छावणी पोलीस ठाण्यात गुन्हे दडपण्याचा काळा खेळ! FIR गायब, न्यायही गायब?

छावणी पोलीस ठाण्यात गुन्हे दडपण्याचा काळा खेळ! FIR गायब, न्यायही गायब?

छत्रपती संभाजीनगर, २८ एप्रिल : कायद्याचे रक्षण करणारेच जर गुन्हे दडपण्याचे काम करत असतील, तर सामान्य नागरिकांनी न्यायासाठी कुणाकडे धाव घ्यायची? छावणी पोलीस ठाण्याच्या कारभारावर सध्या असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. तब्बल पावणे दोन महिने उलटूनही एका गंभीर दखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली नसल्याने पोलिसांच्या भूमिकेवर संशयाचे गडद सावट पसरले आहे.
इमरान खान उस्मान खान (वय २४) या तरुणाने १२ मार्च २०२६ रोजी घडलेल्या धक्कादायक प्रकाराची लेखी प्रथम खबर छावणी पोलीस ठाण्यात दिली. वक्फ बोर्डातून आरटीआय संबंधित कागदपत्रे आणि पेन ड्राईव्ह घेऊन बाहेर पडत असताना शेख अब्दुल बशीर याने त्याला अडवून गळा आवळत जबरदस्तीने आत खेचले, झडती घेत कागदपत्रे आणि पेन ड्राईव्ह हिसकावून घेतली. एवढ्यावरच थांबून न राहता घाटी रुग्णालयासमोर पुन्हा अडवून “पोलीस स्टेशनला गेलास तर तुझ्यावर खोटा गुन्हा दाखल करीन” अशी उघड धमकीही दिली.

        हा प्रकार केवळ साधा वाद नाही, तर गंभीर स्वरूपाचा दखलपात्र गुन्हा असून भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९ अंतर्गत कारवाई होणे अपेक्षित होते. परंतु धक्कादायक बाब म्हणजे, लेखी तक्रार देऊनही छावणी पोलिसांनी अद्याप गुन्हा नोंदवलेला नाही.

आवक-जावक’च्या शिक्क्यातच गुन्हे गाडले जातात?
        संभाजीनगर शहरातील पोलीस ठाण्यांची एक विचित्र आणि धक्कादायक पद्धत समोर येत आहे. तक्रारदार जेव्हा लेखी तक्रार देतो, तेव्हा तो थेट FIR म्हणून नोंदवला जात नाही, कंप्यूटर मध्ये त्याची नोंद घेतली जात नाही. उलट “आवक-जावक” लिपिकाकडे तक्रार देऊन फक्त शिक्का मारून घेतला जातो आणि प्रकरण थंडबस्त्यात टाकले जाते. त्यामुळे शेकडो गंभीर गुन्हे अधिकृत नोंदीत येतच नाहीत, अशी चर्चा शहरभर रंगली आहे.

परिवेक्षकीय अधिकाऱ्यांची झोप की मौनसंमती?
       सहाय्यक पोलीस आयुक्त आणि झोनचे पोलीस उपायुक्त यांनी जर त्यांच्या हद्दीतील “स्थानिक अर्ज रजिस्टर”ची बारकाईने तपासणी केली, तर प्रत्येक पोलीस ठाण्यात अशा शेकडो नोंद न झालेल्या प्रकरणांचा भांडाफोड होऊ शकतो. मात्र प्रश्न असा आहे की, वरिष्ठ अधिकारी याकडे डोळेझाक करत आहेत का?

गुन्हे दडपण्याचा उद्योग? कारवाई होणार का?
       जर या प्रकाराची निष्पक्ष आणि सखोल चौकशी झाली, तर केवळ संबंधित पोलीस अधिकारीच नव्हे, तर संपूर्ण यंत्रणाच संशयाच्या भोवऱ्यात सापडू शकते. गुन्हे दडपल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होऊन निलंबन ते बडतर्फीपर्यंत कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नागरिकांचा सवाल : न्याय मिळणार की फक्त कागदोपत्री खेळ?
         आज प्रश्न केवळ एका इमरान खानचा नाही, तर संपूर्ण संभाजीनगर शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा आणि न्यायव्यवस्थेवरील विश्वासाचा आहे. जर पोलीस ठाण्याचे दरवाजेच न्यायासाठी बंद असतील, तर नागरिकांनी कोणाकडे दाद मागायची?
आता पाहायचे इतकेच—वरिष्ठ अधिकारी खरोखर जागे होणार का, की छावणी पोलीस ठाण्याचा हा ‘गुन्हे दडपण्याचा कारभार’ असाच सुरू राहणार?