सिल्लोड शहरात पोलीस अधिकाऱ्यांसमोरच गुंडांची व्यापाऱ्याला जीवे मारण्याची धमकी

सिल्लोड शहरात पोलीस अधिकाऱ्यांसमोरच गुंडांची व्यापाऱ्याला जीवे मारण्याची धमकी

सिल्लोड, १८ नोव्हेंबर : सिल्लोड शहरात गुंडांची एवढी हिंमत वाढली आहे की पोलिस अधिकाऱ्यांसमोर ते जिवे मारण्याची धमकी देण्यास पण घाबरत नाहीत. असाच प्रकार १७ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजेचे सुमारास सिल्लोड शहरातील जाकीर हुसेन नगर मध्ये घडला आहे.

           जाकिर हुसेन देशमुख यांनी पोलीस स्टेशन सिल्लोड येथे 'वेलकम लॉज' चे मालक इद्रिस नफीस सिद्दिकी, आणि  एजाज़ साबीब सिद्दिकी यांचे विरुद्ध त्यांनी सार्वजनिक उपद्रव केल्याचे कारणाने रिपोर्ट दिली. त्यावरुन अपराध क्रमांक २२०/२३ भारतीय दंडविधानाचे कलम २६९,२७०, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

          या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस स्टेशन सिल्लोड चे पोलीस ऑफिसर अंभोरे हे दुपारी १२ वाजेचे सुमारास घटनास्थळी जाकीर हुसेन नगर येथे गेले होते. पंचनामा करण्यासाठी त्यांनी दोन पंचांना बोलावले. पंचांसमक्ष पंचनामा करीत असताना या गुन्ह्यातील आरोपी इद्रिस नफीस सिद्दिकी, आणि एजाज़ साबीब सिद्दिकी हे तिथे आले. आणि त्यांनी जोर जोराने आरडाओरड करीत फिर्यादी जाकीर देशमुख यांना उद्देशून जीवे मारण्याची धमकी दिली. एजाज़ साबीब सिद्दिकी धमकी देताना म्हणाला की, "बहोत फडफड कर रहा, इसका कांड करना पडता, इसको टपकाना पडता, बहुत मस्ती मे आगया, रोज के नये नये फंडे लारहा, बहुत परेशान कर रहा". 

          पोलीस अधिकाऱ्यांसमोरच अशा प्रकारे गुंडांनी धमकी दिल्याने फिर्यादी अत्यंत घाबरलेले आहेत. पोलिसांसमोर अशा प्रकारची धमकी देण्याची हिंमत हे गुंड कोणाच्या भरोश्यावर करीत आहेत? जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी फिर्यादींनी  पोलीस स्टेशन सिल्लोड शहर येथे जाऊन पोलीस निरीक्षक उदार यांना भेटून तक्रार केली आहे. या जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणात पोलीस कोणती प्रतिबंधक कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.