नगरविकास संचालक रझा खान यांची कृतज्ञता! “तीस वर्षांपूर्वी मिळालेलं सहाय्य… आता वक्फ बोर्डाला परत करणार!”
नगरविकास संचालक रझा खान यांची कृतज्ञता!
“तीस वर्षांपूर्वी मिळालेलं सहाय्य… आता बोर्डाला परत करणार!”
संभाजीनगर (औरंगाबाद) ३० नोव्हेंबर ;— कष्ट, प्रतिभा आणि कृतज्ञता या तीन गोष्टी एकत्र आल्या की इतिहास घडतो! शहराचे नगरविकास संचालक रझा खान यांनी नेमकं हेच दाखवून दिलं. शैक्षणिक आयुष्यात आर्थिक अडचणीत असताना मराठवाडा वक्फ बोर्डाने दिलेल्या मदतीमुळे त्यांनी उच्च शिक्षण पूर्ण केलं—आणि आज मोठ्या पदावर पोहोचल्यानंतर तो उपकार विसरले नाहीत!
वक्फ मंडळाच्या पाणचक्की, औरंगाबाद येथील मुख्यालयात भेट देताना रझा खान यांचा सत्कार उपमुख्यकार्यकरी अधिकारी मुशीर शेख यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी बोलताना रझा खान यांनी थेट जाहीर केले—
“तीस वर्षांपूर्वी वक्फ बोर्डाने दिलेल्या मदतीमुळेच मी आज इथपर्यंत पोहोचलो. ही आर्थिक शिष्यवृत्ती मी आता बोर्डाला परत करणार आहे, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांनाही मदत होईल.”
त्यांनी पुढे आवाहन करत सांगितले—
“माझ्यासारखे अनेक विद्यार्थी अजूनही अडचणीत आहेत. आम्हाला जे मिळालं—तेच पुढच्या पिढीला द्यावं. वक्फची मदत घेत यशस्वी झालेल्यांनी जरूर पुढे येऊन गरीब विद्यार्थ्यांना हात द्यावा.”
या कार्यक्रमाला वक्फ मंडळाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपमुख्यकार्यकरी अधिकारी मुशीर शेख म्हणाले—
“रझा खान आणि परभणीच्या डॉ. सालेहा खान यांसारखे अनेक विद्यार्थी वक्फच्या मदतीने उंच पदावर पोहोचले. आता सामाजिक बांधीलकी म्हणून इतर अधिकाऱ्यांनीही स्वयंस्फूर्तीने वक्फच्या उद्दिष्टाशी जोडले जावे.”
या प्रसंगी वक्फ बोर्डाचे लेखा परिक्षण शाखेचे अधीक्षक, फिरासात हुसेन, विधि विभागाचे अधीक्षक शोएब शेख, नोंदणी विभागाच्या अधीक्षीका हामना शेख, चौकशी विभागाचे अधीक्षक अदनान कुरेशी यांनीही रझा खान यांचे अभिनंदन केले.
— आर्थिक मदतीचे कर्ज कृतज्ञतेने फेडणारा संचालक; विद्यार्थ्यांसाठी रस्ता मोकळा करणारा आदर्श!