बच्चू कडूंची ’शेतकरी यात्रा’ ‘सातबारा कोरा करा’ यात्रा

बच्चू कडूंची ’शेतकरी यात्रा’ ‘सातबारा कोरा करा’ यात्रा

        प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी गुरूकुंज मोझरी येथे अन्नत्याग आंदोलन व त्यापाठोपाठ पापळ ते चिलगव्हाण ही 138 किलोमीटरची ‘सातबारा कोरा’ यात्रा काढली. जीवाचे हाल करून घेणारी ही पदयात्रा वजा ‘शेतकरी मात्रा’ आजारी सरकारवर कितपत आणि केव्हा उपायकारक होईल, ते आताच सांगता येणार नाही. परंतु जेव्हा जेव्हा शेतकरी आंदोलनांचे सिंहावलोकन होईल, तेव्हा या सातबारा कोरा यात्रेचा उल्लेख अनिवार्यतेने होईल, अशी ही ऐतिहासिक पदयात्रा आहे.

             भारताच्या इतिहासात महात्मा गांधी यांची दांडीयात्रा प्रसिद्ध आहे. ब्रिटीश सरकारने जीवनावश्यक मिठावर कर लावल्याने महात्मा गांधी यांनी साबरमती आश्रमातून 12 मार्च 1930 ला दांडीयात्रा काढली होती. 385 किलोमीटरची दांडीयात्रा 24 दिवस चालली. ही यात्रा समुद्रकिनारी 6 एप्रिल 1930 ला पोहोचली. गांधीजींनी चिमूटभर मिठ उचलून ‘कायदेभंग’ केला होता. अगदी अलिकडे अखिल भारतीय काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी 7 सप्टेंबर 2022 ते 30 जानेवारी 2023 या कालावधीत 136 दिवसांची 3,570 किलोमीटरची कन्याकुमारी ते काश्मिर, अशी संपूर्ण ग्रामीण भारताला ढवळून काढणारी ‘भारत जोडो’ यात्रा काढली होती. या यात्रेदरम्यान खा. राहुल गांधी यांनी असंख्य नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. तत्पूर्वी, 2011 मध्ये शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी कापसाला प्रतिक्विंटल सहा हजार रुपये भाव मिळावा, यासाठी गुरूकुंज मोझरी येथून सेवाग्रामपर्यंत पायी कापूस दिंडी काढली होती. शेतकर्‍यांचे पंचप्राण दिवंगत खा. शरद जोशी यांनीसुद्धा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकर्‍यांसाठी कित्येक आंदोलने केलीत, आता बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी अन्नत्याग अन् लगेच पापळ ते चिलगव्हाण ही सातबारा कोरा यात्रा काढलेली आह

            महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकर्‍यांची कर्जमाफी करण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण न केल्याने बच्चू कडू यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीस्थळाच्या बाजूला गुरूकुंज मोझरी येथे 8 जूनपासून तब्बल सात दिवस अन्नत्याग आंदोलन केले होते. त्याची दखल राज्य सरकारला घ्यावी लागली. शेतकरी कर्जमाफीसाठी समिती गठीत केली जाईल, असे लेखी आश्वासन सरकारच्या वतीने महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. परंतु ‘सरकारी काम सहा महिने थांब’, ही सरकारची कार्यपद्धती असल्यानेच बच्चू कडू यांनी सरकारला 2 ऑक्टोबरची ‘डेडलाईन’ दिलेली आहे.

           सरकारला आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी बच्चू कडू यांनी ‘सातबारा कोरा’ पदयात्रा 7 जुलैला प्रारंभ केली. 55 वर्षीय बच्चू कडू हे जन्मजात आणि जातीवंत आंदोलनकारी आहेत. त्यांच्या राजकीय कारकीर्दीचा पायाच जनआंदोलन आहे. बच्चू कडू यांची आंदोलने केवळ राज्यातच प्रसिद्ध नव्हे तर परराज्यात त्याची पुनरावृत्ती झालेली आहे. गोरगरीब, दिव्यांग, शेतकरी, कष्टकरी लोकांचे हक्क व त्यांच्या प्रश्नाबद्दल मनात संताप येणे हा त्यांचा स्वभाव असून व्यवस्थेविरुद्ध मनात चिड आणून त्यासाठी लढणे, झगडणे हा त्यांचा स्थायी भाव आहे. लढण्या झगडण्यासाठीसुद्धा जिगर लागते. तो कलेजा बच्चू कडू यांच्याकडे आहे.           सातबारा कोरा पदयात्रेची सुरूवात भारताचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव पापळ येथून करण्यात आली. तेव्हा अवघा महाराष्ट्र आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल भक्तीत तल्लीन होता. पांडुरंगाच्या नामस्मरणाने ओतप्रोत भरलेला होता. मार्गात ही पदयात्रा महाराष्ट्राच्या कृषीक्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या कर्मभूमीतून गेली.  बच्चू कडू यांनी वसंतराव नाईक यांना शेतकर्‍यांचा खरा ‘विठ्ठल’ संबोधून त्यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले आणि अखेरच्या टप्प्यात पायी चालून चालून रक्ताळलेले तळपाय, पायाच्या नखातून रक्त बाहेर येण्याच्या असह्य वेदना सहन करीत बच्चू कडू यांची ही पदयात्रा 14 जुलैला नियोजितस्थळी चिलगव्हाण-आंबोडा (जि. यवतमाळ) येथे पोहोचली. या संपूर्ण यात्रेदरम्यान बच्चू कडू यांनी शेतकर्‍यांशी संवाद साधला. त्यांचे प्रश्न, मन गहिवरून आणणार्‍या त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.       

         महाराष्ट्र विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन 30 जूनपासून 18 जुलैपर्यंत नियोजित आहे. त्या मधोमध 7 ते 14 जुलै या कालावधीत ही सातबारा कोरा पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेच्या समारोपासाठी चिलगव्हाण-आंबोडा हे गाव निवडण्यालासुद्धा एक प्रमुख कारण आहे. चिलगव्हाण-आंबोडा येथील शेतकरी साहेबराव करपे, मालतीताई करपे या दाम्पत्याने त्यांच्या चार मुलांसह पवनार जवळच्या दत्तपूर या आश्रमात 19 मार्च 1986 ला नापिकी व कर्जबाजारीपणामुळे सामुहिक आत्महत्या केली होती. ती महाराष्ट्र सरकारने मान्य केलेली पहिली शेतकरी आत्महत्या होय. तेव्हापासून आजतागायत लाखो शेतकर्‍यांनी कर्ज व नापिकीला कंटाळून आत्महत्या केलेल्या आहेत. पण सरकारला त्याची कळ नाही. वसंतराव नाईक यांनी कृषीक्रांती घडवलेल्या महाराष्ट्राच्या माथ्यावर शेतकरी आत्महत्येचा लागलेला कलंक पुसता पुसला जात नाही. त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना नाहीत. अर्धनग्न ‘स्मोकर मिनिस्टर’ सिगारेटचे झुरके घेत आहेत, दौर्‍यावरून बॅगमध्ये लाखो रुपयांचे बंडल घेऊन घरी पोहोचत आहे. सरकार यातच मस्त आहे. दुसरीकडे शेतकरी अन्यायाविरुद्ध पेटून तर उठतच नाही, व्यक्त व्हायलासुद्धा धजावत नाही. शिवाजी जन्माला यावा, पण तो शेजार्‍याच्या घरात, अशी स्थिती आहे. सरकारविरुद्ध कुणी आणि कसा आवाज उठवावा, हा प्रश्न विभागलेल्या शेतकर्‍यांच्या विखुरलेल्या मनाला पडलेला आहे, ही हतबलता दर्शविणारी बाब यात्रेदरम्यान बच्चू कडू आणि शेतकरी संवादातून प्रकर्षाने पुढे आलेली आहे.

          महाराष्ट्र विधानसभेच्या 2024 च्या निवडणुकीत महाराष्ट्रातील 80 पेक्षा अधिक आमदार पराभूत झालेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर सरकारने आणलेल्या ‘फुकट’च्या योजनेला भाळून लाडक्या बहिणींनी कैक बहिण-भावांना फुकटात गारद केले. त्यात पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, हितेंद्र ठाकूर, यशोमती ठाकूर, बच्चू कडू आदिंसह कित्येक दिग्गजांना लॉटरी लागली. आता त्यापैकी बहुतेकजण घरी बसून पुढील निवडणुकीची प्रतिक्षा करीत आहेत. बच्चू कडू यांनासुद्धा घरी येणार्‍यांचे ऐकून व निवेदन स्विकारून बघतो म्हणून सांगता आले असते. पण हा भीडू लोकांसाठी, लोकांसारखा स्वस्थ बसत नाही. लोकांना विसर पडतो, पण लोक लक्षातही ठेवतात, हेही तेवढेच खरे आहे. लोकशाहीत लोकभावना, जनमताचा कौल याला खूप महत्त्व आहे. सातबारा कोरा करा, ही एक आर्त जनभावना आहे. लोकांच्या सामाजिक व आर्थिकतेशी संबंधित आहे. आमदार, खासदार, मंत्र्यांसारख्या सोयीसुविधा नव्हे तर दररोजच्या मरणातून सुटका करा, एवढेच शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. त्या आक्रोशाची मात्रा बच्चू कडू या यात्रेच्या निमित्ताने सरकारला देत आहेत. सरकारने ऐकले नाही तर ‘नवा कायदेभंग’ अटळ दिसत आहे.

-गोपाल हरणे, ज्येष्ठ पत्रकार अमरावती.
94228 55496