“एक कॅमेरा शहरासाठी” : पोलिसांचे आवाहन; नागरिकांच्या सहभागातून सुरक्षित शहराची दिशा

“एक कॅमेरा शहरासाठी” :  पोलिसांचे आवाहन; नागरिकांच्या सहभागातून सुरक्षित शहराची दिशा

छत्रपती संभाजीनगर, २६ एप्रिल : शहरातील कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी संभाजीनगर शहर पोलिसांनी “एक कॅमेरा शहरासाठी, सर्वांच्या सुरक्षेसाठी” हा उपक्रम सुरू केला असून, पोलीस आयुक्तांनी नागरिकांना सविस्तर आवाहन केले आहे. या मोहिमेत प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या परिसराच्या सुरक्षिततेत हातभार लावावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

     पोलीस आयुक्तांनी आपल्या आवाहनात म्हटले आहे की, नागरिकांनी आपल्या घर, दुकान, सोसायटी, हॉटेल, शाळा, महाविद्यालय, तसेच शासकीय व खाजगी आस्थापनांमध्ये CCTV कॅमेरे बसवावेत. विशेषतः किमान एक कॅमेरा सार्वजनिक रस्त्याकडे (रोड फेसिंग) ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे, जेणेकरून रस्ते, चौक आणि सार्वजनिक हालचाली स्पष्टपणे रेकॉर्ड होतील.

     तसेच बसविण्यात आलेले CCTV कॅमेरे २४ तास कार्यरत राहतील याची खात्री करणे, कॅमेऱ्यांची दिशा योग्य ठेवणे, रात्रीच्या वेळी स्पष्ट चित्र मिळण्यासाठी नाईट व्हिजन किंवा प्रकाशाची योग्य व्यवस्था करणे, या बाबींचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोणत्याही गुन्ह्याच्या तपासासाठी आवश्यक असल्यास नागरिकांनी CCTV फुटेज पोलिसांना उपलब्ध करून द्यावे, असेही नमूद करण्यात आले आहे.

     याशिवाय, ज्या ठिकाणी CCTV कॅमेरे नाहीत, तेथे नवीन कॅमेरे बसविण्याचे आवाहन करण्यात आले असून, बसविलेल्या कॅमेऱ्यांची नोंद जवळच्या पोलीस ठाण्यात करण्यासही सांगण्यात आले आहे. या सर्व उपाययोजनांमुळे गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे, तपास प्रक्रिया अधिक वेगवान करणे आणि शहर अधिक सुरक्षित बनविणे शक्य होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

     संभाजीनगर पोलिसांचा हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद असून, नागरिकांच्या सहकार्याने तो अधिक प्रभावी ठरणार आहे. विशेष म्हणजे, अशाच प्रकारचे उपक्रम सुमारे दहा-बारा वर्षांपूर्वी अमरावती शहर पोलिसांनी राबविले होते. ते आजही यशस्वीपणे सुरू असून, गुन्हेगारी रोखण्यासाठी तसेच गुन्हे उघडकीस आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपयुक्त ठरले आहे.

     आजही अमरावतीमध्ये हे उपक्रम कार्यरत आहे आणि त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. त्यामुळे अशाच प्रकारचा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबविला गेला, तर गुन्हे प्रतिबंधासोबतच गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढू शकते, असे मत व्यक्त केले जात आहे.

        एकंदरीत, “तुमचा कॅमेरा – सर्वांची सुरक्षा” ही संकल्पना प्रत्यक्षात यशस्वी करण्यासाठी नागरिक आणि पोलिस यांचे परस्पर सहकार्य अत्यावश्यक ठरणार आहे.