अल-खैर पतसंस्थेचा बिनव्याजी आर्थिक सक्षमीकरणाचा ध्यास; लघुउद्योजक, महिला बचत गटांना बळ
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. २० (प्रतिनिधी) : अल-खैर बैतुलमाल अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि., छत्रपती संभाजीनगरची २४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मरकज-ए-इस्लामी, युनूस कॉलनी येथे संस्थेचे अध्यक्ष इंजि. अब्दुल वाजिद कादरी यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. संस्थेच्या माध्यमातून लघुउद्योजक, छोटे व्यापारी, स्वयंरोजगार करणारे तसेच महिलांना आर्थिक पाठबळ देऊन त्यांच्या सक्षमीकरणाला चालना देण्याचा संस्थेचा प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
अल-खैर ही केवळ आर्थिक व्यवहार करणारी पतसंस्था नसून सभासदांच्या आर्थिक प्रगतीसोबतच समाजाच्या आर्थिक विकासात योगदान देणारी सहकारी संस्था म्हणून कार्यरत आहे, असे अध्यक्ष इंजि. अब्दुल वाजिद कादरी यांनी सांगितले. देशाच्या आर्थिक विकासात आणि सकल देशांतर्गत उत्पादनाच्या वाढीत आपला वाटा उचलण्यासाठी लघुउद्योग, छोटे व्यवसाय, स्वयंरोजगार आणि महिला आर्थिक सक्षमीकरणाला संस्थेने प्राधान्य दिले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
लघुउद्योजक आणि छोट्या व्यापाऱ्यांना व्यवसायासाठी आवश्यक भांडवल उपलब्ध व्हावे यासाठी संस्थेमार्फत विविध बिनव्याजी कर्ज सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्याची माहिती कादरी यांनी दिली. महिला बचत गटांनाही आर्थिक सहकार्य करून त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
सभासदांच्या तातडीच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन सोने तारण कर्ज सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेवर दरवर्षी केवळ एक टक्का सेवा शुल्क आकारले जात असल्याचे अध्यक्षांनी सांगितले.
संस्थेचे सचिव नासेर जोहरी यांनी वार्षिक अहवाल सभेसमोर सादर केला. संस्थेच्या ठेवी, नफा, खर्च, आर्थिक व्यवहार, सभासदांना उपलब्ध करून दिलेल्या विविध सुविधा तसेच मागील आर्थिक वर्षातील कामकाजाची सविस्तर माहिती त्यांनी आकडेवारीच्या माध्यमातून मांडली. वर्षभरात संस्थेने केलेली प्रगती आणि भविष्यातील वाटचालीची दिशा यामुळे सभासदांसमोर स्पष्ट झाली.
यावेळी जव्वाद कादरी यांनी विविध ठराव सभेसमोर मांडले. सभेने आवश्यक त्या ठरावांना मंजुरी दिली. बदलत्या काळाची गरज ओळखून संस्थेच्या डिजिटल वाटचालीचीही घोषणा करण्यात आली. मोबाईल ॲपच्या माध्यमातून सभासदांना त्यांच्या खात्याची माहिती आणि संस्थेच्या विविध सेवांचा अधिक सुलभपणे लाभ घेता यावा, यासाठी डिजिटल प्रणाली विकसित करण्यात येणार आहे. संस्थेच्या कामकाजात डिजिटल अकाउंट आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याचा निर्णयही यावेळी जाहीर करण्यात आला.
पारदर्शकता, सुलभ सेवा आणि सभासदांच्या सोयीसाठी सहकारी संस्थांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे काळाची गरज आहे. त्यादृष्टीने अल-खैर पतसंस्था डिजिटल प्रणालीकडे ठोस पावले टाकत असल्याचे अध्यक्ष कादरी यांनी सांगितले.
संस्थेच्या भविष्यातील विकासासाठी सभासदांनी अधिकाधिक बचत करावी, संस्थेशी सक्रियपणे जोडले जावे आणि संस्थेच्या प्रगतीत आपला सहभाग वाढवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. लघुउद्योग, छोटे व्यवसाय, महिला बचत गट आणि स्वयंरोजगाराला आर्थिक पाठबळ देऊन स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचा संस्थेचा प्रयत्न पुढेही सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.
वार्षिक सर्वसाधारण सभा यशस्वी करण्यासाठी शाखा व्यवस्थापक हाफीज हबीबुल्लाह तसेच अल-खैरच्या कर्मचारीवर्गाने विशेष परिश्रम घेतले. सी.ए. अन्वर हुसेन यांच्यासह शहरातील नागरिक आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेचे संचालक कादीर खान, नासिर पाशु आणि श्रीमती फईमुनिसा यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानण्यात आले. संस्थेच्या पुढील प्रगतीसाठी सभासद, संचालक मंडळ आणि कर्मचारी यांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी संचालक मंडळाने सभासदांच्या अडचणी आणि समस्या जाणून घेत त्या सोडविण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.