अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा: विधानसभेची निवडणूक न लढवण्याचा निर्णय

शिवसेना शिंदे गटातील मराठवाड्यातील महत्त्वाचे नेते आणि सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी विधानसभेची पुढील निवडणूक न लढवण्याची घोषणा केली आहे. एका कार्यक्रमात त्यांनी सध्या राजकारणाच्या परिस्थितीवर नाराजी व्यक्त करत हा निर्णय घेतल्याचं सांगितलं.
सत्तार म्हणाले, “सध्या राजकारणाची परिस्थिती भविष्यासाठी घातक आहे. माझ्या राजकीय जीवनातील ही शेवटची निवडणूक होती. माझ्या मुलाला राजकारणात येण्याची इच्छा असल्यास तो स्वतःचा निर्णय घेऊ शकतो.”
एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये मंत्री राहिल्यानंतरही या वेळी त्यांना मंत्रिपद मिळालं नाही. त्यामुळे त्यांची नाराजी व्यक्त होत होती. शिंदे गटाने मराठवाड्यातून संजय शिरसाट यांना मंत्रिपद दिलं आहे.
पक्ष सोडण्याच्या चर्चांवर सत्तार म्हणाले, “जोपर्यंत एकनाथ शिंदे यांचा माझ्यावर विश्वास आहे, तोपर्यंत मी त्यांच्या सोबत आहे. विश्वास संपल्यावर मी योग्य निर्णय घेईन.”
अब्दुल सत्तार यांनी काही दिवसांपूर्वी "मी पुन्हा येईन" असं म्हणत मंत्रिमंडळात परतण्याचा विश्वास व्यक्त केला होता. मात्र आता त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर करत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आणलं आहे.