तालिबानचा फरमान : मुलींनी हिजाब परिधान करूनच शिक्षण घ्यावे

तालिबानचा फरमान : मुलींनी हिजाब परिधान करूनच शिक्षण घ्यावे
students wearing hijaab

अफगाणिस्तानातील विद्यापीठांचं वर्गीकरण लिंगानुसार (मुले-मुली यांच्यासाठी स्वतंत्र) केलं जाईल, असं तालिबाननं म्हटलं आहे. या संस्थांमध्ये नवीन इस्लामी ड्रेसकोडही सुरू केला जाणार आहे.

अफगाणिस्तानात सहशिक्षण म्हणजे मुला-मुलींना एकत्र शिक्षणाची परवानगी दिली जाणार नाही, असं नवे उच्च शिक्षणमंत्री अब्दुल बकी हक्कानी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

विद्यापीठांमध्ये शिकवल्या जाणाऱ्या विषयांचा आढावा घेणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

तालिबानच्या पहिल्या कार्यकाळादरम्यान 1996 आणि 2001 दरम्यान अफगाणिस्तानातील शाळा आणि विद्यापीठांमध्ये मुलींच्या शिक्षणावर बंदी घालण्यात आली होती.

देशातील राष्ट्रपती भवनावर झेंडा फडकावल्यानंतर दुसऱ्या दिवशी तालिबान सरकारनं नवीन उच्च शिक्षण धोरणाची घोषणा केली. हा झेंडा म्हणजे त्याचं शासन सुरू झाल्याचे संकेत आहेत.

'नागरिक मुस्लिम आहेत, ते हे स्वीकारतील'

अफगाणिस्तानवर तालिबाननं ताबा मिळवला त्यापूर्वीच्या शिक्षण धोरणाच्या तुलनेत नवं धोरण खूप वेगळं आहे.

आधी देशातील विद्यापीठांमध्ये मुला-मुलींच्या एकत्र शिक्षणाला मान्यता होती तसंच विद्यार्थिनींना ड्रेसकोडचं पालनही करावं लागत नव्हतं.

मात्र, उच्च शिक्षणमंत्री हक्कानी यांना मात्र मुला-मुलींनी एकत्र शिकण्याचा निर्णय रद्द करण्याबाबत काहीही खेद वाटला नसल्याचं दिसून आलं.

"एकत्र शिकण्याची ही पद्धत बंद करण्यात आम्हाला काहीही अडचण नाही. येथील नागरिक मुस्लीम आहेत आणि ते याचा स्वीकार करतील," असं ते म्हणाले.

'पडद्याआडून शिकवण्यासाठी पुरुष शिक्षकांची मदत घेऊ'

या नव्या नियमांमुळं महिला शिक्षणापासून दूर जातील असं काही जणांचं मत आहे. कारण विद्यापीठांमध्ये अशा प्रकारे वेगवेगळे वर्ग घेण्यासाठी पुरेशा सुविधा उपलब्ध नाहीत.

मात्र, महिला शिक्षकांची संख्या पुरेशी असल्याचं हक्कानी यांनी जोर देत म्हटलं. ज्याठिकाणी संख्या कमी असेल, त्याठिकाणी इतर पर्यायांच विचार केला जाईल असंही ते म्हणाले.

''हे सर्व विद्यापीठाच्या क्षमतेवर अवलंबून असेल. आम्ही पडद्याच्या आडून शिकवण्यासाठी पुरुष शिक्षक किंवा तंत्रज्ञानाची मदतही घेऊ शकतो,'' असंही हक्कानी म्हणाले.

देशातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये मुले आणि मुलींना वेगवेगळं शिक्षण दिलं जाईल. अशा प्रकारच्या रुढी अफगाणिस्तानात पूर्वापार चालत आलेल्या आहेत.

विद्यार्थिनींना आता हिजाबही परिधान करावा लागेल. पण त्याचा अर्थ केवळ डोकं झाकायचं की संपूर्ण चेहराही झाकावा लागले, हे मात्र हक्कानी यांनी स्पष्ट केलेलं नाही.

तालिबानला हवा आहे मुस्लिम अभ्यासक्रम

विद्यापीठांमध्ये शिकवल्या जाणाऱ्या विषयांचा आढावाही घेतला जाईल, असंही हक्कानी यांनी सांगितलं.

''तालिबानला योग्य आणि मुस्लीम अभ्यासक्रम तयार करण्याची इच्छा आहे. तो आमच्या मुस्लीम, राष्ट्रीय आणि ऐतिहासिक मुल्यांना अनुरुप असेल. त्याचबरोबर तो इतर देशांशी स्पर्धा करण्यासाठीही योग्य असावा,'' असंही हक्कानी म्हणाले.

काबूलच्या शहीद रब्बानी विद्यापीठात महिलांनी तालिबानच्या लैंगिक धोरणाला पाठिंबा दर्शवला. त्यानंतर तालिबाननं उच्च शिक्षणाच्या नव्या धोरणाची घोषणा केली आहे.

शनिवारी (11 सप्टेंबर) झालेल्या या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या शेकडो महिलांपैकी बहुतांश महिलांनी काळा बुरखा परिधान केलेला होता, तसेच त्यांच्या हाती तालिबानचे झेंडे होते.

यावेळी तालिबानच्या नव्या सरकारचं कौतुक करणारी भाषणं झाली आणि महिलांच्या अधिकारांचं रक्षण करण्याची मागणी करणाऱ्यांवर जोरदार टीका करण्यात आली.