ग्रामपंचायतीत 34 लाखांचा घोटाळा! माजी सरपंच-अधिकारी फरार, पोलिसांचा ससेमिरा
लोहारा (प्रतिनिधी- जी एम देशमुख) : बाळापूर तालुक्यातील लोहारा ग्रामपंचायतीत तब्बल 34 लाख 59 हजार 80 रुपयांच्या अपहाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी माजी सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच दोन्ही आरोपी फरार झाले असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी विशेष पथक तयार करून शोधमोहीम सुरू केली आहे.
या संदर्भात पोलीस स्टेशन उरळ येथे अपराध क्रमांक 147/2026 अंतर्गत भादंवि कलम 420 व 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दि. 12 मार्च 2026 रोजी रात्री 9.52 वाजता दाखल करण्यात आला.
या प्रकरणी गंगाधर सोमाजी गुंडेकर (वय 37), विस्तार अधिकारी, पंचायत समिती बाळापूर यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या तक्रारीनुसार लोहारा ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच प्रवीण मोरे (रा. लोहारा, ता. बाळापूर) आणि तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी गजेंद्र बाळापुरे (रा. एसबीआय कॉलनी, गोलखेड रोड, शेगाव, जि. बुलढाणा) यांनी संगनमताने ग्रामपंचायतीच्या निधीचा 34,59,080 रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे.
ही घटना दि. 24 नोव्हेंबर 2022 ते दि. 19 एप्रिल 2023 या कालावधीत घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाची प्राथमिक चौकशी झाल्यानंतर उरळ पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
सदर प्रकरणाचा तपास API कांबळे करीत असून दोन्ही आरोपी सध्या फरार आहेत. पोलिसांनी त्यांच्या अटकेसाठी विशेष पथकाची स्थापना केली असून युद्धपातळीवर शोधमोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
दरम्यान, अपहाराची रक्कम मोठी असल्याने या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे (EOW) वर्ग करण्यात येण्याचीही चर्चा सुरू आहे. या घोटाळ्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून ग्रामपंचायतीतील आर्थिक व्यवहारांवर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.