औरंगाबादेत फटाके जवळ बाळगण्यास बंदी? : ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर पोलीसांचे अजब फरमान

औरंगाबादेत फटाके जवळ बाळगण्यास बंदी? : ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर पोलीसांचे अजब फरमान

औरंगाबाद, दि 29/10/2021 : महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम 37 चा आधार घेत औरंगाबादच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात दर पंधरा-पंधरा दिवसांसाठी प्रतिबंधात्मक आदेश काढून वर्षभर नागरिकांच्या स्वातंत्र्यावर बंधने घालण्याचे प्रकार न चुकता सर्रास राबविले जातात. पोलीस आयुक्तांच्या हद्दीत पोलीस आयुक्तांकडून आणि जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकार्‍यांकडून असे आदेश नियमितपणे काढले जातात. असे आदेश महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम 37 चे पोट कलम (1) आणि (3) नुसार काढले जातात. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींना बिना वारंट अटक करण्याचे अधिकार पोलीसांना असतात. तसेच या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला याच अधिनियमाचे कलम 135 नुसार न्यायालय एक वर्षापर्यंत कैदेची शिक्षा ठोठावू शकते. 

ऐन दिवाळीच्या काळात असेच एक आदेश औरंगाबाद शहर पोलीस आयुक्तांनी नुकतेच पारित केल्याने औरंगाबादेतील नागरिकांमध्ये एक संभ्रम निर्माण झाला आहे. शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या व्यक्ती व्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तीस औरंगाबाद शहरात कोणत्याही ठिकाणी अथवा त्याचे जवळपास दिनांक 27/10/2021 ते 10/11/2021 पर्यंत ( या पंधरा दिवसात)  स्फोटक पदार्थ (म्हणजेच फटाके सुद्धा) जवळ बाळगण्यास बंदी घालण्यात आल्याचे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. 

औरंगाबाद शहराचे पोलीस आयुक्त डॉक्टर निखील गुप्ता यांचे सहीने काढण्यात आलेले पंधरा दिवसांसाठी नागरिकांचे स्वातंत्र्य हिरावून घेणारे हे  प्रतिबंधकात्मक आदेश खालील प्रमाणे आहे.

या आदेशाचे अवलोकन केले असता फटाक्यांचे सोबतच अनेक सर्वसाधारण गोष्टींबाबत सुद्धा औरंगाबादेतील नागरिकांचे स्वातंत्र्य पंधरा दिवसांसाठी हिरावून घेतलेले आहेत. त्यात; 
● सोटे, दंडे, सुरी, काठी, लाठी, कोणतेही दाहक पदार्थ (ज्यात केरोसीन, डीझेल, पेट्रोल यांचाही समावेश होतो) ह्या वस्तू जवळ बाळगता येणार नाहीत.
● तसेच कोणत्याही व्यक्तीची प्रतिमा अथवा प्रेते किंवा आकृत्या यांचे प्रदर्शन करता येणार नाही, जाहीरपणे घोषणा करता येणार नाही, गाणे म्हणता येणार नाही.

ही बंधने सार्वजनिक ठिकाणीच नव्हे तर कोणत्याही ठिकाणी म्हणजे घरात सुद्धा लागू असणार आहेत.

पोलीसांच्या या आदेशामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात दिवाळीसाठी आता फटाके आणायचे की नाही? फटाके उडवायचे की नाही? असे प्रश्न उपस्थित होऊन संभ्रम निर्माण झाले आहे. फटाके आणले, जवळ बाळगले, घरात ठेवले किंवा उडवले तर पोलीस पकडतील अशी भीती पण वाटत आहे.