"दाम कमी, मग नाही स्वच्छतेची हमी!!!"

"दाम कमी, मग नाही स्वच्छतेची हमी!!!"

        किराणा सामान आणि गृह उपयोगी वस्तू आणण्यासाठी बाजारात ये जा चालूच असते. औरंगाबाद/छत्रपती संभाजीनगर मध्ये सुपरमार्केट पद्धती बऱ्यापैकी रुळली तर आहे, तरी मध्यमवर्गीय आणि पारंपरिक शैलीत रमलेली कुटुंब आजही सुपरमार्केट ऐवजी बाजारात फेरफटका मारत एक एक वस्तू औत्सुक्य व कुतूहल आणि हौसेने खरेदी करतात.
शहराच्या जुन्या आणि प्रसिद्ध बाजारपेठेपैकी एक असणाऱ्या शहागंज येथील अनेक मोठेमोठ्या दुकानांपैकी पारंपरिक तरीही सुपरमार्केट सारखे भले मोठे दुकान अनेक वर्षांपासून ग्राहकांच्या विशेष पसंतीचे केंद्र आहे.

         एकाच दुकानात किराणा समान, कडधान्य, गृहोपयोगी वस्तू, खाद्यपदार्थ, भांडी, एकेक्ट्रिक/इलेक्ट्रॉनिक साहित्य, खेळणी असे जवळपास सर्वकाही येथे एका छताखाली मिळते - ते ही कमी किमतीत किंवा विशेष सवलत/सूट आदींसह...

व्यवहारात स्पर्धा आणि चढाओढ आलीच, पण कमी किंमत ठेऊन सामानाचा दर्जा/गुणवत्ता राखणे हे निश्चितच आव्हान असते. व्यवस्थापन आणि एकूण कामकाजाचा पसारा सांभाळत नीटनेटके व्यवस्थापन, स्वच्छता, ग्राहक हाताळणी, हिशोब, कर्माच्यांवर लक्ष या साऱ्या बाबी महत्त्वाच्या असतात. यांच्याकडे दुर्लक्ष करणे फार महागात पडते.

       अशीच काहीशी तऱ्हा बहुतांश दुकानांची झाली आहे. व्यापार आणि स्पर्धा या धावपळीत सर्वात जास्त दुर्लक्ष होत आहे ते दुकान आणि गोदामातील स्वच्छतेबाबत!

         उघड्यावर ठेवलेले सामना/खाद्यपदार्थ आणि इतर वस्तूंच्या अवतीभोवती असलेले उंदीर, घूस, अळ्या, किडे, मुंग्या, इत्यादी व यांच्यामुळे पसरणारी घाण यामुळे सामानाच्या दर्जा व गुणवत्तेबाबत ग्राहकांच्या आरोग्याशी ही तडजोड केली जात आहे.
कथित कमी किंमत किंवा आकर्षक सवलत/सूट असे आमिष दाखवून आरोग्याची हेळसांड करणे सर्वथा चुकीचे आहे. त्यामुळे सर्वप्रथम दुकान व गोदामाच्या मालक व कर्मचाऱ्यांनी स्वच्छता व नीटनेटकेपणावर विशेष लक्ष द्यावे आणि तितकेच लक्ष जनता अर्थात ग्राहकांनी देणे अत्यावश्यक आहे  सोबतच माध्यम आणि प्रशासन यांनी या प्राथमिक बाबींवर अतिविशेष लक्ष पुरवून नितीनियांनची कठोर अंमलबजावणी करण्याचे कार्य अखंड, अविरत व प्रामाणिकपणे चालू ठेवावे.

- इकबाल सईद काझी
(विश्लेषक/लेखक/कवी)