सॉफ्टवेअर हॅक करून अवघ्या आठ मिनिटांत स्कॉर्पिओ लंपास
छत्रपती संभाजीनगर, ५ ऑक्टोबर : वाहनाचे सॉफ्टवेअर हॅक करून अत्याधुनिक पद्धतीने अवघ्या आठ मिनिटांत काळ्या रंगाची स्कॉर्पिओ कार चोरून नेल्याची घटना सातारा परिसरात घडली. या घटनेमुळे वाहनांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, चोरट्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून चोरी केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सातारा येथील रहिवासी आकाश प्रकाश चव्हाण (३०) यांनी त्यांची एमएच २० एफयू ११११ क्रमांकाची स्कॉर्पिओ कार घरासमोर उभी केली होती. शुक्रवार, २ ऑक्टोबर रोजी पहाटे सुमारे ४.१६ वाजता चोरट्यांनी परिसरात प्रवेश केला. क्रेटा कारमधून आलेल्या चोरट्यांनी शिताफीने स्कॉर्पिओवर ताबा मिळवला आणि अवघ्या काही मिनिटांत ती घेऊन पसार झाले.
या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून, त्याच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू आहे. चोरीची पद्धत पाहता या टोळीत वाहनांच्या यांत्रिक बाबींची माहिती असलेला मेकॅनिक तसेच सॉफ्टवेअरचे ज्ञान असलेला व्यक्ती सहभागी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. चोरी केलेली वाहने परराज्यात विक्री करणारी टोळी या प्रकरणामागे असण्याची शक्यताही तपासली जात आहे.
सॉफ्टवेअर हॅकिंगद्वारे वाहन चोरीची शक्यता
चोरटे पारंपरिक पद्धतीने गाडीचे कुलूप तोडण्याऐवजी आधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरण किंवा स्कॅनरच्या मदतीने वाहनाच्या सेन्सर आणि इलेक्ट्रॉनिक प्रणालीमध्ये हस्तक्षेप करतात. दरवाजा उघडल्यानंतर वाहनाच्या इंजिन कंट्रोल मॉड्यूलमध्ये (ECM) छेडछाड करून वाहन सुरू करण्याची शक्यता असते. तसेच गाडीच्या मूळ कोडिंगला बायपास करून नवीन चावीचे कोडिंग वाहनाशी मॅच केले जाऊ शकते. त्यामुळे सायरन न वाजता वाहन सुरू करून काही मिनिटांत ते पळवून नेणे शक्य होते.
सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ६२६/२०२६ अन्वये कलम ३०३(२) सह ३(५), भारतीय न्याय संहिता (BNS) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज, चोरट्यांची हालचाल आणि वाहन चोरीसाठी वापरलेल्या तंत्राचा तपास करण्यात येत आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक खिल्लारे करीत आहेत.