विरोध केला तर तुझ्या मुलीसोबत...!’ धमकी देत महिलेवर अत्याचाराचा आरोप; अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याचीही धमकी

विरोध केला तर तुझ्या मुलीसोबत...!’ धमकी देत महिलेवर अत्याचाराचा आरोप; अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याचीही धमकी

छत्रपती संभाजीनगर : मुलीला इजा करण्याची तसेच तिच्यावर अत्याचार करण्याची धमकी देत एका ३० वर्षीय महिलेवर वारंवार अत्याचार केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. एवढेच नव्हे, तर शारीरिक संबंधास विरोध केल्यास महिलेचे अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर, विशेषतः इन्स्टाग्रामवर प्रसारित करून बदनामी करण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या धक्कादायक प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून, विजय प्रल्हाद भालेराव (वय ३३, रा. नूतन वसाहत, अंबड चौफुली, जालना) याच्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

      पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छावणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या ३० वर्षीय महिलेची विजय भालेराव याच्याशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर आरोपी तिचा पाठलाग करू लागल्याचा आरोप आहे. छावणी परिसरातील महिलेच्या निवासस्थानी तसेच बजाजनगरातील चिंचबन कॉलनी परिसरात जाऊन तिला धमकावल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

      महिलेने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्यानंतर धमक्यांचे सत्र सुरू झाल्याचा आरोप आहे. ‘विरोध केलास तर तुझ्या मुलीला इजा करीन, तिच्यावर अत्याचार करीन’, अशी भीती दाखवून आरोपीने महिलेवर वारंवार अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या धमक्यांमुळे महिला भयभीत झाली होती, असा आरोप करण्यात आला आहे.

       धमकी एवढ्यावरच थांबली नाही. या प्रकाराला विरोध केल्यास महिलेचे अश्लील व्हिडीओ इन्स्टाग्रामवर प्रसारित करून तिची बदनामी करण्याची धमकीही देण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे मानसिक त्रासाला कंटाळलेल्या महिलेने अखेर पोलिस ठाणे गाठून संपूर्ण प्रकाराची तक्रार नोंदवली.

      महिलेच्या तक्रारीवरून एमआयडीसी वाळूज पोलिसांनी विजय भालेराव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणातील आरोपांची पोलिसांकडून चौकशी सुरू असून, पुढील तपास एमआयडीसी वाळूज पोलिस करीत आहेत. तक्रारीतील आरोपांची सत्यता तपासानंतर स्पष्ट होणार आहे.