लोकसभेचे अधिवेशन असतांना सुध्दा डिपीडीसी बैठकीसाठी एवढी धावपळ का ?: खासदार इम्तियाज जलील
औरंगाबाद,६ ऑगस्ट : सध्या दिल्ली येथे लोकसभेचे अधिवेशन सुरु असल्याने जिल्हा नियोजन समितीची (डिपीडीसी) बैठक ११ ऑगस्ट नंतर म्हणजेच अधिवेशन संपल्यानंतर घेण्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांना पत्राव्दारे विनंती केल्यानंतर सुध्दा ७ ऑगस्टलाच इतक्या धावपळीत बैठक घेण्यात येत असल्याने खासदार इम्तियाज जलील यांनी नाराजी व्यक्त केली.
इतक्या धावपळीत बैठक का घेण्यात येत आहे ? सर्वसामान्य नागरीकांच्या कोणत्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे ? विशेष म्हणजे कोणत्याही अधिवेशना दरम्यान जिल्हा नियोजन समितीची बैठक घेता येत नाही ? असे अनेक प्रश्न खासदार इम्तियाज जलील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकी संदर्भात उपस्थित केले. तसेच बैठक ११ ऑगस्टला घेण्यात यावी याकरिता जिल्हाधिकारी यांना सुध्दा पत्राव्दारे कळविले आहे.
पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या आदेशाने दिनांक ७ ऑगस्ट २०२३ सोमवार रोजी सकाळी ११.०० वाजता, जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद येथे जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. परंतु लोकसभेचे अधिवेश दिनांक ११ ऑगस्ट २०२३ पर्यंत सुरु असल्याने त्यामध्ये देशातील अतिशय महत्वपूर्ण बाबींवर चर्चा होत आहे त्याकरिता तेथेही उपस्थित राहणे अत्यावश्यक असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले.
सर्वसामान्य नागरीकांचे व शेतकरी बांधवांचे समस्यांचे निराकरण होणेस्तव, जिल्ह्यातील गोरगरीब गरजु विद्यार्थ्यांना सर्वसोयीसुविधा मिळाव्या, टिनशेडच्या वर्गखोल्योंचे पक्के बांधकाम व्हावे तसेच जिल्ह्याच्या सर्वांगिण विकास व्हावा याकरिता जिल्हा नियोजन समितीची बैठक अतिशय महत्वपूर्ण आहे. सबब बैठकीत मला सुध्दा अनेक महत्वपूर्ण विषयावर चर्चा करुन जनतेशी निगडीत प्रस्ताव मांडायचे आहे. जिल्हा नियोजन समितीची बैठक माझ्यासाठी खुप महत्वाची असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले.