HIT FIRE : आमदार राणा डॅमेज कंट्रोल कसं करणार?

HIT FIRE : आमदार राणा डॅमेज कंट्रोल कसं करणार?

      भाजपच्या हिंदुत्वाच्या पखाली वाहत असलेले बडनेराचे आमदार रवी राणा यांना ‘साडेसाती’ लागल्यासमान एकामागून एक धक्के बसत आहेत. या धक्क्यांनी त्यांची राजकीय प्रतिमा डागाळत आहे. दलित-मुस्लीम संघटना त्यांच्यापासून अंतर राखून आहेत किंबहुना त्यापैकी काही संघटनांनी काडीमोड घेतला तर बहुतेक संघटनांनी त्यांच्याविरुद्ध जाहीर एल्गार पुकारत 2 मे रोजी आक्रोश मोर्चा काढण्याचा निर्धार केलेला आहे. या मोर्चाला विविध स्तरातून व्यापक पाठिंबा मिळत आहे.  दुसरीकडे राजकारणातील ‘मदारी’ अशी काहीशी ओळख असलेल्या रवी राणांची ‘दारोमदार’ असलेल्या भाजपने त्यांचे ‘नामोनिशान’ मिटविण्याचा चंग बांधलेला आहे. राणा दाम्पत्याने लावलेल्या विकासकामांचे फलक उखाडून फेकण्यातून त्याची ‘झलक’ दिसलेली आहे. आता बाजार समितीच्या निवडणुकीत त्यांच्या शेतकरी पॅनलचा ‘सुपडा साफ’ झालेला आहे.

      भीम ब्रिगेडचा निष्ठावंत आंबेडकरी कार्यकर्ता राजेश वानखडे यांनी 13 एप्रिलच्या रात्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ अभिवादनासाठी गेलेल्या राणा दाम्पत्यासमोर ‘कोण आले रे कोण आले, भाजपचे दलाल आले’, अशा घोषणा दिल्या. त्या पश्चात राजेश वानखडे यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदविण्यात आला. आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमाला गालबोट लावण्याचा आणि विरोधात आवाज उठविणार्‍याला खोट्या गुन्ह्यात अडकवून सामाजिक जीवनातून उद्ध्वस्त करण्याच्या हा कट आहे. या कारस्थानाचे पडद्यामागील सूत्रधार आमदार रवी राणा आहेत, असा आंबेडकरी कार्यकर्त्यांचा आक्षेप आहे. हजारो लोकांची उपस्थिती पण त्रयस्थ ‘साक्षी’दार कुणीच नाही. तक्रारदारच ‘डिफॉल्टर’ व मनपा आयुक्तांवरील शाईहल्ला प्रकरणातील आरोपी असल्याचे आंबेडकरी अनुयायांचे म्हणणे आहे. पोलिसांनी सुरक्षितेच्या दृष्टीकोनातून लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे त्या रात्री जिवंत होते. त्याचे फुटेज पाहून कारवाई करावी, अशी दस्तुरखुद्द कार्यकर्त्यांची मागणी आहे. पोलीस त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. स्थानिक पातळीवरसुद्धा  यंत्रणेच्या गैरवापराचा ठपका ठेवला जात आहे, ही चिंताजनक बाब आहे. अशा स्थितीत पोलिसांनी स्वतःला कुणाच्या खुट्याला बांधून घेण्यापेक्षा कर्तव्याशी बांधिल राहून जनतेचा विश्वास संपादन केला पाहिजे. आंबेडकरी कार्यकर्ते पोलिसांच्या सन्मानाचे समर्थक आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या बाजूने नेहमीच उभे राहिलेले आहेत. राजकीय हेतूने त्यांच्यावर जर कुठे अन्याय होत असेल तर ती कर्तव्याची प्रतारणा ठरणार आहे, याची नोंद पोलिस आयुक्त डॉ. नविनश्चंद्र रेड्डी घेतील, अशी अपेक्षा करू या!

      महापालिकेतील माजी गटनेते, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य  तुषार भारतीय यांच्या नेतृत्वात भाजप कार्यकर्त्यांनी सातुर्णा अकोली मार्गावरील विकासकामाच्या फलकावरील आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्या नावाला काळे फासत ते फलक उखाडून फेकले. राणा दाम्पत्याला हा मोठा झटका आहे. राणा दाम्पत्य राज्य व राष्ट्रीय पातळीवर भाजप नेत्यांशी गोडीगुलाबीचे संबंध राखून असताना स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात खुलेआम भूमिका घेतली. त्याला राजकीय किनार आहे. भाजप पदाधिकारी व नगरसेवकांनी केलेल्या विकासकामांचे राणा दाम्पत्याने श्रेय घेऊ नये. त्यांनी जर कुठे असे फलक लावलेले असतील ते काढून टाकावे, असा इशारा राणा दाम्पत्याच्या नावाला काळे फासण्यापूर्वी भाजपने त्यांना इशारा दिला होता.  मात्र स्थानिक भाजप कार्यकर्ते टोकाची भूमिका घेतील, असे राणा यांना कदाचित वाटले नसावे. भाजपच्या स्थानिक पदाधिकार्‍यांनीसुद्धा स्वबळावर ही भूमिका घेतली असेल असेही वाटत नाही. याचा अर्थ राणा दाम्पत्याने समजून घेतला पाहिजे. राणा दाम्पत्याने त्यांचे पूर्ण राजकीय भवितव्य स्वतःहून भाजपला समर्पित केलेले आहे. त्यामागे त्यांचे राजकीय गणित आहे. मात्र त्या गणितासाठी ते चुकीचे सूत्र वापरत आहेत, असे अनेकांना वाटते.

      एकीकडे राज्य व राष्ट्रीय पातळीवर राणा दाम्पत्याला चुचकारले जातेे, दुसरीकडे त्यांच्यावर दबाव ठेवला जातो. जोपर्यंत ठिक आहे, तोपर्यंत सोबत ठेवायचे, ज्यादिवशी फणा काढला, त्यादिवशी 'ठिकाणा'वर लावायचे, ही भाजपची खरी वृत्ती आहे. त्याचा अनुभव महाराष्ट्रातील भल्याभल्यांनी घेतलेला आहे. राणा दाम्पत्याच्या संदर्भातील इराद्याची दहीहंडी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांनी यापूर्वीच अमरावतीत फोडलेली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार याच आठवड्यात अमरावतीत येऊन गेले. त्यादरम्यान त्यांची गुप्त भेट घेतल्याची पोस्ट राणा यांच्या गोटातून वंचित बहुजन आघाडीत शिरलेल्या अभिजित देशमुख यांनी समाजमाध्यमांवर व्हायरल केली. त्यात किती तथ्य आहे, ते पवार साहेब अन् राणा जाणोत. काळाची पाऊले कशी पडतात, ते भविष्यात दिसून येईलच.

        जिल्ह्यात बाजार समित्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. माजी मंत्री तथा आमदार अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचा ‘करिश्मा’ त्यात दिसून आला. पहिल्या टप्प्यात अमरावतीसह सहा बाजार समित्यांपैकी नांदगाव खंडेश्वर येथे अभिजित ढेपे व दुसर्‍या टप्प्यात चांदूरबाजार येथे बच्चू कडू, वरुडमध्ये डॉ. बोंडे-ठाकरे यांची सरशी झाली. हा अपवाद वगळता महाविकास आघाडीने ‘जय बजरंग बली’चा जयघोष केलेला आहे. ज्यांनी राजकारणासाठी हनुमान चालिसाचा दुरूपयोग केला, त्यांना मतदाररुपी हनुमानाने धडा शिकविल्याची टीका आमदार यशोमती ठाकूर यांनी केलेली आहे. यशोमती ठाकूर या ‘किंगमेकर’ आणि त्यांचे सहकारी आमदार बळवंत वानखडे, माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप तसेच राष्ट्रवादी-उबाठा शिवसेनेचे शिलेदार बाणेदार ठरले आहेत. कोट्यवधींची उलाढाल असलेल्या अमरावती बाजार समितीत मविआने मतविभाजन होऊनसुद्धा रवि राणा व भाजपप्रणित पॅनलचा धुव्वा उडवत व चारमुंड्या चित करून ‘मातेरा’ चारला. तर उबाठा शिवसेनेने जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनी वेगळी चूल मांडूनही  त्यांच्या हातात राख आली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी चांदूरबाजारात भाजपसोबत हात मिळवणी करूनही त्यांना भोपळासुद्धा फोडता आलेला नाही. वरुडमध्ये ठाकरे गटाने भाजपच्या डॉ. बोंडे गटाला सोबत घेऊन माजीमंत्री हर्षवर्धन देशमुख, आमदार देवेंद्र भूयार यांना मात दिली. सहकारात आम्ही नवखे आहोत, अनुभव कमी पडला, असे म्हणण्याची नामुश्की राणा व भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्यावर ओढावली. भाजपा जिल्हाध्यक्ष निवेदिता दिघडे पिक्चरमधून गायब झालेल्या आहेत. तोंड दाखवायलासुद्धा जागा शिल्लक राहिलेली नाही. निवडणुकीत जय-पराजय होतच असतो. परंतु राणा-बोंडेसाठी हा झटका 440 व्होल्टपेक्षा कमी नाही. 

       आंबेडकरी संघटना, त्यानंतर स्थानिक भाजपचा उघड रोष आणि आता बाजार समितीच्या निवडणुकीतील दारुण पराभव, असे एकापाठोपाठ एक धक्के आमदार राणा यांना बसलेले आहेत. त्यांची राजकीय भूमिका वादग्रस्त असली तरी व्यक्ती म्हणून ते कनवाळू आहेत. वाढदिवशी बाजार समितीतून पराभवाची भेट मिळणे, हे खेदजनक आहे. मविआला मिळालेला ‘दणदणीत’ विजय सत्ताधार्‍यांची ‘दाणादाण’ उडविणारा आहे. हा निकाल आगामी लोकसभा व विधानसभेचा ‘ट्रेलर’ व ‘ट्रायल’ असल्याचे मानले जाते. या पार्श्वभूमीवर आमदार रवी राणा यांच्यासमोर ‘डॅमेज कंट्रोल’ करण्याचे मोठे आव्हान आहे. घोडा मैदान समोर आहेच. तूर्त त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा!


- गोपाल रा. हरणे, वरिष्ठ पत्रकार, अमरावती.
9422855496