E20 पेट्रोलचा गाजावाजा; पण वाहनमालकांना संपूर्ण सत्य कोण सांगणार?

E20 पेट्रोलचा गाजावाजा; पण वाहनमालकांना संपूर्ण सत्य कोण सांगणार?

      देशभरात E20 पेट्रोलचा प्रचार मोठ्या उत्साहात सुरू आहे. पर्यावरण संरक्षण, परदेशी इंधनावरील अवलंबित्व कमी करणे आणि इथेनॉल मिश्रण वाढविणे या नावाखाली वाहनचालकांना E20 पेट्रोल वापरण्याचा सल्ला दिला जात आहे. मात्र एक मूलभूत प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे—देशातील कोट्यवधी वाहनमालकांना त्यांच्या वाहनांवर E20 पेट्रोलचा नेमका काय परिणाम होणार, याची स्पष्ट आणि लेखी हमी कोणी दिली आहे?

     सरकारने धोरण जाहीर केले, तेल कंपन्यांनी E20 पेट्रोल बाजारात आणले, वाहन उत्पादकांनी काही नवीन मॉडेल्सवर 'E20 Compatible' असा शिक्का मारला; पण सामान्य ग्राहकाला याचा अर्थ नेमका काय, हे अजूनही समजावून सांगितले गेलेले नाही.

     E20 म्हणजे २० टक्के इथेनॉल आणि ८० टक्के पेट्रोलचे मिश्रण. परंतु वाहनावर E20 असा उल्लेख असल्याने त्या वाहनाची दीर्घकालीन चाचणी झाली आहे का? सलग अनेक वर्षे E20 वापरल्यास इंजिन, फ्युएल पंप, इंजेक्टर, रबर सील, फ्युएल लाईन्स, इंजिन ऑइल आणि वाहनाच्या आयुष्यावर काय परिणाम होईल? या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर वाहन उत्पादकांनी लेखी स्वरूपात द्यायला हवे.

     ग्राहकाने लाखो रुपये खर्च करून वाहन खरेदी करायचे, प्रयोग मात्र ग्राहकाच्या खिशावर करायचे, अशी भूमिका योग्य ठरू शकत नाही. उद्या E20 वापरामुळे इंजिनमध्ये बिघाड झाला, मायलेज कमी झाले किंवा देखभालीचा खर्च वाढला, तर त्याची जबाबदारी कोण घेणार? सरकार, तेल कंपन्या की वाहन उत्पादक?

     वाहन उत्पादकांनी प्रत्येक ग्राहकाला स्पष्टपणे सांगावे की त्यांचे वाहन E20 पेट्रोलवर किती काळ सुरक्षित चालेल, कोणते भाग लवकर खराब होऊ शकतात, सर्व्हिसिंगमध्ये कोणते बदल आवश्यक आहेत आणि वॉरंटीवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही, याची लेखी हमी द्यावी.

      आज प्रत्येक वाहनमालकाने आपल्या वाहन उत्पादकाला माहितीच्या अधिकाराने नव्हे, तर ग्राहक म्हणून आपल्या हक्काने हे प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. कारण माहितीशिवाय घेतलेला निर्णय हा ग्राहकाच्या हिताचा नसतो.

      पर्यावरणाचे संरक्षण महत्त्वाचेच आहे; परंतु त्या नावाखाली ग्राहकांच्या वाहनांवर आणि त्यांच्या खिशावर कोणताही अनावश्यक भार पडणार नाही, याची जबाबदारी सरकार आणि वाहन उत्पादकांनी स्वीकारली पाहिजे. E20 बाबत पारदर्शकता, वैज्ञानिक माहिती आणि लेखी हमी मिळाल्याशिवाय वाहनमालकांच्या मनातील शंका दूर होणार नाहीत.

रियाज़ देशमुख, MASS_India कार्यकर्ता, संभाजीनगर -- 8888836498