आ. रोहित पवारांच्या स्वराज्य ध्वजाची शिवपट्टण किल्ल्यावर दिमाखात प्रतिष्ठापना
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते व आमदार रोहित पवार यांच्या अनोख्या संकल्पनेतील विक्रमी उंचीच्या भगव्या स्वराज्य ध्वजाचा भव्य आणि दिमाखदार प्रतिष्ठापना सोहळा अहमदनगरच्या खर्डा येथील शिवपट्टण किल्ल्यावर विजयादशमीच्या मुहूर्तावर १५ ऑक्टोबरला संपन्न झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षेपी आणि आदर्श स्वराज्य कारभाराची शिकवण देत स्वराज्य ध्वजाने अवघ्या महिनाभराच्या प्रवासातच प्रचंड लोकप्रियता मिळवली. त्यामुळे या स्वराज्य ध्वजाच्या प्रतिष्ठापना सोहळ्याबाबत राज्यभरात उत्सुकता वाढीस लागली होती आणि आज तब्बल ३७ दिवसांनी राज्यातील जनतेच्या आणि उपस्थित जनसमुदायाच्या साक्षीने हा शानदार भगवा गगनात झळकला. अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा येथील शिवपट्ट्ण किल्ल्यावरील या भव्य प्रतिष्ठापना व ध्वजारोहण सोहळ्याला राज्यभरातून अनेक प्रेरणादायी व्यक्तिमत्वांनी हजेरी लावली. आपल्या ७४ मीटर उंचीने नवी ओळख महाराष्ट्राला मिळवून देत जगातील व देशातील सर्वात उंच असा विक्रम प्रस्थापित करणा-या या स्वराज्य ध्वजाच्या प्रतिष्ठापना सोहळ्याला कर्जत-जामखेडकरांसह राज्यातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहून आशिर्वाद दिले.
या सोहळ्याचे स्थळ म्हणजे खर्डा भुईकोट किल्ल्यासमोरच्या पटांगणात हा रंगतदार सोहळा सजला. यावेळी उपस्थितांचं स्वागत करताना आमदार पवार म्हणाले, स्वराज्य ध्वजाची खरी ताकत एकतेची आणि समानतेची आहे, ही या मातीतील ताकद आहे, इथला विचार आहे. त्याला मानवंदना देण्यासाठी आपण सर्व आलात. या कार्यक्रमातून तुम्हाला काय फायदा आहे असं विचारणा-यांना मी सांगू इच्छितो की मला प्रसिद्धी नको आहे, मात्र एकतेची आणि समानतेची शिकवण देणा-या या स्वराज्य ध्वजाला आज लहानथोरांनी, युवा-वृद्धांनी आपलं मानलंय हेच पुरेसं आहे.
रोहित पवारांनी भाषणात पुढे सांगितलं की, मी भगव्या रंगाचं राजकारण होऊ देणार नाही. नवीन वस्तूचे आपण पूजन करतो त्याचप्रमाणे स्वराज्य स्वराज्य ध्वजाचे ही आज आपण पूजन केले. आपल्या धर्मग्रंथांमध्ये सुद्धा हाच विचार आहे की एकत्र आल्यानंतर जी ताकद आहे त्या ताकदीने आपलं कुटुंब, आपला परिसर, आपलं राज्य आणि आपला देश विकसित करा व माणुसकीला महत्व द्या. हाच विचार आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दिला जातो आणि त्याचं प्रतीक म्हणजे हा भगवा स्वराज्य ध्वज असल्याचं सांगत त्यांनी ध्वज संकल्पनेमागचा उद्देश स्पष्ट केला.
आपल्या महाराष्ट्राची शान असणा-या सामान्य कुटुंबातील असामान्य ताकद आणि कर्तृत्व दाखवणा-या लोकांनाच आम्ही आज पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यामागे त्यांच्याकडून युवावर्गाने प्रेरणा घ्यावी हाच हेतू असल्याचंही पवार म्हणाले. स्वराज्य ध्वजाची प्रेरणा आपल्याला भारतीय संस्कृतीतूनच मिळाल्याचं सांगत ते म्हणाले, तहानलेल्याला जात-पात न विचारता त्याला पाणी देतो, भूक लागणा-यांना जेवण देतो. ही आपली संस्कृती आहे. लहान मुलाला सतरा कोटीच्या इंजेक्शनची गरज लागली त्यावेळेस कोणी दहा कोणी शंभर रुपये जमा केले आणि त्या बाळाचा जीव वाचवायला धडपड केली. वाढदिवसानिमित्त अनेक जण रक्तदान करतात. रक्तदान करताना कोणताही विचार मनामध्ये न ठेवता फक्त एकच विचार असतो की त्याने कोणाचा तरी जीव वाचवावा. ही आपली भारतीय संस्कृती आहे आणि याचं प्रतीक हा स्वराज्य ध्वज आहे.
आपल्याला स्वराज्य निर्माण करायचे आहे. त्यासाठी प्रयत्न करायचे आहेत, प्रयत्न करत असताना जे आपल्यातून निघून गेले, ज्यांनी कष्ट केले, कर्म केले त्यांना विसरून चालणार नाही अशी आशाही रोहित पवार यांनी यावेळी युवावर्गाला दिली. शाहू-फुले- आंबेडकर यांनी आपल्याला विचार दिला, तो सुद्धा आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. महात्मा ज्योतिबा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी लोकांना शिकवलं. बहुजन समाजातील लोकांना शिकवलं. त्यावेळी त्यांनी तो ध्यास घेतला नसता तर अनेक लोक शिक्षणापासून वंचित राहिले असते. आपण या ठिकाणी आला आहात तो चांगलाच विचार घेऊन जाण्यासाठी असं सांगत त्यांनी स्वराज्य ध्वजाकडून मिळणा-या प्रेरणेतून नेमका काय संदेश घ्यावा हे स्पष्ट केलं. यानंतर रोहित पवार यांनी उपस्थितांसह एका प्रतिज्ञेचे वाचन केले.
या सोहळ्याला विद्यमान आमदार संजय दौंड, आमदार बाळासाहेब काका आसबे, आमदार संजय मामा शिंदे, आमदार संदीप भैय्या क्षीरसागर, माजी आमदार राहुल भैय्या मोरे, माजी आमदार मधुसूदन केंद्रे हे उपस्थित होते. शिवाय या सोहळ्यात आदर्श शिक्षक रणजित डिसले, ह.भ.प जलाल महाराज सय्यद, फणसकिंग हरिश्चंद्र देसाई, कोविड योद्धा अक्षय कोठावळे, मुंबई डब्बेवाला संघाचे प्रवक्ता रितेश आंद्रे, वन्यजीव संवर्धक बंडू धोत्रे, पॅराऑलिम्पिक तरणपटू सुयश जाधव, नौकानयनपटू दत्तू भोकानाळ, मसाला क्विन उद्योजिका कमलताई परदेशी, बीज संवर्धक शेतकरी राहीबाई पोपरे, प्रगतीशील शेतकरी ज्ञानेश्वर बोडके व विलास शिंदे, दुग्धव्यावसायिका श्रद्धा धवन, घोंगडी निर्माणकार जगू कुचेकर, डॉ. फॉर बेगर्स या एनजीओचे संस्थापक-अभिजित सोनावणे, ऑक्सिजन मॅन शाहनवाझ शेख आणि हिदायत माणेर, सर्पमित्र राजेश ठोंबरे, बारीपाडा या आदर्श आदीवासी गावाचे सरपंच चैत्राम पवार, युवा शास्त्रज्ञ करीश्मा इनामदार, युवा एस्ट्रोफोटोग्राफर पथमेश जाजू, तमाशा कलावंत मंगलाताई बनसोडे, गायक अवधूत गांधी, स्त्री भ्रूण हत्येविरोधात कार्य करणारे . गणेश राख, युवा साहित्य अकादमी विजेता लेखक नवनाथ गोरे, सनदी अधिकारी मोनिका कांबळे, पेंटॅथ्लॉनिस्ट क्रिडापटू .अजिंक्य बालवडकर आणि कुस्तीपटू काळे यांचा सन्मान करण्यात आला. शहिद कॅप्टन विनायक गोरे यांच्या मातोश्री अनुराधा गोरे यांच्या हस्ते स्वराज्य ज्योत प्रज्वलित करण्यात आली.
कर्जत-जामखेड तालुक्याला नवी ओळख मिळवून देणारा हा स्वराज्य ध्वज अनेकांसाठी आता आदर्श प्रेरणा बनला आहे. महाराष्ट्राच्या शौर्यशाली परंपरेतून जन्मलेल्या, एकतेची-बंधुत्वाची हाक देणा-या व ७४ मीटर अशा विक्रमी उंचीने सर्वांच्या मनात भरलेल्या भगव्या स्वराज्य ध्वजाने थोड्याच दिवसात अथक यात्रेकरवी जनमानसात आणि देशभरातही महाराष्ट्राच्या करारी इतिहासाची ओळख पोहोचवण्यात मोठं योगदान दिलं आहे. ३७ दिवसांचा अहोरात्र प्रवास करत, ९६ शक्तीपीठे आणि प्रेरणास्थळांना वंदन करत, महाराष्ट्रातील ३६ जिल्हे व इतर पाच राज्यांना भेट देऊन पुन्हा राज्यात पोहोचलेला हा भगवा स्वराज्य ध्वज आता कायमच उंच झळकून आपल्या सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श स्वराज्यधर्माची आठवण करून देत राहाणार आहे
हिंदवी स्वराज्य संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराजांच्या ६ जून १६७४ रोजी झालेल्या राज्याभिषेकाचे स्मरण म्हणून या ध्वजाची उंची ७४ मीटर ठेवण्यात आली आहे. या ध्वजाचा आकार ९६X६४ फूट आहे. ध्वज स्तंभाचे वजन १८ टन असून नुसत्या ध्वजाचे वजन ९० किलो आहे. साडे पंचावन्न हजार चौरस फूट आकार असलेला हा ध्वज देशात सर्वांचे आकर्षण ठरला आहे. असा हा मंगल ध्वज कर्जत-जामखेडवासियांसाठी सध्या अभिमानाचा विषय आहे. या किल्ल्याची निर्मिती सरदार राजे निंबाळकर यांनी १७४३ साली केली होती. इ.स १७९५ मध्ये अहमदनगर जवळ खर्डा या ठिकाणी हैदराबादच्या निजामाला मराठ्यांनी पाणी पाजले. हि अखेरची शौर्यगाथा याच शिवपट्टण किल्ल्याच्या परिसरात लिहिली गेली. हा ऐतिहासिक किल्ला जामखेड जवळ खर्डा या ठिकाणी आजही भरभक्कम अवस्थेत उभा आहे. अभेद्य तटबंदी असणारा हा किल्ला सहा खणखणीत बुरुजांनी संरक्षित आहे. आता येत्या दस-याला अवघ्या राज्याचं नवं स्वप्न असणा-या या भगव्या स्वराज्य ध्वजाची सन्मानाने दिमाखदार प्रतिष्ठापना झाली आहे आणि पुन्हा एकदा या किल्ल्यासमोर नवा विक्रमी इतिहास रचला गेला आहे.