भाजपात गेलेल्यांची लवकरच झोप उडणार : मधुकर भावे यांचे मनोगत
पुणे: बरेच दिवस झाले.श्री. देवेंद्र फडणवीसांवर लिहीलं नव्हतं. या बरयाच दिवसात, त्यांच आवडत वाक्य ...‘मीच पुन्हा होईन’ ऐकायला मिळालं नव्हतं, असं वाटत होतं की, त्यांची खात्री पटली असावी, हे सरकार काय पडत नाही आणि मी पुन्हा मुख्यमंत्री होत नाही’ त्यामुळे विरोधी पक्षाला मंत्र्याचा जो दर्जा आहे. कॉंग्रेसच्या राजवटीत दिला गेला होता, त्याच फायद्यासह महाराष्ट्रात ते दौरा करत होते. पण मन अस्वस्थ होतं. त्यातून त्यांना पुन्हा एकदा त्यांना हुक्की आली आणि बोलून गेले... ‘मी मुख्यमंत्री असं मला वाटतयं...’ हे त्यांच्या मनातलं ते बोलले. असं वाटण खूप छान आहे. तसे वाटत रहावं पण वस्तुस्थिती तशी नाही.
गेले २ वर्षे उध्दव सरकार पाडण्याचा खटाटोप झाला. तारखा देण्यात आल्या, १०-१० दिवसांच्या मुदतीसुध्दा दिल्या गेल्या. सरकार काय पाडता आलं नाही. गोव्यात, कर्नाटकात, मध्यप्रदेशात महात्मा गांधींच्या फोटोंनी आमदार फोडून बहुमत मिळवणं शक्य झालं. महाराष्ट्रात हा प्रयोग जमेना. जर सरकार पाडल तर भाजपाच्या आताच्या १०५ वरुन ५० वर घसरतील. फडणवीसांनी एक वस्तुस्थिती समजून घ्यावी.
राजकारणात जास्त बोलाव लागतं हे मला माहिती आहे. त्यांच जेवढ वय आहे त्याच्यापेक्षा जास्त १० वर्षे मी महाराष्ट्राच राजकारण पाहतो आहे, लिहीतो आहे. २०१४ ला ते मुख्यमंत्री नव्हते. देशातल्या ‘मोदी वातावरणाने’ भाजपाच सरकार आलं तरी भाजपाला बहुमत मिळालं नव्हतं. २०१४ ते मुख्यमंत्री झाले. त्यांनी शेखी मिरवली आहे की, मी सलग ५ वर्षे मुख्यमंत्री होतो, हे वाक्य त्यांनी पवारसाहेबांना डिवचण्याकरिता बोललेले आहेत. त्याबद्दल नंतर लिहीतो. २०१९ ते मुख्यमंत्री असताना भाजपाची संखया १०५ वर आली. १७ आमदार कमी झाले. मुख्यमंत्री असताना नागपूरमधील त्यांच्या विधानसभा निवडणुकीत आशिष देशमुख यांनी त्यांचा घाम काढला. जेमतेम १२ हजार मतांनी निवडून आले. ज्या अजित पवार यांच्या विरुध्द फडणवीस बोलतात त्या अजित पवारांना पाडण्यासाठी कोणी पडळकरांना हाताशी पकडून हवा अशी केली अजितदादा पडणार. चंद्रकांत पाटील बारामतीत ८ दिवस मुक्कामाला राहीले. ते अजित पवार महाराष्ट्रात आजपर्यंतच्या विधानसभा निवडणुकीतील विक्रमी मताधिक्याने - १ लाख ८० हजार मतांनी निवडुन आले. पडळकरांच डिपॉझिट गेलं. इकडे नागपूरात फडणवीस जेमतेम १३ हजार मताधिक्यांनी निवडून आले. चंद्रकांत पाटील यांना कोल्हापूर येथून पळ काढावा लागला. एका निष्ठावंत भाजप भगिनीच तिकीट कापून कोथरुडमध्ये आक्रमण करुन ‘पेशव्यां’च्या मदतीने ते आमदार झाले, अशी या दोन नेत्यांची स्थिती आणि फडणवीस आता पवारसाहेबांशी तुलना करताहेत. मी सलग ५ वर्षे मुख्यमंत्री होतो ही फुशारकी ते मिरवतात. त्यांच्याकरीता एक सांगितलं पाहिजे की, बंगालमध्ये ज्योती बसू सलग २८ वर्षे मुख्यमंत्री होते. त्यांनी कधी शेखी मिरवली नाही. मोहनलाल सुखाडिया राजस्थानमध्ये सलग १९ वर्षे मुख्यमंत्री होते. प्रतापसिंग कैरो पंजाबमध्ये सलग १३ वर्षे मुखयमंत्री होते..., एम.जी.रामंचंद्रन सलग १० वर्षे मुख्यमंत्री होते, अजून नाव आहेत, मुददा तपशीलाचा नाही. अहंकाराचा आहे. फडणवीस साहेब, तुम्हाला संधी मिळाली, त्याचा अहंकार बाळगू नका. शरद पवार साहेबांशी तुलना अजिबात करु नका. तुम्ही सलग ५ वर्षे मुख्यमंत्री राहीला असाल. आज विरोधी पक्षनेते आहात, म्हणजे सत्तेच थोड वलयं आहे. तुमच जेवढ वय नाही त्याच्यापेक्षा कितीतरी वर्ष पवारसाहेब राजकारणात आहेत. चारवेळा मुख्यमंत्री होते, लोकसभेचे विरोधी पक्षनेते होते, केंद्रात संरक्षणमंत्री, कृषीमंत्री होते. त्यांची वर्षे कोणी मोजत नाही. ते सत्तेत असो, नसोत त्यांच्याएवढा मोठा माणूस आज महाराष्ट्रात नाही, तुमच्या भाजपामध्ये तर कोणीच नाही. मोदी पंतप्रधान असतील ते पदावर आहेत म्हणून मोठे, कारण पदं मोठं. त्या जागेवरुन खाली उतरल्यावर नेत्याचं मोठेपण मोजायचं असतं. मोठेपण पदावरुन ठरत नाही. पवारसाहेबांच मोठेपण ते किती वर्षे मंत्री, मुख्यमंत्री होते हे त्यांनी मोजलं नाही. महाराष्ट्रानेही मोजलं नाही, त्यांच्यातला कर्तबगार नेता मंत्री, मुख्यमंत्री आणि त्याही पुढे जावून म्हणेन, ‘उद्या महाराष्ट्राच्या नशिबाने पंतप्रधान झाले तरी...’ त्या सर्व सत्तेच्या पदापेक्षा त्यांच नेतृत्व मोठचं आहे. कारण राजकारणातली सभ्यता त्यांनी पाळलेली आहे. नेतृत्वाने ते सिनीयर (ज्येष्ठ आहेत ) पण, राज्यातील पदावरील व्यक्तिचा सन्मान ते स्वत:हून करतात. शंकरराव चव्हाणसाहेबांच्या अंत्यविधीच्यावेळी २७ फेब्रुवारी २००४ रोजी मुख्यमंत्री सुशीलकुमार होते. श्रध्दांजली सभेच संचलन मी करत होतो. मला बोलवून त्यांनी सांगितलं, शेवटच भाषण मुख्यमंत्र्यांच होईल, माझ त्याअगोदर. मी म्हटल, आपण ज्येष्ठ आहात ते म्हणाले ‘इथे ज्येष्ठता नाही...’ सौ.प्रतिभाताई पाटील यांच्या नागपूर येथील सत्कारात २०२० साली असचं झालं. अगोदर त्यांनी भाषण केलं नंतर उध्दवसाहेबाचं भाषण झालं. ११ मार्च २०२० रोजी शंकरराव चव्हाण जन्मशताब्दी, राजारामबापू, यशवंतराव मोहिते, रफिक झकेरिया जन्मशताब्दी कार्यक्रमात पवारसाहेबांनी शेवटचं भाषण उध्दवसाहेबांचच करायला लावलं, ते अगोदर बोलले, गोष्ट छोटी आहे. पण मोठ्या माणसांच मन संस्कारात दिसतं, तुम्हाला ते शिकाव लागेल. कोणाला पटो, न पटो...
महाराष्ट्राच्या राजकारणात सलग ६० वर्षे भक्कमपणे उभा असलेला एकमेव नेता आहे, ज्याचं नाव शरद पवार आहे, हे कोणालाही नाकारता येणार नाही. महाराष्ट्राच सोडून द्या. देशाच्या राजकारणाचा विचार करतानाही... भाजपाविरोधात आघाडी करताना-.... ममता बॅनर्जी असो, सोनियाजी असोत... शरद पवारांना आमंत्रण दिल्याशिवाय ही बैठक होवू शकत नाही किंवा शरद पवार साहेबांना कोणालाही वजा करता येत नाही. फडणवीस साहेब, तुम्ही राजकारणापुरते, निवडणुकीपुरते, सत्ता मिळाली तर सत्तेपुरते.... ज्या दिवशी तुमच्याकडे सत्ता नसेल, त्यादिवशी तुमचे मोठेपण आणि तुमचा अहंकार असा गळून पडेल आणि भेटायला कोण येतंय याची तुम्ही वाट पहात बसाल. तुमचं नेतृत्व खूप मर्यादित आहे. आवाका खूप मर्यादित आहे. सत्तेत असताना तुम्ही वाघ असाल, सत्तेत नसताना तुम्ही मांजर आहात, हे तुम्हाला कोणीतरी सांगायला हवं. शरद पवारांशी ज्यांचे काही मतभेद आहेत, तेसुध्दा त्यांच मोठेपण अमान्य करीत नाहीत. राजकारणातली सुसंस्कृतता, सामाजिक जीवनातील सभ्यता, सत्तेची महत्ता ही सर्व पथ्य पाळून महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात त्यांच्या तोडीचा नेता नाही हे समजून घ्या.
पवारसाहेबांनी कॉंग्रेस सोडली, एकदा नाही, दोनदा. स्वतंत्र पक्ष काढला. ते चूक की बरोबर याची अनेकवेळा चर्चा झाली. यापूर्वी महाराष्ट्रात कॉंग्रेसपासून अलग होवून पक्ष काढणारे नव्हते असे नव्हे.... होते... त्यांना ४ उमेदवार निवडुन आणता आले नाहीत. शरद पवार यांनी त्यांच नेतृत्व सिध्द केलेलं आहे. त्यांच्या पक्षाला नाव कोणतही द्या. शरद पवार हे व्यक्तिमत्व हाच एक पक्ष आहे, हेही त्यांनी सिध्द केलं आहे. कॉंग्रेसशी त्यांचे काही मतभेद आहेत. तरी कॉंगे्रेसच्या मूळ सिध्दांतावर- सर्वधर्मसमभाव, लोकशाही, स्वातंत्र्य, समानता, घटनेच पावित्र्य मूळ सिध्दांताच्या बरोबर ते आजही आहेत. १३६ वर्षांच्या कॉंग्रेस पक्षाला त्यांनी ‘जुना वाडा’ म्हटले असले तरी, त्यांच्या पक्षाच्या नावात... प्रत्येकवेळी ‘कॉंग्रेस’ हा शब्द होताच. तेव्हाही आणि आताही. पण त्यांच कर्तृत्व त्यांनी सिध्द केलं हे कोणालाही नाकारता येत नाही.
फडणवीस साहेब, तुमचं उणेपण सांगण्यासाठी नाही. ज्यादिवशी तुमच्या हातात कोणतीही सत्ता नसेल तेव्हा तुम्हाला नागपूरच्या तुमच्या घरातच बसावं लागेल. फावल्या वेळात भाजपाचं कार्यालय असेल... पण पवारसाहेब सत्तेत नसताना समजा मंत्रालयातून निघाले तर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये त्यांच्याकरीता चेंबर आहे.... तिथुन निघाले नाही तर साखर संघात त्यांच्याकरीता खुर्ची आहे, चेंबर आहे, तिथुन निघाले तर तिथुन वानखेडे स्टेडियममध्ये चेंबर आहे, तिथुन गिरगावला आले तर मराठी नाट्य परिषदेच मोठ कार्यालय आहे. तिथुन वरळीला आले तर नेहरु विज्ञान केंद्र आहे... पुण्यात गेले तर बारामती होस्टेल आहे. बारामतीत गेलंत तर किती संस्था आहेत.... तुमच्या भाजपाच्या सगळ्या नेत्यांची बेरीज केल तरी ती कमी पडेल. किंवा सलग ५ वर्षे मुख्यमंत्री राहीलो, या तुमच्या फुशारकीतला पोकळपणा हास्पास्पद वाटतो. नम्रतेने माणसं मोठी होतात, अहंकाराने बरयापैकी उंची असलेली माणसंही बुटकी वाटतात. तुमचं ते वाक्य वाचून तुमची कीवं आली.
आणि शेवटी माझे खूप चांगले मित्र
श्री. हर्षवर्धन पाटील यांच्याबद्दल - माणूस मस्त आहे, पण रस्ता चुकलाय.. तरी सध्या त्यांना चांगली झोप लागते, हे वाचून बरं वाटलं. त्यांना एवढंच सांगण आहे. २0२४ पर्यंत छान झोपून घ्या. दुपारीसुध्दा आणि रात्रीसुध्दा. २0२४ नंतर भाजपामध्ये गेलेल्यांची झोप उडायची वेळ येणार आहे.
• जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप - ९७६८४२५७५७