खिल्ली उडाओ: महानगरपालिकेला आरसा दाखवणार MASS_India

छत्रपती संभाजीनगर: २४ ऑगस्ट : माहिती सेवा समिती (MASS_India) या एनजीओकडून छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या स्वच्छता अभियानातील दाव्यांची खिल्ली उडवण्यासाठी ‘Name and Shame’ आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. स्वच्छ भारत अभियानात शहराला देशात सहावे स्थान मिळाल्याचा दावा महानगरपालिकेने केला आहे. मात्र, शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसत असल्याने नागरिकांना हा दावा आश्चर्यकारक वाटतो. स्वच्छतेच्या निरीक्षणासाठी आलेल्या पथकाला हे कचरे दिसले नाहीत का, असा सवाल नागरिक विचारत आहेत.

        शहरातील खरी परिस्थिती लोकांसमोर आणण्यासाठी आणि महानगरपालिकेला जागे करण्यासाठी माहिती सेवा समितीने हे आंदोलन हाती घेतले आहे. यासाठीच्या तयारीसाठी आज समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. सुरेश मॅन्चीरेल आणि महिला अध्यक्ष ॲड. शिवानी जयस्वाल यांनी मार्गदर्शन केले. आंदोलनाद्वारे शहरातील स्वच्छतेच्या समस्यांवर प्रकाश टाकला जाणार आहे. 

    याप्रसंगी माहिती सेवा समितीचे पदाधिकारी सत्संग राज सोनवणे (शहराध्यक्ष), नंदकिशोर पालकर, अप्पा बिराजदार, चाँद मिर्झा, सफदर अली परशिमम, इम्रान शेख, रवींद्र कीर्तीशाही आणि डॉ. रियाज देशमुख इत्यादींची उपस्थिती होती