मस्जिद नज़ीर रोज़ बा च्या बेरीबाग येथील वक्फ मालमत्तेचा गैरव्यवहार : संबंधितांचे विरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करा

औरंगाबाद, दि. 16 जानेवारी: मस्जिद नज़ीर रोज़ बा, किल्ले अर्क, औरंगाबादच्या बेरीबाग़ येथील वक्फ मालमत्तेतील गंभीर गैरव्यवहारांविरोधात महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाकडे चौकशीची आणि फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. सेवानिवृत्त असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस डॉ. रियाज़ देशमुख यांनी अर्जाद्वारे अशी मागणी केली आहे.
डॉ. देशमुख यांनी आपल्या अर्जात काही गंभीर आरोप केले असून, मस्जिदच्या वक्फ मालमत्तेच्या गैरव्यवहाराचे मुद्दे मांडले आहेत. सदर मस्जिद महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळात नोंदणीकृत आहे (नोंदणी क्रमांक: MSBW/ABD/313/2012). या मालमत्तेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
गैरव्यवहाराचे प्रमुख मुद्दे
• लीज़बाबत अनियमितता: मुतवल्लींनी मौजे हरसुल येथील बिरीबाग परिसरातील गट नंबर173 आणि174 या वक्फ मालमत्तेवर शेकडो प्लॉट्स पाडून ते 99 वर्षांसाठी रजिस्टर लीज़ डीड न करता केवळ 20/- रुपये, 100/- रुपये चे बॉंड पेपरवर नोटरी करुन लीज़वर दिल्याचे आढळले आहे.
• सबलीज़ व विक्रीचे प्रकार: लीज़होल्डर्स त्यांच्या ताब्यातील प्लॉट्स अवैधपणे सबलीज़ करत असून काही प्रकरणांत प्लॉट्स विक्रीही होत असल्याचे उघड झाले आहे.
• मुतवल्लींच्या दुर्लक्षाचा आरोप: या सर्व प्रकारांबाबत मुतवल्लींनी सबलीज करणारे आणि प्लॉट विक्री करणारे लोकांचे विरुद्ध कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप आहे.
• अहवाल सादरीकरणाचा अभाव: सन 1995 पासून मुतवल्लींनी महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाकडे ऑडिट रिपोर्ट सादर केलेला नाही, तसेच वक्फ फंड जमा केलेला नाही.
डॉ. देशमुख यांची मागणी:
डॉ. देशमुख यांनी मुतवल्लींविरुद्ध तसेच सबलीज़ करणारे, विक्री करणारे व घेणाऱ्यांचे विरुद्ध तातडीने चौकशी करण्याची आणि फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच पुढील उपाययोजना सुचविल्या आहेत:
• तातडीने चौकशी: मुतवल्लींविरुद्ध चौकशी सुरू असताना त्यांना पदावरून हटवावे आणि या वक्फ संस्थेवर प्रशासक नेमावा.
• वक्फ मंडळाने मालमत्ता ताब्यात घ्यावी: वक्फ मालमत्तेतील रिकामी मालमत्ता वक्फ मंडळाने आपल्या ताब्यात घ्यावी.
• अवैध बांधकामांवर कारवाई: वक्फ मालमत्तेवरील वक्फ मंडळाचे परवानगीशिवाय आणि महानगरपालिकेच्या परवानगीशिवाय बांधण्यात आलेली सर्व अवैध बांधकामे पाडण्यात यावीत.
• कायदेशीर कारवाई: दोषी आढळणाऱ्यांचे विरुद्ध वक्फ अधिनियम 1995 चे कलम 52, 52A आणि भारतीय न्यायसंहिता 2023 अंतर्गत कठोर फौजदारी कारवाई करावी.
डॉ. देशमुख यांनी या प्रकरणात प्राथमिक स्वरूपात काही दस्तऐवज पुरावे म्हणून सादर केलेली आहेत बाकीचे सर्व आवश्यक पुरावे चौकशी दरम्यान सादर करण्याची तयारी दर्शवली आहे. वक्फ मंडळाने तातडीने लक्ष घालून कडक कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली आहे.
मुतवल्लींच्या कारभारामुळे वक्फ मालमत्तेचा गैरवापर होत असल्याचा आरोप गंभीर असून, वक्फ मंडळाने यावर त्वरित कारवाई करण्याची आवश्यकता आहे. या प्रकरणातील चौकशीत कोण दोषी आढळतो आणि त्यावर कायदेशीर कारवाई होते का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.