सोशल मीडियावर गुन्हेगारीचे ग्लॅमर; सायबर पोलिसांचा दणका! कुख्यात गुन्हेगारांच्या ‘रिल्स’वर डिजिटल पाळत; आठवडाभरात ४ गुन्हे दाखल

सोशल मीडियावर गुन्हेगारीचे ग्लॅमर; सायबर पोलिसांचा दणका! कुख्यात गुन्हेगारांच्या ‘रिल्स’वर डिजिटल पाळत; आठवडाभरात ४ गुन्हे दाखल

छत्रपती संभाजीनगर | २८ ऑगस्ट: सोशल मीडियावर रिल्सच्या माध्यमातून गुन्हेगारी संस्कृतीचे उदात्तीकरण करून तरुणांना गुन्हेगारीकडे आकर्षित करण्याचा आणि समाजात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुख्यात गुन्हेगारांविरोधात छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली आहे. गुन्हेगारीचे ‘ग्लॅमरायझेशन’ करणाऱ्या सोशल मीडिया अकाउंट्सवर सायबर पोलिसांची करडी नजर असून, अवघ्या एका आठवड्यात अशा प्रकरणांत विविध कलमांखाली तब्बल ४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

      कुख्यात आरोपींकडून सोशल मीडियावर घातक शस्त्रांचे प्रदर्शन, कारागृह, न्यायालय, रुग्णालय यांसारख्या प्रतिबंधित ठिकाणी मोबाईलचा वापर, पोलिसांच्या वाहनात किंवा हातात बेड्या असतानाचे दादागिरीचे व्हिडिओ तसेच आक्षेपार्ह रिल्स तयार करून ते नातेवाईक व मित्रांच्या माध्यमातून प्रसारित करण्याचा प्रकार सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. या माध्यमातून टोळीचे वर्चस्व कायम ठेवून समाजात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

आठ आरोपींविरोधात गुन्हे

       भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत सार्वजनिक शांतता भंग करणे तसेच समाजात भीती, दहशत आणि असुरक्षिततेची भावना निर्माण करणाऱ्या कृत्यांप्रकरणी चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

- जवाहरनगर पोलीस ठाणे — गुन्हेगार पवन दिवेकर याच्यासह "pd_company_maharashtra" प्रोफाइल वापरकर्त्याविरुद्ध गुन्हा.
- जवाहरनगर पोलीस ठाणे — गुन्हेगार टिपू शेख ऊर्फ टिप्यासह "tipu_shaikh_302" प्रोफाइल वापरकर्त्याविरुद्ध गुन्हा.
- बेगमपुरा पोलीस ठाणे — गुन्हेगार इम्रान मेहंदी याच्यासह "ruhina_imran_mehndi" प्रोफाइल वापरकर्त्याविरुद्ध गुन्हा.
- बेगमपुरा पोलीस ठाणे — गुन्हेगार विशाल पुसे याच्यासह "vishal_puse_109" प्रोफाइल वापरकर्त्याविरुद्ध गुन्हा.

‘गुन्हेगारीचे ग्लॅमरायझेशन खपवून घेणार नाही’

      पोलीस आयुक्त प्रविण पवार यांनी सोशल मीडिया वापरकर्त्यांना सज्जड इशारा दिला आहे. रिल्सच्या माध्यमातून गुन्हेगारांचे उदात्तीकरण, शस्त्रांचे प्रदर्शन किंवा गुन्हेगारांना समर्थन देणारे साहित्य तयार करून ते पोस्ट अथवा शेअर करणाऱ्यांवर डिजिटल पाळत ठेवण्यात येत आहे. अशा प्रकारांमध्ये थेट गुन्हे दाखल करण्यात येतील, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे.

      केवळ सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी हे प्रकार होत आहेत की, कारागृहात असतानाही टोळीची दहशत कायम ठेवून त्यातून आर्थिक फायदा मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे, याचाही तपास केला जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

      'सोशल मीडिया हे अभिव्यक्तीचे माध्यम आहे; गुन्हेगारीचे ग्लॅमरायझेशन करण्याचे व्यासपीठ नाही,’ असा स्पष्ट संदेश छत्रपती संभाजीनगर सायबर पोलिसांनी दिला आहे.

सायबर पोलिसांची विशेष मोहीम

       ही कारवाई पोलीस उपआयुक्त (गुन्हे) शशिकांत सातव आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) मजहर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव, सहायक पोलीस निरीक्षक कदिर देशमुख, पोलीस उपनिरीक्षक गणेश गिरी तसेच पोलीस अंमलदार योगेश तळवंदे, सोनाली वडनेरे, संगिता दुबे, गोकुळ कुतरवाडे, अभिजीत खोतकर आणि अल्ताफ पठाण यांनी केली.