगाव येथे भाड्याच्या खोलीत कार्यरत होता. या कारखान्यातून ५०० रुपयांच्या बनावट नोटा तयार केल्या जात होत्या, ज्या इतक्या हुबेहूब होत्या की सामान्य लोकांना त्या ओळखणे कठीण होते. पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून ५९ लाख ५० हजार रुपयांच्या बनावट नोटा, २ कोटी १६ लाख रुपयांच्या नोटा तयार करण्याचे कागद, शाई, २७ लाख ९० हजार ६०० रुपयांचे छपाई मशीन, संगणक आणि इतर साहित्य जप्त केले. एकूण ८८ लाख २० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

        या रॅकेटचा मुख्य सूत्रधार अंबादास ससाणे (उर्फ मेजर, रा. शहर टाकळी, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर) हा आहे, जो यापूर्वीही अटक झाला होता. जामीनावर सुटल्यानंतर त्याने पुन्हा हे रॅकेट सुरू केले. तपासात समोर आले की, ससाणे याने अल्पवयीन मुलांचा वापर करून छत्रपती संभाजीनगर, बीड आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतील स्थानिक बाजारपेठा, दुकाने आणि पान टपऱ्यांवर बनावट नोटा खपवल्या. विशेषतः छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात बनावट नोटा चलनात आल्याचा संशय आहे, ज्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला धोका निर्माण झाला होता.

          पोलिसांनी आणखी पाच समाजकंटकांना ताब्यात घेतले. त्यांची नावे प्रदीप कापरे (वय २८, रा. तिंतरवणी, ता. शिरूर कासार, जि. बीड), मंगेश शिरसाठ (वय ४०, रा. शिवाजीनगर, छत्रपती संभाजीनगर), विनोद अरबट (वय ५३, रा. सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर), आकाश बनसोडे (वय २७, रा. निसर्ग कॉलनी, छत्रपती संभाजीनगर) आणि अनिल पवार (वय ३४, रा. मुकुंदनगर, छत्रपती संभाजीनगर) अशी आहेत. ससाणे अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

          या बनावट नोटा इतक्या सफाईदार होत्या की, त्या सामान्य लोकांना सहज ओळखता येत नव्हत्या. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व बँकांना अशा नोटा आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

        ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कुलकर्णी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते यांच्या पथकाने केली. पथकात पोलीस हवालदार भरत धुमाळ, सुभाष थोरात, रविकिरण सोनटक्के, बाबासाहेब खेडेकर, मंगेश खरमाळे, शरद वाडेकर, संतू शिंदे, सागर मिसाळ, राजू खेडेकर, विकास भालसिंग, अजिनाथ घोरपडे, अन्सारे शेख, मोहिनी कडक, शितल साळवे, मनीषा ढोबळे, गणेश शिंदे आणि संदीप जाधव यांचा समावेश होता.

         या समाजकंटक आणि देशद्रोही टोळीच्या कारवायांमुळे अर्थव्यवस्थेला मोठा धोका निर्माण झाला होता. नगर तालुका पोलिसांच्या या यशस्वी कारवाईमुळे बनावट नोटांचे रॅकेट उघडकीस आले असून, पुढील तपास सुरू आहे.