गणेशोत्सवात डीजेऐवजी ढोल-ताशे वाजवा : पालकमंत्र्यांचा अजब सल्ला

छत्रपती संभाजीनगर (ता.२४) – जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी गणेश मंडळांना “डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करा” असे आवाहन केले. पोलीस प्रशासनानेही त्याच धर्तीवर सूचना केल्या. या मागणीमागचे खरे कारण – म्हणजे हायकोर्टाचे आदेश आणि लाऊडस्पीकरचा ठराविक डेसिबलपेक्षा जास्त आवाज करण्यास असलेली बंदी.
एमआयटी कॉलेजच्या सभागृहात झालेल्या शांतता समन्वय समितीच्या बैठकीत पालकमंत्र्यांसह पोलीस व जिल्हा प्रशासन, खासदार-आमदार, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी आणि गणेश मंडळ पदाधिकारी सहभागी झाले. शिरसाट यांनी गणेश मंडळांना डीजेऐवजी ढोल-ताशे वापरण्याचे आवाहन केले. पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनीही डीजे व लेझर लाईट टाळा, सोशल मीडियावर भडकावू पोस्ट टाकू नका अशी नित्यनेमाची सूचना केली.
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार कोणत्याही वाद्याचा आवाज औद्योगिक क्षेत्रात ७५ डेसिबल, कमर्शियल क्षेत्रात ६५ डेसिबल, निवासी क्षेत्रात ५५ डेसिबल आणि शांतता क्षेत्रात ४५ डेसिबल पेक्षा जास्त असू नये, असे स्पष्ट निर्देश आहेत. ढोल ताशांचा आवाज ७५ डिसिबल पेक्षा कमी असतो का? पालकमंत्री ढोल ताशे वाजवण्यात यावेत असे आवाहन कसे काय करू शकतात? गणेश मंडळांनी पालकमंत्र्यांच्या सल्ल्याप्रमाणे ढोल ताशे ठराविक डेसिबल पेक्षा जास्त आवाजाने वाजवले तर त्यांच्यावर पोलीस कारवाई करतील का? पोलीस यंत्रणा सुप्रीम कोर्टाचे निर्देशांचे पालन करतील की पालकमंत्र्यांनी गणेश मंडळांना सल्ला दिला म्हणून मूग गिळून बसतील? असा प्रश्न निर्माण झाला आहे.