ध्रुवीकरणाचा उपदेश देणाऱ्यांनी आधी आरसा बघावा!
श्रीरामपूरच्या पत्रकार परिषदेत शुक्रवारी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी पुन्हा एकदा मुस्लिम समाजावर भाष्य करताना “धर्माच्या आधारावर मत देऊ नका, विकासाच्या मुद्यावर मत द्या” असं आवाहन केलं. ऐकायला अगदी छान वाटतं, पण बोलणाऱ्याने स्वतःचा आरसा आधी पाहावा, इतकं तरी नागरिक म्हणून आपण विचारू शकतो का?
कारण हे तेच डॉ. सुजय विखे, ज्यांनी २०१९ मध्ये भाजपकडून निवडणूक लढवून “धर्म आणि राष्ट्रवाद” या दोन मुद्द्यांवरच विजय मिळवला होता. आणि २०२४ मध्ये जेव्हा मतदारांनी त्यांना नाकारलं — विशेषतः मुस्लिम समाजाने — तेव्हा त्यांचं भाषण अचानक ‘धार्मिक ध्रुवीकरणा’विरोधात वळलं! म्हणजे सत्तेत असताना धर्म हा ‘राजकारणाचा पाया’, पण सत्तेतून बाहेर गेल्यावर तो ‘राजकारणाचं संकट’? हे दुहेरी धोरण नाही तर मग काय?

शिर्डी प्रमाणेच श्रीरामपूर आणि नगरला गुन्हेगारीमुक्त करण्याचा त्यांनी घेतलेला निश्चय स्वागतार्ह आहे. पण त्याच नगर मधील संग्राम जगतापसारख्या गुन्हेगारी आरोपांनी वेढलेल्या व्यक्तीवर कारवाई करण्याची ताकद त्यांच्यात किंवा त्यांच्या वडिलांमध्ये आहे का, हा प्रश्न लोक विचारत आहेत. कारण संग्राम जगताप हे केवळ एक व्यक्ती नाही, तर भाजप-राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सोयीच्या राजकारणाचं प्रतीक झाले आहेत.
जर खरोखरच डॉ. विखे यांना गुन्हेगारी संपवायची असेल, तर पत्रकार परिषदेत धमकीवजा सल्ले देण्यापेक्षा त्यांनी थेट पोलीस अधीक्षकांना पत्र लिहावं किंवा वडिलांकरवी आदेश द्यावेत — “संग्राम जगताप याला तडीपार करा” असं ठणकावून सांगावं. पण ते करतील का? नाही. कारण ज्यांच्या पक्षाने त्यांना ईडी-सीबीआयच्या चौकशीतून धुवून काढलं, त्याच पक्षातील गटांवर ते बोट ठेवू शकत नाहीत.
त्यांच्या वक्तव्यातला “मुस्लिमांनी भूमिका बदलली नाही तर दुसरा संग्राम जगताप तयार होईल” हा इशारा तर अधिक धोकादायक आहे. म्हणजे गुन्हेगारी रोखण्याची जबाबदारी सरकारची, पालकमंत्री असलेल्या त्यांच्या वडिलांची, पण धमकी मुस्लिम समाजाला? आणि हेच लोक “ध्रुवीकरण थांबवा” म्हणत देशात फिरतात!
राजकीय वास्तव असं आहे की, आज श्रीरामपूर-शिर्डी-नगर परिसरात विकासाचं नाव घेतलं जातं तेवढं ते निवडणुकीचं ब्रीदवाक्य म्हणून — प्रत्यक्षात मात्र सगळं राजकारण धर्म, जात, आणि सत्तेच्या समीकरणांभोवती फिरतं. मुस्लिम समाज अल्लाह शिवाय कोणाला घाबरत नाही. असे कितीही संग्राम जगताप तयार झाले तरी मुसलमानांना काही फरक पडणार नाही.
विखे पाटील घराणं हे सहकार चळवळीचं प्रतीक राहिलं, पण आज तेच घराणं भाजपच्या सत्तेच्या वॉशिंग मशीनमध्ये धुतलं गेलं आहे. “धर्मावर मत देऊ नका” म्हणणारेच लोक धर्मावर सत्तेचा पाया रचतात, हे जनतेला चांगलं कळून चुकलं आहे.
मुस्लिम समाजाने कोणाला मत द्यायचं हे ठरवताना कुणाचं आदेशपत्र नको — ते त्यांच्या विचारांचा, त्यांच्या हक्कांचा आणि त्यांच्या अनुभवांचा निर्णय आहे. आणि तो निर्णय संविधानाच्या आत्म्यातून घेतला जातो.
म्हणूनच डॉ. सुजय विखे पाटील आणि त्यांचे राजकीय गुरू मंडळींनी ‘ध्रुवीकरण थांबवा’ म्हणण्यापूर्वी ‘राजकारणातील दुटप्पीपणा थांबवा’ असा संकल्प करावा, एवढंच लोकांना सांगायचं आहे.
कारण जनता मूर्ख नाही. तिला सल्ले नाहीत — न्याय, समानता आणि खऱ्या विकासाची गरज आहे.
-डॉ. रियाज़ देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त (सेनि), संभाजी नगर. (औरंगाबाद).