औरंगाबाद शहरात दोन गटात राडा : दगडफेक, पोलीसांची वाहने पेटवली - पोलिसांचा लाठीमार, अश्रुधुर आणि गोळीबार

औरंगाबाद शहरात दोन गटात राडा : दगडफेक, पोलीसांची वाहने पेटवली - पोलिसांचा लाठीमार, अश्रुधुर आणि गोळीबार

औरंगाबाद, 30 मार्च : रामनवमीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरात दंगल घडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. किराडपुरा परिसरातील राम मंदिर समोर दोन गटात वादावादी झाली. दोन्ही गट हिंसक झाले. त्या दोन्ही गटांनी पोलिसांची वाहने आणि  खाजगी वाहने अशा सुमारे 15 वाहनांची जाळपोळ केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठी चार्ज केला, अश्रुधाराचे नळकांडे फोडले, आणि गोळीबार पण केला. यात काही इसम जखमी झाले. तसेच काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी पण जखमी झाले आहेत. पोलिसांनी वेळीच प्रभावी कारवाई केल्यामुळे जमाव पांगला. रात्री साडेअकरा वाजेपासून पहाटे तीन वाजेपर्यंत हा प्रकार सुरू होता.

     हिंसाचाराचा आणि जाळपोळीचा जो प्रकार घडला आहे, तो किराडपुरा येथील रस्त्यावर घडला आहे. राम मंदिराला कुठलीही हानी झालेली नाही राम मंदिर पूर्णतः सुरक्षित आहे, जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

घटनेला सुरुवात कशी झाली, नक्की काय घडले?

      मिळालेल्या माहितीनुसार आज (30 मार्च) साजरा होणाऱ्या रामनवमी उत्सवानिमित्त किराडपुऱ्या बाहेरील काही युवक ढोल ताशे वाजवत आणि हातात भगवे झेंडे घेऊन इतर गटाविरुद्ध जोर जोरात आक्षेपार्ह घोषणा देत राम मंदिराकडे जात होते. त्यामुळे दोन्ही गट समोरासमोर भिडले, वादावादी झाली, आणि नंतर दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केली. दोन्ही गटांकडून वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. पोलिसांनी वेळीच बळाचा वापर करीत लाठी चार्ज केला, अश्रुधुराचे नळकांडे फोडले,  गोळीबार पण केला. आणि जमावाला पांगविले. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. पोलिसांनी संपूर्ण शहरात कडक बंदोबस्त लावलेला आहे.

      दोन एप्रिल रोजी शहरात महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा आयोजित करण्यात आलेली आहे. सभेला मोठी गर्दी उसळण्याची शक्यता आहे. त्याआधी जाणीवपूर्वक शहराचे वातावरण बिघडवण्याचा हा प्रयत्न असावा अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

      खासदार इम्तियाज जलील यांनी तसेच इतर नेत्यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे, तसेच शांततेचे आवाहन केले.

      पोलीस स्टेशन जीन्सी येथे दोन्ही गटातील समाजकंटकांचे विरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. घटना नेमकी कशी घडली, कशामुळे घडली? नेमका प्रकार काय होता? याबाबत पोलीस बारकाईने तपास करीत आहेत.  घटनेतील जबाबदार गुन्हेगार समाजकंटकांची ओळख पटविण्यासाठी परिसरात लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेर फुटेज आणि राम मंदिर प्रवेशद्वारावर लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज ची पडताळणी केली जात आहे.

हे पण वाचा : जमलेल्या गैर कायदा मंडळीत पालकमंत्र्यांसह आणखी एक मंत्र्याची उपस्थिती