लाचखोर ठाणेदार गंडला! दालनातच १ लाखांसह रंगेहात
यवतमाळ, दि. १२ डिसेंबर (वसीम शेख):यवतमाळ शहरातील अवधूतवाडी पोलिस ठाण्याचा लाचखोर पोलीस निरीक्षक आणि वर्ग–१ अधिकारी नरेश रणधीर याला अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या दालनातच एक लाख रुपये लाच स्वीकारताना पंचांसमक्ष रंगेहात पकडले. या धडक कारवाईमुळे यवतमाळ जिल्हा पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
या प्रकरणात तक्रारदाराने ११ डिसेंबर रोजी एसीबीकडे लेखी तक्रार दिली होती. तक्रारीनुसार, तक्रारदाराने आपल्या एका मित्रासाठी पैशांची गरज असल्याने दुसऱ्या मित्राकडून १० लाख रुपये उभे करून सहा महिन्यांसाठी दिले होते. मात्र सहा महिने उलटूनही पैसे परत न मिळाल्याने तक्रारदाराने १० डिसेंबर रोजी अवधूतवाडी पोलिस ठाण्यात अर्ज दिला. ही तक्रार दिल्यानंतर पोलीस निरीक्षक नरेश रणधीर याने तक्रारदाराला त्यांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता.
१२ डिसेंबर रोजी एसीबीने या तक्रारीची पडताळणी केली असता, नरेश रणधीर यानी तक्रारदाराकडे तीन लाख रुपयांची लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तात्काळ सापळा रचण्यात आला आणि या सापळ्यात नरेश रणधीर यानी तक्रारदाराकडून तीन लाखांपैकी एक लाख रुपये लाच म्हणून स्वीकारताच त्याला रंगेहात पकडण्यात आले. अटक झाल्यानंतर लाचखोर पोलीस निरीक्षक नरेश रणधीरचे याच्याविरुद्ध त्याच्याच अवधूतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही संपूर्ण कारवाई अमरावती एसीबी परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चित्रा मेसरे, पोलीस निरीक्षक स्वप्निल निराळे, पोलीस शिपाई शैलेश कडू, उपेंद्र थोरात, वैभव जायले, चालक स.पो.उ.नि. सतीश किटूकले आणि चालक पो.कॉ. राजेश बहिराट यांच्या पथकाने यशस्वीपणे पूर्ण केली.