लेबर कॉलनीतील 338 घरांच्या पाडापाडीला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती द्यावी : खा. इम्तियाज जलील

लेबर कॉलनीतील 338 घरांच्या पाडापाडीला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती द्यावी : खा. इम्तियाज जलील

दिवाळी सणाच्या आनंदमय वातावरणात निवासस्थाने जमीनदोस्त व निष्काषण करण्याचे हुकुमशाही आदेशाला मुख्यमंत्र्यांनी स्थगती द्यावी - खासदार इम्तियाज जलील

विश्वासनगर लेबर कॉलनी रहिवाश्यांना बेघर करणे अशोभनीय व निंदनिय; सर्वपक्षीय लोकप्रतिनिधीनी पाठीशी उभे राहावे – खासदार इम्तियाज जलील

औरंगाबाद : विश्वासनगर लेबर कॉलनीत असलेले निवासस्थाने व सदनीका दिनांक ०८/११/२०२१ रोजी सकाळी १०.०० वाजेपर्यंत स्वखर्चाने घरगुती सामान काढुन रिकामे करण्याचे आदेशाचे फलक ऐन दिवाळी सणाच्या आनंदमय वातावरणात जिल्हा प्रशासनाच्या वतीने लावण्यात आल्याने नागरीकांच्या मनात भयभीत व दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याने खासदार इम्तियाज जलील यांनी सदरील परिसरातील स्थानिक नागरीकांची भेट घेवुन त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहुन त्यांना सर्वेतोपरी मदत करण्याचे आश्वासित केले. तसेच लेबर कॉलनी वासीयांना न्याय मिळवुन देण्यासाठी सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींनी एकजुटीने लढण्याचे आवाहन खासदार इम्तियाज जलील यांनी केले आहे.  
          नागरीकांसोबत चर्चा करुन त्यांचे म्हणणे ऐकल्यानंतर आज खासदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना पत्राव्दारे ऐन दिवाळी सणाच्या आनंदमय वातावरणात औरंगाबाद स्थित विश्वासनगर लेबर कॉलनीतील निवासस्थाने आठ दिवसात जमीनदोस्त व निष्काषण  करण्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने काढण्यात आलेले हुकुमशाही फर्मान तात्काळ मागे घेण्याचे आदेश संबंधितांस निर्गमित करुन सदरील परिसरातील नागरीकांना सुध्दा दिवाळी सणाच्या आनंदोत्सवात सामील करुन घेण्याची विनंती केली आहे.
          मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्यासह पालकमंत्री सुभाष देसाई, विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण, पोलीस आयुक्त निखील गुप्ता, महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांना सुध्दा पत्राव्दारे विश्वासनगर लेबरकॉलनी वासीयांना मदत करण्याची विनंती केली.
          खासदार इम्तियाज जलील यांनी दिलेल्या पत्रात नमुद केले की, दिवाळीच्या शुभ मूहूर्तावर सर्वसामान्य नागरीक स्वप्नातील घरे घेवुन आनंद व्दिगुणीत करतात. विश्वासनगर लेबर कॉलनीत दिवाळी सण आनंदोत्सवात साजरा करण्यासाठी महिला फराळाची तयारीत व्यस्त असतांना तसेच लहान मुले-मुली  मोठ्या जल्लोषात दिवाळी साजरी करण्याचे स्वप्न पाहत असतांना अचानक जिल्हा प्रशासनाच्या वतीने त्यांना बेघर करण्याचे अशोभनीय वर्तन करण्यात आले आहे.
          कोविडच्या काळात सर्व प्रकारचे उद्योगधंदे बंद असल्याने सर्वसामान्य नागरीकांचे हातचे काम सुध्दा गेल्याने सर्वसामान्य नागरीकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची होवून उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. मागच्या वर्षीची दिवाळी सुध्दा कशा प्रकारे साजरी करण्यात आली हे सर्वश्रुत आहे. सद्यस्थितीत बाजापेठा व उद्योगधंदे सुरु करण्यात आले असुन तोच आता पुन्हा कोविडची तिसरी महाभयंकर लहर येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत असुन त्यासाठी योग्य ते उपाययोजना युध्दस्तरावर राबविले जात असल्याचे निदर्शनास येत असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी नमुद केले.  
          महाराष्ट्र राज्यात सर्वसामान्य गोरगरीब नागरीकांना स्वत:ची घरे मिळावी म्हणुन केंद्र व राज्य शासनाच्या वतीने विविध घरकुल योजना व प्रकल्प राबविण्यात येत आहे. परंतु औरंगाबादेत तर याउलटच परिस्थिती असल्याचे दिसत आहे, ऐन दिवाळीच्या शूभ मूहूर्तावर बेघर करण्याची ऐवढी घाई कशाला ? कोरोना मुळे नागरीकांकडे जमा असलेली सर्व तुटपुंजी संपलेली आहे. नागरीकांना इतरत्र ठिकाणी राहण्यासाठी निवासस्थानाची व्यवस्था न करताच हुकुमशाही फर्मानाव्दारे बेघर करण्याचे जिल्हा प्रशासनाने केलेले कृत्य हे निंदनीय असुन राज्य सरकारची प्रतिमा सर्वसामान्य नागरीकांच्या मनात मलीन होत असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना दिलेल्या पत्रात नमुद केले आहे.