‘गणेशोत्सव पवित्रतेस बाधा नको’ – मराठवाड्यात १० दिवस वाईन शॉप व बार बंद करण्याची समाजवादी पक्षाची मागणी

‘गणेशोत्सव पवित्रतेस बाधा नको’ – मराठवाड्यात १० दिवस वाईन शॉप व बार बंद करण्याची समाजवादी पक्षाची मागणी

छत्रपती संभाजीनगर : (२२ ऑगस्ट) - मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने साजरा होणार आहे. सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असलेला हा उत्सव लोकसहभाग, सामाजिक ऐक्य आणि सांस्कृतिक सलोखा प्रस्थापित करणारा मानला जातो. या काळात मोठ्या प्रमाणावर नागरिक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होतात. उत्सव काळात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच अनुचित घटना, दंगल, गोंधळ अथवा सार्वजनिक शांततेचा भंग होऊ नये, यासाठी समाजवादी पक्षाने महत्त्वाची मागणी पुढे केली आहे.

         समाजवादी पक्षाचे प्रदेश महासचिव डॉ. अब्दुल रऊफ शेख यांच्या नेतृत्वाखाली विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात महाराष्ट्र मद्यनिषेध अधिनियमातील कलम १४२ चा दाखला देत गणेशोत्सव काळात संपूर्ण मराठवाडा विभागातील – छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांतील सर्व वाईन शॉप, देशी दारू दुकाने आणि बिअर बार दहा दिवस बंद ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. गणेश आगमनापासून ते गणेश विसर्जनापर्यंत या कालावधीत दारू विक्री सुरू राहिल्यास सार्वजनिक शांततेला बाधा येऊ शकते, असा इशारा समाजवादी पक्षाने दिला आहे.

         याच अनुषंगाने छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात देशी वदेशी दारूची दुकाने, परमिट रूम, बियर बार दहा दिवसांसाठी बंद ठेवण्याबाबत आदेश काढण्यात यावे  म्हणून समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आयुब पटेल यांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी यांनाही स्वतंत्र निवेदन देण्यात आले.

        या प्रसंगी पक्षाचे प्रदेश सचिव डॉ. रियाज देशमुख, जिल्हा महिला अध्यक्ष सौ. प्रीती दुबे, महानगर युवा अध्यक्ष सलमान मिर्झा, महासचिव शेख शोएब, महिला महानगर अध्यक्ष सौ. सीमा मांडविया,  महानगर कोषाध्यक्ष शेख कय्युम, पश्चिम विधानसभा अध्यक्ष सय्यद आसिफ, पूर्व विधानसभा अध्यक्ष अजमत खान, महानगर महासचिव एड. शेख गुफरान, महानगर उपध्यक्ष (युवा) शेख रिजवान,  एड. क्यू.आर. शेख, खान राहील, माधव सिंह, माजिद खान आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

          समाजवादी पक्षाने असेही स्पष्ट केले आहे की, सध्या संभाजीनगर शहरासह मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांनी सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेला बाधा येण्याची शक्यता असल्याकारणाने महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) अंतर्गत पंधरा दिवसांचे प्रतिबंधक आदेश जारी केलेलेच आहेत. त्याचप्रमाणे सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेच्या दृष्टीने महाराष्ट्र मद्यनिषेध अधिनियम कलम १४२ नुसार देशी व विदेशी दारूची दुकाने, बिअर बार, परमिट रूम आणि वाईन शॉपसुद्धा तेवढ्याच कालावधीसाठी बंद ठेवणे पण  गरजेचे आहे. या मागणीची दखल घेऊन योग्य तो आदेश तातडीने काढावा, अशी विनंती समाजवादी पक्षाने केली आहे.