खा. इम्तियाज जलील द्वारा आयोजित रोजगार मेळाव्याला उदंड प्रतिसाद, तब्बल इतक्या लोकांना मिळाला रोजगार ....
औरंगाबाद : खासदार इम्तियाज जलील यांनी सुशिक्षीत बेरोजगार युवक व युवतींसाठी सुरु केलेल्या जॉब अलर्टस योजने अंतर्गत शनिवारी आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यात विविध शैक्षणिक अर्हता असलेल्या ४५३२ सुशिक्षित बेरोजगार युवकांनी विविध नामांकित कंपन्या / आस्थापनेत विविध पदांकरिता मुलाखाती दिल्या असून त्यामधुन विविध नामांकित कंपनी व आस्थपनेत १६७० युवकांना रोजगार मिळाला असल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली.
खासदार इम्तियाज जलील यांच्या कार्यालयात सकाळी दहा वाजेपासूनच युवकांनी मुलाखत देण्याकरिता प्रचंड गर्दी केली होती. सदरहु मुलाखाती सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत सुरु होत्या.
खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील युवक व युवतींना जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हावी याकरिता जॉब अलर्टस ही योजना सुरु केली आहे. जॉब अलर्टसच्या वतीने औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व समाजातील सर्व स्तरातील विविध कौशल्य आणि शैक्षणिक अर्हता प्राप्त युवक–युवतींना विविध कंपनी / आस्थापनेत रोजगार व स्वयंरोजगाराची संपूर्ण माहिती उपलब्ध करुन देण्यात येते व त्यांच्या शैक्षणिक अहर्तेप्रमाणे त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येतात. या योजनेतंर्गत मागील दोन वर्षात ५ हजाराहुन अधिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
नामांकित कंपन्यामध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळणार या हेतुने जिल्हाभरातून बहुसंख्येने युवक शैक्षणिक कागदपत्रे व बायोडाटा घेवुन आजच्या रोजगार मेळाव्यात सहभागी झाले होते. मागील दोन वर्षांपासून लॉकडाऊन असल्यामूळे लाखो तरुणाच्या याकाळात नोकऱ्या गमावल्याने बेरोजगारीचा सामना करावा लागत होता.
खासदार इम्तियाज जलील यांनी बेरोजगारीची समस्या ओळखत जिल्हयातील युवकांसाठी नामांकित कंपन्यात नोकरी मिळावी म्हणुन रोजगार मेळावा आपल्या संपर्क कार्यालयाच्या ठिकाणीच आयोजित केला होता. यावेळी शेकडो युवकांना थेट मुलाखती नंतर नामांकित कंपन्यांत नियुक्ती देण्यात आली. तसेच या रोजगार मेळाव्यास ग्रामीण भागातील तरुणांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. ग्रामीण भागातील युवकांना देखील आजच्या मेळाव्यात प्रचंड प्रमाणात नियुक्ती मिळाल्याने खासदार इम्तियाज जलील यांनी समाधान व्यक्त केले.
खासदार इम्तियाज जलील दोन दिवसात करणार मोठी घोषणा
मागील काही दिवसापासून औरंगाबाद जिल्ह्यातील युवकांच्या मुख्य प्रश्नाकडे दुर्लक्ष करुन धार्मिक राजकारण सुरु होते; मात्र खासदार इम्तियाज जलील यांनी युवकांना रोजगार मिळावा म्हणून संपुर्ण लक्ष केंद्रित केले होते. जिल्ह्याचा सर्वांगिण विकास व्हावा हेच ध्येय समोर ठेवून पुढील दोन दिवसात मोठी घोषणा करणार असल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी प्रसार माध्यमांना दिली