अनधिकृत शहर – महापालिकेच्या डोळ्यांत झोप, आता बुलडोझरचा धडाका!

छत्रपती संभाजीनगर शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जात आहे. मुकुंदवाडीपासून चिकलठाणा, केंब्रिज इंग्लिश स्कूल ते चिकलठाणा, पैठण रोडवरील नक्षत्रवाडी, तसेच पडेगाव ते शरणापुर फाटा पर्यंत अनेक ठिकाणी ही कारवाई सुरू आहे. महापालिका आयुक्त आणि सध्या प्रशासकपद भूषवणारे जी. श्रीकांत यांनी या मोहिमेचा आढावा घेत माध्यमांशी बोलताना सांगितले की, “ही मोहीम अनधिकृत बांधकामे हटविण्याची आहे आणि रस्ता रुंदीकरण त्याचा एक महत्त्वाचा भाग आहे.”
जी. श्रीकांत यांनी स्पष्ट केले की पहिल्या टप्प्यात मुख्य रस्त्यावरील अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू आहे, तर दुसऱ्या टप्प्यात अंतर्गत रस्त्यांवर असलेली, परवानगीविना बांधलेली घरे व दुकाने – विशेषतः गुंठेवारी न केलेल्या जागांवरील इमारती – पाडल्या जातील. त्यांनी हेही स्पष्ट केले की, बांधकाम परवानगी असलेली किंवा नियमीत गुंठेवारी झालेली एकही मालमत्ता यामध्ये पाडण्यात आलेली नाही.
छत्रपती संभाजीनगरमधील जवळपास ८० टक्के घरे ही परवानगीशिवाय बांधलेली आहेत. शहरातील अनेक मोहल्ले, वस्त्या कॉलनी – कोणतीही अधिकृत प्रक्रिया न करता – वसवले गेलेत. घराच्या जागी दुकानं, गाळे, गोडाऊन, हॉटेल्स उभारण्यात आलेत. रस्ता, ओपन स्पेस किंवा इतर आरक्षित जागांवरही उभी केलेली अशी अतिक्रमणं हे कायद्याचे सरळ उल्लंघन आहेत. ही परिस्थिती शहराच्या नियोजनावर आणि नागरिकांच्या जीवनमानावरही थेट परिणाम करते.
शहरातील प्रत्येक अनधिकृत बांधकामावर कारवाई होईल, असा निर्धार जी. श्रीकांत यांनी व्यक्त केला आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी हा इशारा दिला आहे की, कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण सहन केले जाणार नाही. आणि अनधिकृत बांधकामे पाडल्या जातीलच.
त्यांचा हा निर्धार निश्चितच स्वागतार्ह आहे, पण नागरिक म्हणून आमचीही अपेक्षा आहे की हे केवळ शब्दात न राहता प्रत्यक्षातही उतरणे आवश्यक आहे. कारण आजवर अनेकदा अशा मोहीम फक्त निवडक भागांपुरतीच मर्यादित राहिल्या आहेत.
"जेव्हा ही बांधकामे सुरू होती, तेव्हा महापालिका अधिकारी कुठे होते?", असा सवाल नागरिकांकडून सातत्याने विचारला जात आहे. आज जी घरे 'अनधिकृत' ठरवली जात आहेत, ती उभारली जाताना कोणते अधिकारी डोळेझाक करत होते?
महानगरपालिका आयुक्त श्रीकांत यांनी सुरुवात चांगली केली आहे, त्याबद्दल त्यांचे खरेच अभिनंदन व्हायला हवे. मात्र, ही मोहीम केवळ मुख्य रस्त्यांवर न थांबता, अंतर्गत रस्त्यांवर आणि प्रभावशाली व्यक्तींनी बांधलेल्या बेकायदेशीर इमारतींपर्यंत पोहोचावी, अशीच सामान्य जनतेची अपेक्षा आहे.
शहरातील नियोजनबद्ध आणि सुरक्षित विकासासाठी ही कारवाई गरजेची आहे. आज छत्रपती संभाजीनगरला जर खरोखरच सुंदर, स्वच्छ आणि शिस्तबद्ध शहर बनवायचे असेल, तर ही मोहीम अर्धवट थांबता कामा नये.
जी. श्रीकांत यांचा निर्धार आणि त्यांची सुरुवात आश्वासक आहे. पण त्यांनी दिलेला इशारा फक्त घोषणांपुरता न राहता, तो कृतीतही उतरावा. शहरातील सर्वसामान्य माणसाला आणि प्रामाणिक बांधकाम करणाऱ्यांना न्याय मिळावा यासाठी सर्व अनधिकृत बांधकामांवर कारवाई हीच न्यायाची खरी दिशा असेल.
जी. श्रीकांत साहेब, छत्रपती संभाजीनगरचा कायापालट करण्याची ही संधी तुम्हाला मिळालेली आहे – ही मोहीम शेवटपर्यंत नेऊन शहराला नव्याने घडवून दाखवा, जनता तुमच्यासोबत आहे!
--डॉ. रियाज़ देशमुख, असिस्टंट पोलीस कमिशनर (रि), छत्रपती संभाजी नगर.