गोपीनाथ मुंडेंच्या स्मारकासाठी ३ तरुणांचा आत्मदहनाचा प्रयत्न

गोपीनाथ मुंडेंच्या स्मारकासाठी ३ तरुणांचा आत्मदहनाचा प्रयत्न

औरंगाबाद, ४ जून : भारतीय जनता पार्टीचे दिवंगत खासदार गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक उभारण्यास विलंब होत असल्याने एकाने डिझेलची बॉटल अंगावर ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. औरंगाबाद येथील जालना रोडवरील  शासकीय दुध डेअरी परिसरात हा प्रकार घडला. पोलीस आयुक्तांनी काढलेले महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम 37 (1)(3) चे आदेशांचा उल्लंघन करीत  कोणतीही परवानगी न घेता निदर्शने केली आणि आत्मदहनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

      योगेश प्रल्हादराव खाडे, रामदास बाबुराव वाघ, शुभम गणपत बोंगाने सर्व राहणार जयभवानीनगर, 13 वी योजना, जागृत हनुमान मंदिराशेजारी, औरंगाबाद यांच्याविरुद्ध क्रांतीचौक पोलिस स्टेशनमध्ये भारतीय दंडविधानाचे कलम 309 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

      यासंदर्भात क्रांतीचौक पोलिस स्टेशनचे पोलीस हवालदार भास्कर दामु नरवडे यांनी एफ आय आर मध्ये तक्रार केली की, दिनांख ३ जून रोजी ११:०० वाजता औरंगाबाद शहरातील शासकीय दुध डेअरी येथे आरोपी विनापरवानगी जमा झाले. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे शासकीय दुध डेअरी येथे स्मारक होण्यास वर्षानुवर्ष विलंब होत आहे म्हणून विना परवानगी शासकीय दुध डेअरी येथे जमा होऊन घोषणाबाजी केली. तसेच पोलिसांची नजर चुकवून प्लास्टिकच्या बॉटल मधील डिझेल सारखे पदार्थ अंगावर ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.