गुस्ताखी माफ : मुस्लिम विरोधी प्रॉपगंडा! केरला स्टोरी म्हणजे काश्मीर फाईल्सचा-पार्ट-2, समाजात द्वेष पसरवण्याचा नियोजित अजेंडा!
आपण भारतीय अत्यंत विसरभोळे!! मागे काय घडलं ते लक्षात राहत नाही. म्हणूनच भार हेतीयांना वर्तमानात जगणारा समाज म्हणून पाहिलं जातं!
मागच्या वर्षी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया चे गोव्यात आयोजन करण्यात आले होते. यात "काश्मीर फाईल्स" चा समावेश करण्यात आल्याने फेस्टिव्हलचे अध्यक्ष व इस्राईलचे फिल्म निर्माते नादव लापीड रागावले होते. त्यांनी या चित्रपटाला "फालतू व मुस्लिमां विरोधात द्वेष पसरविण्याचा हा प्रॉपगंडा" असल्याचा बॉम्ब गोळा टाकला होता. त्या नंतर अनेक हॉलिवूड निर्मात्यांनी लापीड यांच्या वक्तव्याला पाठींबा दिलं. आता याच काश्मीर फाइल्सचा पार्ट-2 म्हणजेच "केरला स्टोरी" नावाने नवीन एजंडा तयार करण्यात आला आहे.
देशात द्वेष पसरवून एका विशिष्ट पक्षाला फायदा पोहोचविण्यासाठी आता बॉलिवूड मधील काही "चाटू" निर्माते पुढे येत आहेत. मागच्या वर्षी "काश्मीर फाईल्स" चित्रपटाच्या माध्यमाने मुस्लिमांची प्रतिमा खराब करण्याचा, त्यांच्या विरुद्ध द्वेष पसरविण्याचा अजेंडा चालविण्यात आला. आता त्याचा पार्ट-2 या नावाने "केरला स्टोरी" आला आहे. समाजात चांगला संदेश जावं म्ह्णून पूर्वी चित्रपट निर्माण केलं जातं असे. मात्र दुर्दैवाने आपण सत्तेच्या पायघड्यात बसलो की आपल्याला आर्थिक फायदा होतो, ही मानसिकता वाढत आहे. आता पर्यंत राजकीय लोक आपल्या सत्ता स्वार्थासाठी मुस्लिम देश विरोधी आहे, असा संभ्रम करण्याचा प्रयत्न करत होते. दुर्दैवाने चित्रपट सृष्टीत ही जातीवादी मानसिकतेचे लोकांचा शिरकाव होत असल्याने जागतिक स्तरावर बॉलिवूडची प्रतिमा लयास जात आहे.
आता बघा ना, उत्तरप्रदेशात सर्वात अगोदर लव्ह जिहादच्या नावाखाली कायदा आणला गेला, मात्र राष्ट्रीय मानवाधिकार आयोगा कडून जेव्हा या बाबत चौकशी करण्यात आली तेव्हा त्यांनी हा प्रकार थोतांड असल्याचे सांगितले. तसेच ज्या आयसिस या दहशतवादी संघटनेचा यात हात असल्याचे सांगितले जात आहे त्या विषयी केंद्र सरकारच्या कोणत्याच एजन्सी कडे तंतोतंत माहिती नाही. निर्माते अदा शर्मा 32000 मुलींच्या लव्ह जिहादच्या नावाखाली धर्मांतर करण्याचा दावा करत आहेत. मात्र निर्मात्याने फक्त तीन मुलीचं मुलाखत घेऊन हे काल्पनीक स्टोरी तयार केली. "लव्ह जिहाद" च्या आधारावर निर्माता अदा शर्मा यांनी खोटारडेपणाचा कळस गाठला आहे. आकड्यानुसार जर केरळातुन बत्तीस हजार मुली गायब झाल्या असेल तर प्रत्येक गावातून कमीतकमी दहा मुली गायब झाल्या पाहिजे. म्हणजे हा प्रॉपगंडा नाही तर काय? केरळात 2006 ते 2012 या सहा वर्षातील मुलींच्या गायब होण्याच्या प्रकरणी दोन आयपीएस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून चौकशी करण्यात आली होती. त्या वेळेस हिंदू मुस्लिम व ख्रिश्चन अश्या एकूण तीन हजार लोकांचा धर्मांतरण झाल्याचे उघडकीस आले होते. म्हणजे ते फक्त हिंदू नव्हतेच. आंतरराष्ट्रीय संस्था इन्स्टिट्यूट ऑफ डिफेन्स स्टडीज़ च्या माध्यमातून विश्व स्तरीय सर्व्हे करण्यात आला होता. यात जगात चाळीस हजार व भारतात फक्त 86 दहशतवादी कार्यरत असल्याचा निर्वाळा देण्यात आला.
एकूणच भारतात पितृसत्ताक वरचष्मा कायम राहावं, मुलींनी खुल्या समाजात जगू नये म्ह्णून ही मनुवादी मानसिकता तसेच मुस्लिम युवकांना टार्गेट करण्याचा हा प्रयत्न आहे. केंद्रीय गृह मंत्रालयानेही लव्ह जिहाद संदर्भात कोणतीच ठोस माहिती नसल्याचे चक्क संसदेत स्वीकारले होते. केरळ हे राज्य देशात साक्षरता प्रमाणात व सोशल इंडेक्स मध्ये वरच्या क्रमांकावर आहे. दाक्षिणात्य राज्यात आज ही कट्टरता नसल्याने संधीसाधू राजकारण्यांना आपली सत्ता काबीज करता आली नाही. म्हणून कर्नाटकात व केरळात कधी हिजाबच्या नावाखाली तर कधी लव्ह जिहादच्या नावाखाली हिंदू कट्टरवाद्यांचा धुमाकूळ सुरू आहे. दुर्दैवाने हे सर्व प्रयत्न त्यांचे निष्फळ ठरले आहेत. आजही केरळात मिक्स कल्चर असल्याने तिथल्या लोकांत देशातील इतर राज्यांच्या तुलनेत सामाजिक द्वेष व कट्टरवाद नगण्य आहे. हेच संधीसाधूंना पटत नाही. "द केरला स्टोरी" रिलीज झाला आहे. अंधभक्तांच्या टोळ्या थिएटर कडे मार्गस्थ होत आहेत. मात्र देशाच्या ऐक्याला, सामाजिक समता व बंधुतेला थेट तडा देणारे असले थोतांड प्रकार आहे. हे लोक बॉलिवूडची प्रतिमाच नव्हे देशाची प्रतिमाही मातीमोल करत आहेत.
खरंच,भारत बदल रहा है..! (जयहिंद)
- अशफाक शेख, वरिष्ठ पत्रकार, औरंगाबाद.