पटना हिजाब प्रकरणाने देश हादरला : मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी महिला डॉक्टरचा नकाब खेचल्याने संताप, समाजवादी पार्टीचा राष्ट्रपतींकडे दणका

पटना हिजाब प्रकरणाने देश हादरला : मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी महिला डॉक्टरचा नकाब खेचल्याने संताप, समाजवादी पार्टीचा राष्ट्रपतींकडे दणका

छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद), दि. १८ डिसेंबर: १५ डिसेंबर २०२५ रोजी पटना येथे आयुष (AYUSH) डॉक्टरांना नियुक्ती पत्र वितरणाच्या शासकीय कार्यक्रमात घडलेल्या एका घटनेने देशभरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी या कार्यक्रमादरम्यान सार्वजनिक मंचावर मुस्लिम महिला डॉक्टर नुसरत परवीन यांचा नकाब (हिजाब/निकाब) खाली खेचल्याचा व्हिडिओ समोर आला असून तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये नियुक्ती पत्र स्वीकारताना मुख्यमंत्री नीतीश कुमार हे डॉक्टर नुसरत परवीन यांच्या चेहऱ्यावरील नकाबकडे हात नेत तो खाली खेचताना स्पष्टपणे दिसून येतात. या प्रकारामुळे महिला डॉक्टर पूर्णतः असहज झाल्याचे दृश्यांमधून दिसत असून, या घटनेवर सर्व स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

      या घटनेमुळे डॉक्टर नुसरत परवीन मानसिकदृष्ट्या गंभीररीत्या आहत झाल्या असून त्यांनी बिहार राज्य सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्यांनी बिहार सरकारची आयुष डॉक्टर म्हणून मिळालेली नोकरी जॉइन न करण्याचा ठाम निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकरणावर बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी अद्याप कोणतीही अधिकृत माफी मागितलेली नाही, त्यामुळे जनतेतील आणि महिला संघटनांमधील संताप अधिकच वाढत आहे. अनेक सामाजिक व राजकीय संघटनांनी या घटनेला महिलांच्या सन्मानावर आणि धार्मिक स्वातंत्र्यावर थेट आघात असल्याचे म्हटले आहे.

       या पार्श्वभूमीवर समाजवादी पार्टी, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) तर्फे या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. समाजवादी पार्टीने डिव्हिजनल कमिशनर यांच्या माध्यमातून राष्ट्रपती महोदयांना निवेदन सादर करून मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, मुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीकडून सार्वजनिक कार्यक्रमात एका महिलेच्या धार्मिक ओळखीशी छेडछाड होणे हे स्त्री सन्मान, संविधान आणि लोकशाही मूल्यांचा गंभीर अपमान आहे. समाजवादी पार्टीने या प्रकरणात भारतीय न्याय संहिता अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची तसेच मुख्यमंत्री नीतीश कुमार यांना त्यांच्या पदावरून तात्काळ बडतर्फ करण्याची ठाम मागणी केली आहे.

       निवेदन सादर करताना समाजवादी पार्टीचे स्टेट जनरल सेक्रेटरी शेख अब्दुल रऊफ, जिल्हा व महानगर अध्यक्ष शेख अय्यूब पटेल, जिल्हा महिला अध्यक्ष शाहीना पठान, महानगर महिला अध्यक्ष सीमा मंडविया यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पक्षाच्या वतीने सांगण्यात आले की, डॉक्टर नुसरत परवीन यांच्यासोबत घडलेली ही घटना केवळ एका व्यक्तीपुरती मर्यादित नसून ती संपूर्ण महिलावर्ग आणि मुस्लिम समाजाच्या भावना दुखावणारी आहे. महिलांच्या सन्मानाशी खेळ करणाऱ्या कोणत्याही सत्ताधाऱ्याला समाजवादी पार्टी कदापि पाठीशी घालणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

      समाजवादी पार्टीने स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई होत नाही आणि पीडित महिला डॉक्टरला न्याय मिळत नाही, तोपर्यंत ही लढाई सुरूच राहील. या घटनेमुळे बिहार सरकारची भूमिका काय राहते आणि मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्याकडून माफी अथवा स्पष्टीकरण दिले जाते का, याकडे देशभराचे लक्ष लागले आहे.