राष्ट्रीय स्तरावरील बँकांची पहिल्यांदाच औरंगाबादेत बैठक : केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड
औरंगाबाद : 16 सप्टेंबर रोजी शहरातील ताज हॉटेल मध्ये पहिल्यांदाच राष्ट्रीय स्तराची बँकांची बैठक होणार आहे. या बैठकीत केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार असून शहरातील डीएमआयसी प्रकल्पात मोठे उद्योग कसे येतील याबाबत सुद्धा चर्चा होणार असल्याची माहिती केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
या बैठकीचे उद्देश यांबाबत सविस्तर माहिती देत असताना केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी सांगितले की पंतप्रधान जनधन योजना पंतप्रधान मुद्रा कर्ज योजना डिजिटल मनी ट्रान्सफर यासंबंधी सविस्तर चर्चा होणार आहे. तसेच केंद्र सरकारने डीएमआयसी प्रकल्पासाठी तीन हजार कोटीचा निधी दिला असून शहराच्या विकासासाठी या प्रकल्पात राष्ट्रीय पातळीवरील मोठे उद्योग कसे आणता येतील याबाबत सुद्धा चर्चा होणार आहे. गरीब आणि शेतकऱ्यांना सुलभतेने कर्ज कसे उपलब्ध करून देता येतील या बाबतीत सुद्धा मोठे निर्णय घेण्यात येतील.
या बैठकीत राष्ट्रीय स्तरावरील सर्व बँकांचे चेअरमन मुख्य कार्यकारी अधिकारी केंद्रीय अर्थ मंत्रालयात सचिव नाबार्ड चे चेअरमन डी एम आय सी चे संचालक निती आयोगाचे संचालक आणि उच्च पदस्थ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकी सोबतच उद्योजक आणि व्यावसायिकांशी सुद्धा या बँकर्स ची चर्चा घडवून आणली जाणार असल्याची माहिती डॉक्टर भागवत कराड यांनी पत्रकारांना दिली.