सुसाट कारने उडवले, नंतर दांड्याने डोके ठेचून मित्राची हत्या!

सुसाट कारने उडवले, नंतर दांड्याने डोके ठेचून मित्राची हत्या!

छत्रपतीसंभाजीनगर, २२ ऑक्टोबर : व्यावसायिक वर्चस्वाच्या वादातून आणि काही महिन्यांपूर्वी झालेल्या अपमानाच्या रागातून एका तरुणाने आपल्या बालमित्राची अत्यंत क्रूरपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी बजरंग चौक ते बळीराम पाटील चौकादरम्यान घडली. आधी सुसाट कारने दुचाकीला धडक देत मित्राला रस्त्यावर पाडले आणि त्यानंतर कारचा यू-टर्न घेत पुन्हा घटनास्थळी येऊन लाकडी दांड्याने त्याचे डोके आणि चेहरा ठेचून काढला. शेकडो नागरिकांच्या डोळ्यांसमोर हा रक्तरंजित थरार घडला. देवेश ऊर्फ बंटी चंद्रेश दीक्षित (३७, रा. एन-९) असे मृत तरुणाचे नाव असून, पवन दिलीप पराशर (रा. एन-९) असे आरोपीचे नाव आहे. हत्या केल्यानंतर आरोपीने थेट सिडको पोलिस ठाणे गाठून ‘मी हत्या करून आलोय’ असे सांगत स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले.


     बंटी दीक्षित हा एन-९ परिसरात मेस चालविण्यासोबतच अन्य व्यवसाय आणि सामाजिक कार्यातही सक्रिय होता. पवन पराशर हा त्याचा बालमित्र असून दोघेही एकाच शाळेत शिकले होते. स्थानिक हॉटेल आणि बारमध्ये दोघेही सुरक्षा कर्मचारी अर्थात बाउन्सर म्हणून काम करीत होते. मात्र, कालांतराने दोघांमध्ये व्यावसायिक वर्चस्वाचा वाद निर्माण झाला. या वादातून त्यांच्यात वारंवार खटके उडत होते. काही महिन्यांपूर्वी झालेल्या एका अपमानाच्या घटनेनेही पवनच्या मनात राग धुमसत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.


     गुरुवारी सकाळी बंटी नेहमीप्रमाणे जिमला गेला होता. जिम आटोपल्यानंतर तो मोपेडवरून घरी जाण्यासाठी निघाला. सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास तो बजरंग चौकाकडून बळीराम पाटील चौकाच्या दिशेने जात असताना पवनने कारमधून त्याचा पाठलाग सुरू केला. मंगेश गॅस एजन्सीसमोरील मुख्य रस्त्यावर बंटी पोहोचताच पवनने कार सुसाट चालवून त्याच्या मोपेडला जोरदार धडक दिली. धडकेच्या जोराने बंटी हवेत उडून रस्त्याच्या मध्यभागी जाऊन कोसळला, तर त्याची मोपेड सुमारे २०० फूट अंतरावर जाऊन पडली.


       बंटी गंभीर जखमी होऊन रस्त्यावर निपचित पडलेला असतानाही पवन थांबला नाही. त्याने पुढील चौकातून कारचा यू-टर्न घेतला आणि पुन्हा बंटीजवळ येऊन कार थांबवली. त्यानंतर कारमधून लाकडी दांडा घेऊन खाली उतरलेल्या पवनने रस्त्यावर पडलेल्या बंटीच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर बेदम वार करण्यास सुरुवात केली. तब्बल चार ते पाच मिनिटे त्याने दांड्याने वार करत बंटीचे डोके आणि चेहरा अक्षरशः ठेचून काढला. या अमानुष हल्ल्यात बंटीचा घटनास्थळीच मृत्यू झाला.


      सिडको पोलिस ठाण्यापासून अवघ्या सुमारे ६५० मीटर अंतरावर आणि मुख्य बाजारपेठेतील वर्दळीच्या रस्त्यावर हा थरार घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत झालेल्या या हत्येने प्रत्यक्षदर्शींनाही हादरवून सोडले. विशेष म्हणजे, हत्या केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न न करता कार थेट सिडको पोलिस ठाण्याकडे वळवली. तेथे पोहोचल्यानंतर ‘मी हत्या करून आलोय’ असे सांगत त्याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.


      या प्रकरणी सिडको पोलिसांनी आरोपी पवन पराशर याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. हत्या नेमक्या कोणत्या कारणामुळे झाली, व्यावसायिक वर्चस्वाच्या वादामागे आणखी काही कारण होते का, तसेच काही महिन्यांपूर्वी झालेल्या अपमानाचा या हत्येशी नेमका संबंध काय आहे, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. दिवसाढवळ्या, वर्दळीच्या रस्त्यावर आणि शेकडो नागरिकांसमोर घडलेल्या या निर्घृण हत्येमुळे छत्रपती संभाजीनगर शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.