शहरातील कचरा प्रश्न : रेड्डी कंपनीविरुद्ध एम आय एम आक्रमक

शहरातील कचरा प्रश्न : रेड्डी कंपनीविरुद्ध एम आय एम आक्रमक

औरंगाबाद, दि.1 : औरंगाबाद शहरातील कचरा गोळा करण्यासाठी महानगरपालिकेने रेड्डी कंपनीला ठेका दिलेला आहे. ठेक्यातील अटींप्रमाणे रेड्डी कंपनी शहरातील 100 टक्के कचरा न उचलता फक्त 30 ते 40 टक्केच कचरा उचलते. प्रत्येक वॉर्डातून कचरा उचलण्यासाठी सहा गाड्यांची आणि मनुष्यबळाची आवश्यकता असताना तेवढ्या गाड्या आणि मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जात नाही. कचरा उचलणाऱ्या गाड्यांचे भोंगे बंद आहेत, घंटी पण वाजवली जात नाही. मुस्लिम बहुल वार्डातील कचरा उचलण्यात या कंपनीकडून भेदभाव केला जातो. जागोजागी कचर्‍याचे ढीग पडलेले आहेत, त्यामुळे परिसरात दुर्गंधी सह अनेक आजार पसरत आहेत. महानगरपालिकेचे अधिकारी पण रेड्डी कंपनीच्या कामकाजावर जाणीवपूर्वक अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत आहेत. अशा अनेक तक्रारी घेऊन आज एम आय एम चे अनेक माजी नगरसेवकांनी नासिर सिद्दिकी यांच्या नेतृत्वाखाली आक्रमक पवित्र घेत महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त ए ए गिरी यांच्या दालनात धडक दिली.

सहाय्यक आयुक्त गिरी यांचेसह झालेल्या चर्चेत गिरी यांनी सांगितले की महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी सकाळी पाच वाजेपासून फिल्डवर असतात, रेड्डी कंपनीचे अधिकारी कर्मचारी ऐकत नाहीत. त्यांच्याविषयी अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मागे या कंपनीला सात लाख रुपये दंड पण ठोठावण्यात आला आहे. 

नासिर सिद्दिकी यांनी इशारा दिला की आठ दिवसात जर रेड्डी कंपनीने आपल्या वर्तणुकीत सुधारणा केली नाही तर एम आय एमच्या स्टाईलने कंपनीविरुद्ध तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

यावेळी एम आय एमचे जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर साजिद, आयुब जागीरदारष हाजी इसाक, विकास एडके, शेख अहमद, रफिक पालोदकर वाजीद जागीरदार इत्यादींची उपस्थिती होती.