मतदार यादी पुनरीक्षणात हलगर्जीपणा महागात; BLO विरुद्ध गुन्हा दाखल

मतदार यादी पुनरीक्षणात हलगर्जीपणा महागात; BLO विरुद्ध गुन्हा दाखल

परभणी, दि. ३१ मार्च — परभणी विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या मतदार यादी विशेष पुनरीक्षण कार्यक्रमात (SIR) हलगर्जीपणा करणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यावर (BLO) तहसील प्रशासनाने कठोर कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे निवडणूक कामात निष्काळजीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

     तहसील कार्यालय परभणीच्या निवडणूक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, श्री. सय्यद फरहान सय्यद रहीम, (शिक्षक, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम शाळा, परभणी) यांची नियुक्ती मतदान केंद्र क्रमांक 96/232 येथे BLO म्हणून करण्यात आली होती. त्यांनी दिनांक १३ मार्च २०२६ रोजी पदभार स्वीकारला होता. मात्र, त्यानंतर त्यांनी मतदार यादी पुनरीक्षणाशी संबंधित कोणतेही काम केले नाही.

     दरम्यान, निवडणूक विभागाने त्यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही, तसेच अनेक वेळा त्यांचा मोबाईल फोन बंद असल्याचेही निदर्शनास आले. या निष्काळजीपणामुळे मतदार यादीतील महत्त्वाचे मॅपिंग काम ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
या गंभीर प्रकाराची दखल घेत नायब तहसीलदार (निवडणूक विभाग) श्री. सुनील नारायण कावळे यांनी संबंधित शिक्षकाविरुद्ध लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ च्या कलम १३४ अंतर्गत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

     तहसील प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की, निवडणूक प्रक्रियेसारख्या अत्यंत महत्त्वाच्या कामात कोणत्याही प्रकारची हलगर्जीपणा सहन केली जाणार नाही. अशा प्रकारच्या निष्काळजी कर्मचाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल, असेही प्रशासनाने बजावले आहे.
या कारवाईमुळे निवडणूक कामात गुंतलेल्या कर्मचाऱ्यांना प्रशासनाचा कडक संदेश मिळाला असून, मतदार यादी पुनरीक्षणाचे काम अधिक वेगाने आणि काटेकोरपणे पार पडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.