दारू, ड्राय डे आणि ‘दोन समीर’ : महाराष्ट्राच्या राजकारणातला नवाकोरा नशेचा पेग!

दारू, ड्राय डे आणि ‘दोन समीर’ : महाराष्ट्राच्या राजकारणातला नवाकोरा नशेचा पेग!

             महाराष्ट्र सरकारने होळी, मोहर्रम आणि गांधी जयंतीसारख्या पारंपरिक ‘ड्राय डे’ना इतिहासजमा करण्याचा निर्णय घेतला आणि राज्यात एक वेगळीच नशा पसरली — दारूची नाही, तर चर्चेची! आतापर्यंत सणांच्या दिवशी दुकानांचे शटर खाली आणि नैतिकतेचे शटर वर असायचे; आता मात्र दोन्ही शटर उघडे ठेवण्याची सरकारी परवानगी मिळाल्याने अर्थकारणाचा ग्लास टणटणीत वाजू लागला आहे.
सरकारचे म्हणणे सरळ आहे — “बेकायदेशीर दारूला आळा घालायचा आणि महसूल वाढवायचा.” म्हणजे आतापर्यंत जे ‘ड्राय डे’ला लपून-छपून होत होते, ते आता थेट सरकारच्या आशीर्वादाने होणार. काळाबाजाराचा नळ बंद करून महसुलाचा टँकर भरायचा — हा अर्थशास्त्राचा नवा मंत्र!

इम्तियाज जलील यांचा ‘दारूबंदीचा नगरसेवक मॉडल
          याच दरम्यान माजी खासदार आणि एम आय एम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी एक भन्नाट प्रस्ताव मांडला —“दारू पिणाऱ्यांनी महानगरपालिकेच्या हद्दीबाहेर जाऊन प्या!”
ही कल्पना ऐकून शहरातील दारूच्या दुकानांनी बहुधा गूगल मॅप उघडले असतील — “महापालिका सीमा नेमकी कुठे संपते?”जर हा ठराव पास झाला तर शहराबाहेर ‘दारू पिणाऱ्यांची पर्यटनस्थळे’ तयार होतील.“चल रे, आज शहराबाहेर जाऊन एक पेग मारून येऊ” — असा नवा वीकेंड प्लॅन तयार होईल!

गणवेशातल्या पोलिसांचा ‘५० मीटरचा सन्मान’
         सरकारचा आणखी एक मोत्यासारखा आदेश — पोलिसांनी गणवेशात दारूच्या दुकानात जाऊन किंवा ५० मीटरच्या आत कोणाला विचारू नये की त्याच्याकडे लायसन्स आहे की नाही. कारण लोक घाबरतात आणि महसूल कमी होतो!
म्हणजे आता कायद्याचे रक्षण करणारा गणवेश स्वतःच महसुलासाठी ५० मीटर दूर उभा राहणार.कायद्याची अंमलबजावणी आणि महसूल यांच्यातील हा ‘सोशल डिस्टन्सिंग’ पाहून कोरोनालाही लाज वाटेल!

मोहर्रम, इस्लाम आणि सरकारची चिंता
         इस्लाममध्ये दारू हराम आहे — हे सर्वश्रुत. त्यामुळे मोहर्रमला ड्राय डे काढला किंवा ठेवला तरी मुस्लिम समाजावर त्याचा काहीच परिणाम नाही.म्हणजे सरकारने घेतलेला निर्णय हा ज्या समाजासाठी घेतल्याचा आभास निर्माण होतो, त्यांनाच फरक पडत नाही — हा राजकारणातील ‘नॉन-अल्कोहोलिक कॉकटेल’!

गांधी जयंती आणि संतप्त आत्मे
         खरा पेग इथे बसतो — गांधी जयंती.ज्यांनी आयुष्यभर दारूबंदीचा संदेश दिला, त्यांच्या जयंतीला दारूची मोकळीक.गांधींचे फोटो नोटांवर आणि त्याच नोटांनी गांधी जयंतीला पेग — हा भारतीय अर्थव्यवस्थेचा परिपूर्ण सर्कल!
गांधींना मानणारे आणि नथुराम गोडसेंचा तिरस्कार करणारे नागरिक संतप्त होणार नाहीत तर काय करणार?“हेच का गांधींचे महाराष्ट्र?” असा प्रश्न आता चहाच्या टपरीपासून सोशल मीडियापर्यंत फिरतो आहे.

संभाजीनगरमध्ये ‘दोन समीर’चा महासंग्राम
         आता खरी मजा संभाजीनगरमध्ये —एका बाजूला भाजपचे महापौर समीर,दुसऱ्या बाजूला एमआयएमचे विरोधी पक्षनेते समीर!
इम्तियाज जलील यांनी देशी दारूची दुकाने शहराबाहेर हलवण्याचा ठराव पहिल्याच सर्वसाधारण सभेत मांडण्याचे आव्हान दिले आहे.
आता प्रश्न असा —दोन्ही समीर एकाच दिशेने चालतील का?की महापालिकेच्या सभागृहात ‘समीर विरुद्ध समीर’ असा सामना रंगेल?
राजकारणात इतकी वर्षे ‘विचारांची लढाई’ पाहिली; आता नावांची लढाई पाहायला मिळणार —“समीर १ : दारू बाहेर!”“समीर २ : महसूल आत!”

दारूचा पेग की राजकारणाचा ड्रामा?
        एकीकडे सरकार महसुलासाठी ड्राय डे संपवत आहे,दुसरीकडे दारूची दुकाने शहराबाहेर हलवण्याचा प्रस्ताव,तिसरीकडे पोलिसांना ५० मीटर दूर ठेवण्याचा आदेश,आणि चौथीकडे गांधी जयंतीचा नैतिक प्रश्न.
म्हणजे महाराष्ट्रात दारूचा प्रश्न हा सामाजिक कमी आणि राजकीय जास्त झाला आहे.पेग कोणाचा — सरकारचा, विरोधकांचा की जनतेचा — हे समजण्याआधीच ग्लास रिकामा होतो!

शेवटचा ‘टोस्ट’
        दारू पिणाऱ्यांनी शहराबाहेर जाऊन प्यायचे,पोलिसांनी ५० मीटर दूर उभे राहायचे,गांधी जयंतीला महसूल वाढवायचा,आणि दोन समीरांनी ठरावावर निर्णय घ्यायचा.
म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात आता विचारांची नाही तर ‘दारूच्या बाटलीची कॅप’ उघडण्याची स्पर्धा सुरू आहे.
आता फक्त एवढेच पाहायचे —हा ठराव पास होतो की राजकारणाचा नशा उतरतो!

डॉ. आर. जी. देशमुख, ACP (Rtd),  संभाजीनगर (औरंगाबाद)