बामसेफ व राष्ट्रीय मूलनिवासी संघाचे महाराष्ट्र राज्य अधिवेशन उद्या छत्रपती संभाजीनगरात

बामसेफ व राष्ट्रीय मूलनिवासी संघाचे महाराष्ट्र राज्य अधिवेशन उद्या छत्रपती संभाजीनगरात

छत्रपती संभाजीनगर, दि. २२ ऑगस्ट : बामसेफ व राष्ट्रीय मूलनिवासी संघाच्या वतीने महाराष्ट्र राज्य अधिवेशन–२०२६ चे आयोजन रविवार, दि. २३ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आले आहे. सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात राज्यभरातील विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विचारवंत, महिला प्रतिनिधी, विद्यार्थी तसेच बहुजन समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती बामसेफचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. संजय गायकवाड यांनी दिली.

      या अधिवेशनाच्या आयोजनासंदर्भात आज, दि. २२ ऑगस्ट रोजी सुभेदारी गेस्ट हाऊस, छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. संजय गायकवाड यांनी अधिवेशनाची सविस्तर माहिती पत्रकारांना दिली. पत्रकार परिषदेस मनोज लोहे, सौ. सुजाता चौदांते, सौ. ज्योती मिसाळ, रिटायर्ड एसीपी रियाज़ देशमुख, संतोष साळवे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

     अधिवेशनाचे आयोजन राजयोग लॉन्स, मंगल कार्यालय, चिनार गार्डनच्या बाजूला, पडेगाव, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे करण्यात आले आहे. प्रसिद्ध आंबेडकरी शाहिर मा. शाहिर संभाजी भगत हे अधिवेशनाचे उद्घाटक असून, बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. वामन मेश्राम हे अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत. विविध सामाजिक, शैक्षणिक आणि बहुजन चळवळीतील मान्यवर वक्ते व पदाधिकारी विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.

सामाजिक व राजकीय प्रश्नांवर सखोल चर्चा
      सध्याच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि घटनात्मक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनात विविध महत्त्वपूर्ण विषयांवर विचारमंथन करण्यात येणार आहे. महिलांच्या प्रश्नांचे समाधान संघटन उभारणीशिवाय शक्य आहे का, यावर स्वतंत्र चर्चा होणार आहे.
तसेच २०२७ मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय जनगणनेत ओबीसींची जातनिहाय जनगणना रोखण्यामागे सत्ताधारी वर्गाचा कोणता डाव आहे, या प्रश्नावरही चर्चा केली जाणार आहे. पूना करारामुळे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसी समाजाला स्वतंत्र मतदारसंघाच्या अधिकारापासून वंचित करण्यात आले का?, याचाही ऊहापोह अधिवेशनात होणार आहे.

      EVM आणि VVPAT वरही स्वतंत्र सत्र
निवडणूक प्रक्रियेशी संबंधित EVM आणि VVPAT हा विषयही अधिवेशनातील महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. EVM लोकशाहीसाठी मारक ठरू शकते का, निवडणूक आयोगाकडून EVM ची पूर्व-पडताळणी अर्थात Mock Poll केली जाते; मात्र निवडणुकीनंतर VVPAT पडताळणी का केली जात नाही, या प्रश्नांवर स्वतंत्र सत्र आयोजित करण्यात आले आहे.

       याशिवाय शिक्षक पात्रता परीक्षा (TET), NEET परीक्षा, शिक्षणातील गुणवत्तेचा प्रश्न आणि बहुजन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक संधींवर होणारा परिणाम यावरही विचारविनिमय करण्यात येणार आहे. दूध उत्पादक संघटनांचे जाळे उभारणे आणि व्यापक संघटनात्मक आंदोलनाची गरज या विषयांवरही अधिवेशनात चर्चा होणार आहे.

आरक्षण आणि सामाजिक न्यायाच्या प्रश्नांवरही चर्चा
       आरक्षणाच्या लाभार्थी जाती समूहांमध्ये अंतर्गत भांडणे लावून आरक्षणाच्या मूळ संकल्पनेचे नुकसान करण्याचे प्रयत्न होत असल्याच्या मुद्द्यावरही अधिवेशनात चर्चा होणार आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक न्यायाच्या विचारांची आजच्या परिस्थितीत असलेली उपयुक्तता या विषयावरही विचारमंथन केले जाणार आहे.

      अधिवेशनातील विविध सत्रांमध्ये सामाजिक आणि बहुजन चळवळीतील अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत. यामध्ये मा. डॉ. विजय मुन, मा. मिलिंद टिपणीस, मा. सुरेश खोपडे, मा. उत्तम सोनकांबळे, मा. हरविंदर सिंग खालसा, मा. जनार्दन जंगले, मा. डॉ. सूरज पवार, मा. डॉ. त्र्यंबक कदम, मा. डॉ. डी. आंबाडे, मा. डॉ. अनिलकुमार माने, प्रा. डॉ. राजेश करपे, प्रा. डॉ. संजय दाभाडे, प्रा. डॉ. प्रकाश कांबळे आणि प्रा. डॉ. मोहन मिसाळ यांचा समावेश आहे.
अधिवेशनाच्या विविध सत्रांमध्ये महिला संघटनांच्या प्रतिनिधींसह बहुजन, आदिवासी, ओबीसी, विद्यार्थी, कामगार आणि सामाजिक संघटनांचे प्रतिनिधीही सहभागी होणार आहेत.

बहुजन समाजाच्या व्यापक संघटनाचा प्रयत्न
      देशातील सध्याच्या सामाजिक, राजकीय आणि घटनात्मक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बहुजन समाजाने संघटित होऊन आपल्या अधिकारांबाबत जागरूक होणे आवश्यक आहे. सामाजिक न्याय, प्रतिनिधित्व, आरक्षण, शिक्षण, जनगणना, निवडणूक प्रक्रिया आणि संघटनात्मक बांधणी यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर व्यापक जनजागृती आणि विचारमंथन घडवून आणणे हा अधिवेशनाचा प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

     महाराष्ट्र राज्य बामसेफ व सर्व सहयोगी संघटनांच्या वतीने आयोजित या अधिवेशनास बहुजन समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अधिवेशन यशस्वी करावे, असे आवाहन पत्रकार परिषदेत करण्यात आले.