रामाच्या मदतीला राहीम

रामाच्या मदतीला राहीम

         सर्व काही संपलेल आहे याची धाक धूक मना मध्ये असतानाच, अजून काही तरी शिल्लक आहे याचा आनंद वाटावा, अशीच आज माझी स्थिती झालेली आहे. भारतातील धार्मिक तेढ परमोच्य बिंदूवर पोहोचवण्याच्या आटोकाट प्रयत्न सुरू असतानाच. महा कुंभमेळ्यातील अनागोंदी कारभारामुळे, जीव मेताकुटीला आलेल्या हिंदूंच्या मदतीला धावून आलेल्या, मुसलमान बंधूंच्या आपुलकीच्या भावने मुळे हा आनंद मला झाला. साधारणता एक महिन्यापूर्वी सुद्धा असाच लेख लिहिण्याचा प्रसंग आला होता. काश्मीरच्या कडाक्याच्या थंडीत, हिमवृष्टी झाल्यामुळे त्या ठिकाणी अडकून पडलेल्या पर्यटकांना, त्या परिसरातील मुसलमानांनी आपल्या घरात, मशिदीत आणि मदरशांमधून आश्रय दिला होता. त्या ठिकाणी अडकलेल्या हिंदू पर्यटकांनी, त्यावेळी तिथल्या मुसलमानांनी आपली कशाप्रकारे सरबराई केली याचे किस्से सांगितले होते. आज, या कुंभमेळ्यापासून मुसलमानांना दूर ठेवण्यात आले आहे. कुंभमेळ्यात त्यांना दुकान लावता येणार नाही असा फतवा फार पूर्वीच निघाला होता. कुंभमेळ्यात शाहीस्नान करण्या करता येणाऱ्या भक्तांनी, आपल्या गाडीचा ड्रायव्हर म्हणून देखील मुसलमानांना त्या ठिकाणी आणू नये असे बजावून सांगण्यात आले होते. अर्थात हा वाद प्रत्यक्षात हिंदू मुसलमान असा नसून, तो पूर्णपणे राजकीय स्वरूपाचा वाद आहे. दोन धर्मामध्ये जर एवढी पराकोटीची तेढ असती तर, देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री, देशात सलोख्याचे वातावरण नांदले पाहिजे असे आवाहन करताना दिसले असते. परंतु दोन समूह गुण्यागोविंदाने नांदत आहेत, असे बघून व्यासपीठा वरून धार्मिक तेढ निर्माण करणारी भाषण ठोकली जात असतात. कुंभमेळ्याच्या गर्दी पासून मुसलमान दूर होता. परंतु याच कुंभमेळ्यात भाविकांचे हाल होत आहेत, असे बघितल्यावर, तो स्वतःला आपल्या घरात कोंडून ठेवू शकला नाही. अडचणीत असणाऱ्या भक्तांची मदत करायला तो पुढे सरसावला. मशीद आणि आपल्या घरामधून या भक्तांना आश्रय देत, त्यांना अन्न आणि गरम कपडे पुरवणे हे त्यांनी आपले कर्तव्य समजले. 25 हजार लोकांना ब्लॅंकेट आणि हलवा पुरीचे जेवण, त्या भागातील मुसलमानांनी दिल्याचे वृत्त आहे. महाकुंभाच्या अवाढव्य पसाऱ्यात हा पंचवीस हजारचा आकडा फारच कमी आहे याची मला जाणीव आहे. परंतु खारीचा वाटा म्हणतात ते यालाच.एखाद्याच्या वाट्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात घृणा येत असताना, त्याच्याकडून माणुसकीची अपेक्षा केली जाऊ शकत नाही. परंतु माणुसकी अंगात असली, की आणीबाणीच्या प्रसंगात ती दबून राहू शकत नाही. हेच प्रयागराज च्या परिसरातील मुसलमानांनी दाखवून दिले आहे.
         याच परिसरात, भक्तांसाठी शिजणाऱ्या अन्नात, एका मोठ्या झाऱ्याने माती आणून टाकणारा पोलीस अधिकारी असल्याचे देखील आपल्याला बघायला मिळत आहे. या पोलीस अधिकाऱ्याला आता निलंबित केले असल्याचे समजते. परंतु कुंभमेळ्याच्या गर्दीत लोकांची अन्नान दशा झालेली असताना, अशा प्रकारे खाण्याच्या भांड्यात माती मिसळण्याकरता, कोणत्या दर्जाची अमानुषता अंगात भिजलेली असावी लागते, याची आपण कल्पना करू शकतो. गोदी मीडिया नामक चॅनल वर आपल्याला या संबंधीच्या बातम्या बघायला मिळणार नाहीत. या घटनेमुळे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, कसे गहिवरले, त्यांच्या डोळ्यात कसे पाणी आले हे दाखवण्यातच गोदी मीडियाला स्वारस्य होते. एवढ्या दुःखद घटनेनंतर, राज्याचे मुख्यमंत्री गहिवरले ही बातमी होऊ शकत नाही. मात्र हा गहिवर, त्यांना घटना घडल्यानंतर सतरा तासांनी का फुटला? ही मात्र निश्चितपणे बातमी होऊ शकते. या घटनेतील मृतकांचा आकडा नेमका किती आहे याबाबत प्रश्न विचारणे, ही सुद्धा बातमी होऊ शकते. मात्र एका दुर्घटनेनंतर राज्याचा मुख्यमंत्री त्यावर मौन बाळगून आहेत, एक बाबा, ज्याच्या मागे करोडो भक्त आहेत. तो मृतांना मोक्ष मिळाल्याचे असंवेदनशील वक्तव्य करत आहे या पार्श्वभूमीवर, या ठिकाणी मदत कार्य करायला मुसलमान धाऊन आले, ही मात्र महत्त्वाची बातमी ठरू शकते.

          तशी ही बातमी महत्त्वाचीच आहेत. परंतु या बातमीला हव्या त्या प्रमाणात फुटेज मिळू शकले नाही. "रामाच्या मदतीला रहीम" धावला, असे म्हटले असते. तर रामाला कमीपणा आला असता, असे या मीडियाला वाटले असावे. 

          "माझ्या देशातल्या समृद्ध त्यांनी आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे" असे आपण प्रार्थनेतून म्हणत असतो. परंतु आजच्या विद्यार्थ्यांना, ही प्रतिज्ञा केवळ पाठ्यपुस्तकाच्या पानावर छापलेली दिसून येते. या प्रार्थनेचे समाजात प्रतिबिंब पडते काय हा महत्त्वाचा प्रश्न आहे. लहानपणा पासून ज्या बालकाला हिंदू मुसलमान वादाचे बाळकडू पाजले गेले असेल. त्या बाळाला आपल्या प्रतिज्ञेतील या शब्दांचा अर्थ कसा कळणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्या करता, त्याला काश्मीरच्या थंडीत प्रवाशांना आश्रय देणाऱ्या आणि कुंभमेळ्याच्या अनागोदीत, भक्तांना मदत करणाऱ्या मुसलमानांचे उदाहरण डोळ्यापुढे ठेवावे लागेल. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असणारा भारत, याच बंधूभावाच्या भावनेतून उभा राहू शकतो हे आजच्या पिढीने लक्षात घेतले पाहिजे.

            झालेल्या दुर्घटनेत काही घातपात झाला आहे का? हे शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घातपात झाला असेल, तर आपल्या अंगावरचे घोंगडे झटकण्याची व्यवस्था होईल, असे राज्यकर्त्यांना वाटत असावे. परंतु देशातील धार्मिक सलोखा टिकून राहावा, या दृष्टिकोनातून मुसलमानांनी पुढे केलेला मदतीचा हात मला जास्त महत्त्वाचा वाटतो. याच कुंभमेळ्यात मुसलमानांना स्टॉल लावण्यावर बंदी करण्यात आली होती. कावड यात्रेच्या वेळी त्यांच्या दुकानातून कोणी खाद्य वस्तू खरेदी करू नये म्हणून, दुकानावर, दुकानदाराच्या नावाच्या पाट्या लावण्याची सक्ती करण्यात आली होती. त्याच्या हातचे न खाल्ल्याने आमची शुद्धता टिकून राहते, असा दावा करण्यात आला होता. आज काश्मीर असो वा कुंभमेळा, आपत्कालीन परिस्थितीत त्याच मुसलमानांच्या घरात जाऊन, त्यांच्याच हाताने शिजलेले अन्न तुम्हाला खावे लागले आणि तुम्ही ते खाल्ले सुद्धा. ते स्वतः मासाहार करतात म्हणून, अडचणीच्या वेळी मासाहाराच्या थाळ्या त्यांनी तुमच्या पुढे ठेवल्या नाहीत. तर तुम्हाला आवडणारे शुद्ध शाकाहारी  हलवा पूरीचे जेवण तुम्हाला दिले. हे सर्व या ठिकाणी सांगण्याचे कारण म्हणजे, समाजात धार्मिक विद्वेशाचे विषारी बीज पेरण्याचे काम आता कुठेतरी थांबवलं गेलं पाहिजे असे मनापासून वाटत आहे. आपले राज्यकर्ते कधीच या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार नाहीत. त्यामुळे समाजात सलोखा राखण्याची जबाबदारी, प्रत्येक नागरिकाला स्वतःहून उचलायची आहे.

          कुंभमेळ्यात येण्याचे निमंत्रण देणारे मेसेज, कालपर्यंत प्रत्येकाच्या मोबाईलवर सुरू होते. एवढ्या लोकांची व्यवस्था करण्याची आपली ऐपत आहे की नाही हे तपासून न बघताच, असे मेसेज पाठवले गेलेत. आणि आता दुर्घटना झाल्यानंतर मेसेज पाठवणे बंद देखील करून टाकले. उत्तर प्रदेश सरकारने, भक्तांच्या करण्यात आलेल्या सोयी सुविधांचा जो ढोल पीटला होता, त्याला बळी पडून, अमरावतीच्या एका नेत्याने, जवळपास दहा लक्झरी बस मधून भक्तांना कुंभमेळ्यात नेण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यांनी सांगितलेली रक्कम भरून, भक्त कुंभमेळ्याकडे निघाले सुद्धा. परंतु तिथे असलेल्या गोंधळाच्या परिस्थितीमुळे या आयोजकाला तिथून परागंदा व्हावे लागले ,अन्यथा या भक्तांच्या हातचा मार खाण्याशिवाय त्याच्या पुढे पर्याय नव्हता.एखादा व्यक्ती एवढ्या लोकांना घेऊन कुंभमेळ्यात जाण्याची योजना आखू शकतो, त्यामागे, त्या ठिकाणी या लोकांची उत्तम व्यवस्था होऊ शकते, असे तिथल्या सरकारने दिलेले आश्वासन हेच महत्त्वाचे कारण ठरते. आपल्याकडे अशा गर्दीचे वर्णन करत असताना, "मायले लेकरू भारी होतं" अशी गर्दी होती असं म्हणतात. आईला लेकरू भारी होत असणाऱ्या गर्दीत, हा आयोजक आपण सोबत नेलेल्या सहाशे लोकांची व्यवस्था कशी लावू शकणार होता, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तो देखील उत्तर प्रदेश सरकारच्या भूलथापांना बळी पडूनच, त्या ठिकाणी गेला होता. तिथून गायब झाला तरी, परतल्या नंतर त्याला अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागणार आहे. परंतु अशा परिस्थितीत त्या परिसरातील मुसलमानांनी आपल्या परीने, या यात्रेकरूंना मदत करण्याचा प्रयत्न केला. काश्मीरमध्ये तर थंडीच्या काळात बाहेर जाता येत नाही म्हणून, पुढच्या काही दिवसांचे अन्नधान्य, लोक आपल्या घरात भरून ठेवतात, परंतु अडकलेल्या प्रवाशांना यातले अन्न खाऊ घातले, तर आपण काय खायचे? असा विचार न करता, तिथल्या मुसलमानांनी या प्रवाशांना मदत केली होती. तीच परिस्थिती कुंभमेळ्यातील आहे. यापासून आपण काही धडा घेणार आहोत की नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आज रहीम रामाच्या मदतीला धावून आल्याचे चित्र बघायला मिळत आहे. उद्या राम रहीम हात हातात घेऊन, देशाला विकासाच्या दिशेने नेत असल्याचे चित्र आपल्याला बघायचे असेल. तर आपल्या मनात कालवले गेलेले, धार्मिक विद्वेषाचे जहर बाहेर काढून फेकणे गरजेचे आहे.

-पंकज वैद्य, अमरावती
9823014040