मुसलमानात जाती प्रथा नाहीत? : हा केवळ भ्रम
मुसलमानात जाती प्रथा नाहीत? हा केवळ भ्रम आहे आणि हा भ्रम वेळीच दुर करण्याचा प्रयत्न करणे सर्व मुसलमानांचे पहेले कर्तव्य आहे.अन्यथा पुढच्या पिढ्या तुम्हाला बोल लावल्याशिवाय राहणार नाहीत हे आजचं समजून घ्या.आरक्षण किती आणि का महत्वाचे आहे हे आज आरक्षणासाठी लागलेल्या आगीमुळे लक्षात येत नसेल तर मुसलमानांसारखे दुर्दैवी मुसलमानच ! शिक्षण नावाशी आपला संबंधच काय...आणि जगातले सर्व शिक्षण दहावी नंतर संपते या समजात मुसलमान गेल्या अनेक शतकांपासून आहे.राजकिय व्यवस्थेने केवळ संशोधनाचा फार्स केला,समित्या नेमल्या,अहवाल मागवले आणि फाईली कपाटांवर धुळ खायला ठेऊन दिल्या.याबाबत मुसलमानांनी मनापासून जोर लावून कधी उठाव केला नाही,हक्क मागीतले नाही, उपोषण, आंदोलन, मोर्चे,निवेदन हे मार्ग अवलंबले नाही.,ना मुस्लीम आरक्षणाच्या आंदोलन करणार्यांना साथ दिली ना बळ पुरवले.म्हणुन आजही मुस्लिम आरक्षणाचे घोंगडे भिजत पडले आहे.
मुसलमानात जातीची उतरंड १०० टक्के आहे अगदी खेड्यापाड्यात, शहरात ही आहे.इस्लाम मध्ये जाती प्रथा नाही,पण भारतीय मुसलमानात अगदी जशीच्या तशी आहे.राजा आणि फकीर एका रांगेत नमाज पढतात,ही समानता फक्त मस्जिद मध्ये दिसते.बाहेर येताच जातीजातीची भिंत आडवी येते.
सरकारी जीआर नुसार मुसलमानात एससी, एसटी,एनटी,व्हिजेएनटी, ओबीसी,एसबीसी इत्यादी वर्गात समावेश असणार्या एकुण ८३ जातीजमाती आहेत.पैकी काही नामशेष झालेल्या आहेत.काही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.तरी आजही सत्तर पंच्याहत्तर जातीजमाती अस्तित्व राखुन आहेत,जिवंत आहेत.याचे कारण हेच...मुसलमान हा बाहेरून आलेला नसून इथलाच धर्मांतरीत समाज आहे.तत्कालीन समाज व्यवस्था आणि अनेक कारणांमुळे इथला सामान्य माणुस आपली मुळची जात त्यागुन मुसलमान झालेला आहे.जातींची नावं ही तिच किंवा अरबी उर्दू तील नावं आहेत.
उदाहरणार्थ तांबट-मिसगर,काची-शिकीलगर,कुरेशी- खाटीक,पिंजारी-नदाफ,तंबोली -तांबोळी,कासार- मण्यार,बागवान-माळी,फुलारी,...याशिवाय मुजावर,मुलाणी,झारेकरी,गवळी,मेटकरी, छप्पर बंद नाईकवाडी,टकारी,बेलदार,सुलेमानी,पटवेकरी,भंगी,मेहतर,सुतार,गवंडी,दर्जी,पेंढारी,रंगरेज,धावड,काकर,कोरबु,नालबंद,धोबी,केज,खतीब,शाह,बारगीर,जातगर,पखाली,बाजीगर,तराळ,भांड,कोतवाल,महात,कलाईगार,नालबंद,दरवेशी,रोहीले,दाल्दी,मुंडे,कलाल,तेली,झारी नक्षबंद...हा सर्व समाज अस्तित्वात आहे,यांना मी भेटले बोलले,यांच्यावर लिहीलेले आहे.
इतके स्वच्छ वास्तव असतानाही जर तुम्ही नाकारत असाल,डावलत असाल तर हा मुस्लीम समाजावर अन्याय आहे.जाणिवपुर्वक वंचित ठेवण्याचा प्रकार ठरेल.ही मुस्लीम समाजाची फरपट आहे.संख्याबळ कमी आणि जागृती नाही याचा अर्थ एका विशिष्ट समाजाने कायम अव्हेरलेपणा सोसणे हे सकस समाजाचे लक्षण होत नाही.मुसलमान समाज मराठा आरक्षणाच्या बाजूने स्पष्टपणे पाठीशी उभा आहे.न्याय्य हक्काच्या या संघर्षातील मुसलमानांच्या हक्क अधिकाराला यादीत स्थान मिळुन न्याय होईल ही अपेक्षाच नाही तर खात्री आहे.
©तमन्ना इनामदार, पुणे
(लेखिका ,अभ्यासिका)