रक्षकच भक्षक! पतीविरोधात तक्रार घेऊन आलेल्या महिलेवर उपनिरीक्षकाचा बलात्कार; गुन्हा दाखल होताच आरोपी फरार
बीड, २१ सप्टेंबर : कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे, त्याच खाकी वर्दीतील अधिकाऱ्यावर एका पीडित महिलेवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप झाल्याने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पतीविरोधात तक्रार घेऊन वडवणी पोलीस ठाण्यात आलेल्या महिलेचा गैरफायदा घेत पोलीस उपनिरीक्षकानेच तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार समोर आली आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गणेश राठोड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हा दाखल होताच तो फरार झाल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वडवणी येथील एका महिलेने आपल्या पतीविरोधात वडवणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात मदत करण्याच्या तसेच कारवाई करून देण्याच्या बहाण्याने पोलीस उपनिरीक्षक गणेश राठोड याने संबंधित महिलेचा संपर्क साधल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. फोनवरून तिला या प्रकरणात मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले.
यानंतर संबंधित उपनिरीक्षक थेट महिलेच्या घरी पोहोचला. मदतीचे आश्वासन देत तिच्याशी गैरवर्तन करून अत्याचार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. या प्रकारानंतर धक्का बसलेल्या महिलेने धाडस करून थेट वडवणी पोलीस ठाणे गाठले आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्याविरोधात तक्रार दाखल केली.
महिलेच्या तक्रारीवरून पोलीस उपनिरीक्षक गणेश राठोड याच्याविरुद्ध कलम ६४ भारतीय न्याय संहितेनुसार बलात्काराचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच आरोपी अधिकारी फरार झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत आहे.
पीडित महिलेला कायदेशीर मदत आणि संरक्षण देण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणेतीलच अधिकाऱ्यावर अशा प्रकारचा गंभीर आरोप झाल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकरणाचा तपास माजलगाव येथील पिंक पथकाचे प्रभारी द्रोणाचार्य करीत असून, तपासातून नेमके काय समोर येते आणि फरार आरोपी अधिकाऱ्यावर पुढील कायदेशीर कारवाई कधी होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.